वेगन पंथ, मांसाहार आणि पर्यावरण
1 min read🐓 पार्श्वभूमी
अशाच एका वेगन मित्राने मला तू पर्यावरप्रेमी आहेस तर मांसाहार बंद कर. तू एक बाजूला प्राणी मारून खातो आणि दुसऱ्या बाजूला निसर्ग वाचविण्याच्या गप्पा हाकतो हे योग्य नाही, असे तो मला म्हणाला. मांसाहार कशा प्रकारे सर्वतोपरी अयोग्य आहे, हे तो मांडत असताना काही ऐकूनच घ्यायचं नाही या मनःस्थितीत होता. पण नंतर त्याला मी माझे म्हणणे कसे योग्य आहे, कोणत्या प्रकारचा मांसाहार पर्यावरण स्नेही आहे आणि कोणता पर्यावरण विरोधी हे समजावून दिलं असता, मला असे लक्षात आले की, त्याच्याप्रमाणे कित्येक लोकं सरसकट मांसाहार आणि मांसाहारी माणसे यांना नाव ठेवतात हे लक्षात आलं आणि त्यातूनच हा उहापोह लिहीत आहे.
🐓 वेगन लोकांचा युक्तिवाद
वेगन लोक म्हणतात, प्राण्यांची farming केल्यामुळे त्यांना जेवढं अन्न द्यावं लागत, तेवढंच शाकाहारी अन्न थेट आपण खाल्यास अन्नाची बचत होते. शिवाय पृथ्वीच्या नैसर्गिक संसाधनांच्या वरती ताण कमी पडतो. आणि त्यातल्या त्यात गाय बैल यांच्यासारखे प्राणी खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचे संगोपन करून नंतर त्यांचा अन्न म्हणून वापर केल्याने अतिरिक्त प्रमाणात त्यांना पहिल्या टप्प्यात अन्न देताना आणि दुसऱ्या टप्प्यात त्यांच्याद्वारे सोडल्या जाणाऱ्या मिथेन आणि शिजवताना लागणारे इंधन इत्यादी बाबतीत विचार केल्यास खूप मोठ्या प्रमाणात कर्ब उत्सर्जन होते. म्हणून सरसकट मांसाहार बंद करून टाकला पाहिजे.
🐓 विचार अंगिकारल्यास होणारे परिणाम
संपूर्ण जगाने हा विचार अंगिकारल्यास होणारे परिणाम अगदी उलट असतील, असेच म्हणावे लागेल. ते कसे ते पाहू, अमेरिका आणि युरोपीय देशांनी किंबहुना तेथील नागरिकांनी नाही तर तेथे उदयास आलेल्या कंपन्यांनी पोल्ट्री, डेअरी/गायी आणि डुकरांचे मांस मोठ्या प्रमाणात मिळवण्यासाठी आणि नंतर त्यावर प्रक्रिया करून पुढे ते विकून जास्तीत जास्त नफा कमविण्यासाठी असे प्रकल्प सुरू केले आणि ‘Vegan’ लोकं जे म्हणातात, ते अगदी या लोकांसाठी एकदम योग्यच आहे.
