सेंद्रिय कर्ब जमिनीचा ‘आत्मा’ आणि सामू ‘हृदय’!
1 min read🟢 सेंद्रिय कर्ब वाढवण्याचा सोपा उपयोग
पूर्वी जमिनीचा सेंद्रिय कर्ब चांगला होता, म्हणुन जमिनीची उत्पादकता चांगली होती. आता बहुतेक जमिनीचा सेंद्रिय कर्ब अत्यंत कमी आहे. म्हणून जमीनीची उत्पादकता कमी आहे. जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवायचा असेल तर, कंपोस्ट खत देणे, पिकांची फेरपालट करणे, पिकांचे अवशेष जमिनीतच गाडणे, हिरवळीची पिके जमिनीत गाडणे असे विविध पर्याय आहेत. नेमके ते शेतकऱ्यांकडून केले जात नाहीत. यात सर्वात सोपा व परीणामकारक उपाय म्हणजे हिरवळीचे पीक घेऊन ते जमिनीत गाडणे हा होय. परंतु, शेतकरी हे न करता रासायनिक खतांचे प्रमाण वाढवितो.
🟢 जमिनीतील जिवाणूंचे महत्त्व
खत हे प्रत्येक पिकांचे अन्न होय. जमिनीत खत राहत नसल्याने किंवा कमी प्रमाणात राहत असल्याने आपण जे खत देतो, त्याचे पिकांच्या अन्नात रुपांतर करण्यासाठी जिवाणूंची आवश्यकता लागते. ज्या जमिनीत सेंद्रिय कर्ब जास्त असते, त्या जमिनीत जिवाणूंचे प्रमाणही जास्त असते. जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी असला तर जिवाणुंची संख्या कमी राहते. त्यामुळे आपण दिलेल्या खताचे पिकांच्या अन्नात रुपांतर होत नाही. त्यामुळे आपण दिलेली महागडी खते जमिनीत पडुन राहतात. परिणामी आर्थिक नुकसानीसोबत जमीन खराब होते. जमीन खराब होऊन राष्ट्रीय संपत्तीचेसुद्धा नुकसान होते. म्हणजेच तिहेरी नुकसान होते.
🟢 प्रयोग व अनुभव
माझ्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब पूर्वी 0.70 ते 0.80 एवढा होता. म्हणजे चांगला होता. नंतर विविध कारणांमुळे तो 0.28 पर्यंत म्हणजे अत्यंत कमी झाला. त्यामुळे नंतर हिरवळीचे पीक ढेंचा घेऊन ते जमिनीत गाडायला लागलो. त्यामुळे एकाच वर्षात सेंद्रिय कर्ब 0.94 पर्यंत वाढला. मी दरवर्षी ढेंचाचे पीक जास्त प्रमाणात घेऊन जमिनीत गाडायला सुरुवात केली. त्याचे परीणाम मला चांगले मिळावयास लागले. म्हणून मी मला जेथे संधी मिळेल तेथे त्याचा प्रचार प्रसार करावयास लागलो. परंतु, मला पाहिजे तसे यश मिळाले नाही. म्हणून मी हा प्रयत्न कृषी विद्यापीठ व कृषी विभागाचे सहकार्य घेऊन करावयाचा प्रयत्न केले. यात मला ज्या अडचणी वाटतात, त्या मी येथे देत आहे.
🟢 शेतकऱ्यांच्या अडचणी
एकतर याबाबत शेतकऱ्यांना माहिती राहत नाही. असली तरी त्याला लागणाऱ्या बियाण्याचा खर्च त्याला परवडत नाही. ढेंचाचे पीक घेतल्याने एक हंगाम वाया जात असल्याची शेतकऱ्यांची मानसिकता असते. त्यामुळे शेतकरी यासाठी तयार होत नाही. याकरीता सरकारने जास्तीत जास्त अनुदानावर ढेंचाचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले पाहिजे. असे केले तर राज्य सरकारवर याचा फार काही आर्थिक बोजा पडणार नाही. तसेच शेतकऱ्याने हिरवळीचे पीक घेतले तर त्याचे पुढील पिकाचे उत्पादन जास्त येऊन जमीन सुपीक होते. हा त्याचा अतिरिक्त लाभ होतो. जर शेतकऱ्यांनी याचा हिशोब ठेवला (हिरवळीच्या बियाण्यांवरील खर्च, त्या हंगामात बुडालेले खर्च वजा जाता उत्पन्न व पुढील हंगामात त्याला जास्तीचे आलेले उत्पादन व उत्पन्न) तर त्याला हे लक्षात येईल की, माझे त्यावर्षाचे उत्पादन व उत्पन्न कमी न होता, उलट वाढलेले आहे. सोबतच सेंद्रिय कर्ब वाढल्याने जमिनीचा पोत सुधारलेला असेल. जमीन भुसभुशीत झालेली असेल.
🟢 सरकारची नकारात्मकता
सरकार पूर्वी हिरवळीच्या पिकाचे बियाणे शेतकऱ्यांना अनुदानावर पुरवत होते. नंतर त्यांनी हे बंद केले. नंतर मला वरील फायदा लक्षात आल्यानंतर या बियाणे करीता अनुदान देणे संदर्भात (हे माझे वैयक्तिक हित नव्हते, सार्वजनिक हित होते.) मी राज्याचे तत्कालीन कृषी आयुक्त