🐓 शेतीतील गाय, बैल, कोंबड्यांचे महत्त्व
छोटे शेतकरी जे पारंपरिक पद्धतीने शेती करत होते आणि शेतीसोबत जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन, गाय, बैल व वराहपालन करत होते. त्यांना देखील हेच गणित लागू करून त्यांच्या शेतात तयार झालेली कोंबडी देखील पर्यावरण विरुद्ध आहे, असं जर कोणी म्हणत असेल तर ते अयोग्य आहे. आता कसे ते पाहूया. आपल्या शेतात वाडवडिलांपासून गाय, बैल, कोंबड्या पाळल्या जात होत्या. विशेष म्हणजे पारंपरिक पद्धतीने कोंबड्या पाळताना त्या शेतात मोकाट सोडल्या जायच्या. गाईन टाकलेलं शेण जे शेणखई वरती पडलेलं असायचं. त्या शेणात हुमणी आणि इतर अळ्या तयार होत राहतात. या अळ्या म्हणजे सर्वोत्तम प्रोटीन असते. शेतात मोकाट सोडलेल्या कोंबड्या 24 तास ययाच शेणखईमध्ये कीड, शेणात अर्धवट पचलेले दाणे टिपून त्यातून त्यांचं पोट भरत असत. या कोंबड्या दिवसाआड एक अंड घालतात. आता हे अंड जर तुम्ही आम्ही खाल्ले तर त्याला ‘Vegan’ लोकं जे गणित लावतात ते लागू पडणार नाही. कारण आपण या कोंबड्या वाढवण्यासाठी त्यांना धान्य दिलं नाही. त्यामुळे धान्य उगवण्यासाठी खर्च केली जाणारी ऊर्जा आपण वाया घालवली नाही. तसेच शेण त्यातील अळ्या, शेतातील तण, कचरा इत्यादी जे माणूस थेट खाऊ शकत नाही, ते अप्रत्यक्षपणे कोंबडीने जे अंड घातले आहे, त्यात एकवटले आहे. थोडक्यात ज्याप्रमाणे ऊर्जा एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात बदलते, त्याचप्रमाणे अन्न जे माणसाच्या खाण्यायोग्य नव्हतं ते कोंबडीने माणसाला खाण्यायोग्य बनवून दिलं. म्हणजेच शेतात असलेल्या नैसर्गिक संसाधनांचा पुरेपूर वापर करता आला. आता भावनिकदृष्टया पाहिलं तर आपल्याच शेतातला प्राणी मारून खायचा, हे काहीना योग्य वाटत नाही. आम्ही देखील आमच्या पाळलेल्या कोंबड्या न खाता फक्त त्यांची अंडीच खातो. त्यामुळे अशाप्रकारे आपण कुठेच निसर्ग नियम मोडला नाही.
🐓 गाय, बैल शेतीस वरदान
दुसरा भाग शेतात गायी पाळल्या तर त्यांना अन्न द्यावं लागेल आणि मग पुन्हा एकदा Vegan लोकं म्हणतील की, अन्न वाया जातं तर इथे देखील ते पुन्हा एकदा चुकतात, आपण भात खातो म्हणजे मुख्यत्वे भाताची शेतं आपण खातो आणि उरलेला पेंढा देतो. ज्यामुळे आपण अन्न वाया घालवले असं कोणी म्हणत असेल तर ते चूक आहे. आता सर्वात महत्त्वाचे शेती नैसर्गिकप्रमाणे करायची असल्यास गायीचं महत्त्व मला काही वेगळे सांगायची गरज नाही. शेतातच उगवलेले तण, पेंढा जे माणसाला थेट खाता येत नाही. ते गाय खाते आणि आपल्याला त्याच दूध बनवून देते, शिवाय, शेतीस वरदान असे तिचे शेण आणि गोमूत्र देते ज्यामुळे शेतात कृत्रिम खतांची गरज निर्माण होत नाही.
🐓 वेगनच्या आड कारस्थान
खरं पाणी इथेच मुरत आहे, जे कित्येक Vegan लोकांना माहीतच नाही. Vegan चळवळी मागे कित्येक रासायनिक खत निर्मिती कंपन्या आहेत. कित्येक इतर युरोपीय कंपन्या आहेत, ज्यांना Vegan चळवळ पुढे नेऊन समुद्रातील मासेमारी बंद करवायची आहे. तिथे मासेमार लोकांना विस्थापित करून बंदरे आणि केमिकल फॅक्टरी टाकायच्या आहेत. शेतातील गायी जर सर्वांनी दूध पिणे बंद करून टाकले तर कोणी पाळणारच नाही. मग रासायनिक कंपन्याना एकहाती धंदा मिळेल. याच प्रयत्नात ते आहेत. आता शेतीत रासायनिक खते टाकली तर ती निर्माण करताना, त्यांचे दळणवळण करताना होणारे कर्ब उत्सर्जन यांचा विचार केल्यास ते कितीतरी पटीने अधिक असणार आहे, यात तिळमात्र शंका नाही.
🦈 मासेमारीबद्दलचे गैरसमज
आता मासेमारीबद्दल देखील असेच गैरसमज निर्माण केले आहेत. कारण वर उल्लेख केल्याप्रमाणे जगभरात सर्वच किनारपट्टीवर या परदेशी रोषेल रॉकफेलर सारख्या जागतिक बँकेच्या मालकांना आणि औद्योगीकरणाच्या सूत्रधारांना मोठमोठी बंदरे बांधून किनारपट्ट्यांवर रासायनिक कारखाने उभे करून तेथे राहत असलेल्या मोठ्या मासेमार वर्गाला उदध्वस्त केले. यांना घातक रासायनिक प्रकल्प उभे करायचे आहेत. त्यामध्ये मासेमारी आणि मांसाहार हा फार मोठा अडसर आहे. कारण लोकं मासे खातात. त्यामुळे किनारपट्टीवरच्या मासेमार लोकांचा धंदा होतो आणि त्यांना किनारपट्टीपासून हाकलून देता येत नाही. म्हणून आडमार्गाने वेगन सारख्या चळवळी चालवल्या जात आहेत.
🦈 पर्यावरणस्नेही मासेमारी
आता मी म्हणत असल्याप्रमाणे मासेमारी देखील 100 टक्के पर्यावरणस्नेही नाही. पूर्वी जेव्हा मासे साठवून ठेवण्यासाठी शीतगृहसारख्या व्यवस्था नव्हत्या. तेव्हा कोकणात आणि जगभरातील जवळपास सर्वच किनारपट्ट्यांवर समुद्रापासून फार फार तर फक्त 50 किलोमीटरपर्यंतच मासे विकले आणि खाल्ले जायचे. ज्यामुळे समुद्रात विपुल प्रमाणात मत्स्य निर्मिती होत असे. परंतु, किनारपट्ट्यांवर शीतगृह आली आणि मग हे चित्रच बदलून गेलं. आमच्या सातपाटीसारख्या बंदरातून मासा थेट सातासमुद्रापलीकडे जाऊ लागला. जी माणसं आमच्या नैसर्गिक संसाधनापासून हजारो किलोमीटर लांब आहेत, तीदेखील आमच्या नैसर्गिक संसाधनाचा वापर करू लागली. त्यामुळे माशासारख्या अक्षय साठ्यांचा देखील होऊ लागला. वाढलेल्या मागणीमुळे शिडाच्या बोटी गेल्या आणि आगबोटी आल्या. त्यातूनच आता पुढे अतिशय विध्वंसक अशा पर्ससीन, LED आणि ट्रॉलर फिशिंगसारख्या पद्धतींचा जन्म झाला.
🦈 मासे का, कधी व कोणते खावे?
मासे पर्यावरणस्नेही पद्धतीने खायचे झाल्यास ते समुद्रापासून 50 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्याच लोकांनी खाल्ले पाहिजेत. ते खाताना मासे ट्रॉलर फिशिंग किंवा वर उल्लेख केलेल्या विविध पद्धतीतून आले असल्यास असे मासे खाऊ नयेत. त्याऐवजी पारंपरिक पद्धतीने माग, होडी इत्यादी पद्धतीने पकडले जाणारे मासे खाल्ले तर त्याने पर्यावरणाचे कमीत कमी नुकसान होईल. माशांच्या प्रजनन काळात म्हणजे श्रावण महिन्यात! परंपरेनुसार ते खाणे वर्ज करणे पर्यावरणाच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहे, हे कदाचित आता पटले असावे. ( कोणता मासा कोणत्या महिन्यात पिल्ले देतो याची माहिती घेऊन त्या त्या महिन्यात ते ते मासे खाणे वर्ज्य करणे अधिक उत्तम)
🦈 मासेमारी बंद केल्यास होणारे परिणाम
आता किनारपट्टीवर पर्यावरणाच्या दृष्टीने मासे खाल्ले जाणे किती महत्त्वाचे आहे, हे समजून घेऊया.
सर्वच किनारपट्टीवरून लोकांनी मासे खाणे एकदमच बंद करून टाकले तर आजवर समुद्राच्या भरोशावर राहत असलेल्या कित्येक पारंपारिक मासेमारांना घरी तर बसावे लागेलच. शिवाय, किनारपट्टीच्या परिसरातील कित्येक लोक ज्यांचा मासे प्रमुख आहार आहे, त्यांना मिळणारे प्रोटीन बंद होईल. आता मासेमारी करणारी लोकं त्यांचा गेलेला रोजगार आणि पोटाची भूक यासाठी या फार मोठ्या वर्गाला शेती, कारखानदारीकडे वळावे लागेल. ज्यामुळे शेती करण्यासाठी पुन्हा एकदा जंगलतोड, भूजल उपसा करावा लागेल. त्यामुळे किनारपट्टी भागातल्या सर्वच लोकांनी मासे खाणे बंद केलं, तर ते किती महागात पडेलयाचा विचारच न केलेला बरा!
🥦 परंपरा व खाद्यसंस्कृती
आता सर्वात महत्त्वाचे सांगतो. ज्यांच्या परिसरात जे उपलब्ध आहे आणि परंपरेनुसार जी खाद्यसंस्कृती विकसित झाली आहे, ती पर्यावरण स्नेही असते. शिवाय, ती तेथील लोकांच्या आहाराला देखील योग्य असते. त्यामुळे कोकणातल्या लोकांनी भात खावा. कारण इथे तो उगवण्यासाठी आवश्यक पाऊस पडतो. मासे खावेत. कारण त्याने कोकणातील जंगल शेतीसाठी तोडले जात नाही.
🥦 खाद्य बदलल्यास होणारे परिणाम
एवढ्या शेकडो वर्षात आपले वडवडील हेच अन्न खात होते, त्यामुळे या अन्नातून जास्तीत जास्त पोषक द्रव्ये काढून घेण्यासाठी आपली जनुके अनुकूल झाली आहेत. म्हणूनच कोकणातील कित्येक लोकांना चपाती खाणे जमत नसते. ती खाल्ली की पित्ताचा त्रास होतो. कारण गहू हे कोकणातल्या लोकांचं अन्नच नाही. त्याचप्रमाणे जिथे समुद्र नाही, ज्या लोकांनी त्यांच्या वाडवडीलानी कधी मासे खाल्लेच नाहीत. त्यांना ते पचवता देखील येत नाहीत. त्यामुळे निसर्गाला तुम्हाला काय सांगायचं आहे, ते आधी समजून घ्या. तो म्हणतो माझ्या लेकरांनी आपसात संसाधनांसाठी भांडू नये. म्हणून त्यानं आपल्यात आवश्यक ते बदलाव करून ठेवले आहेत. जेणेकरून एकच अन्न दुसऱ्याला आवडणार नाही/पचणार नाही. हळूहळू प्राण्यात निसर्ग एवढे बदल घडवून आणतो की, एकच प्रजाती केवळ अन्न वेगळे खाल्ल्यामुळे काही लाख वर्षांनी दोन भिन्न प्रजातींमधे विकसित होत असते. अशारीतीने एकच परिसरात दोन भिन्न प्रजाती केवळ अन्नात केलेल्या जराशा फरकाने एकच परिसरात गुण्यागोविंदाने नांदतात. कदाचित सुपीक जमिनीसाठी काही शेकडो वर्षांपूर्वी माणसा माणसात देखील असेच तंटे बखेडे सुरू असतील. ज्यातून जे सक्षम होते जंगलात शिकारी करण्यासाठी त्यांनी जंगल राखून ठेवले. इतर जमातींना शाकाहारी होऊन शेती करावी लागली असावी. कोकणात कदाचित मासेमार आणि शेतकरी यांच्यात देखील सुपीक जमिनीसाठी काही शेकडो वर्षापूर्वी असेच संघर्ष झाले असावे. नंतर त्यातूनच मासेमारी उदयास आली असावी.
🥦 क्रमिक विकास
Vegan लोकं म्हणतात, त्यांच्यासारखे अन्नातील विविधता संपवून टाकून सगळ्यांनीच Vegan होणे निसर्ग आणि मानवासाठी देखील फायदेशीर नाही. त्यातून अन्न जर एकच पद्धतीचं असेल तर आपसात एकच प्रकारच्या संसाधनांसाठी खूप वाद होतील. सर्वात महत्त्वाचे अन्न बदल करून ज्याप्रमाणे एकच पूर्वज असलेल्या प्रणांचा दोन भिन्न प्रजातींमध्ये विकास झाला तो क्रमिक विकास आपण कायमचा संपवून टाकू. त्यामुळे निसर्गच म्हणणे समजून घेऊया आणि त्याने ज्याप्रमाणे पक्षांना भिन्न भिन्न चोची देऊन त्यांचा आहार बदल करून त्यांच्यातली स्पर्धा कमी केली. त्याचप्रमाणे आपण देखील आपल्यातील स्पर्धा कमी करण्याचा प्रयत्न करुया आणि क्रमिक विकासाकडे पुढे जात राहुया…!
खूपच उपयुक्त लेख…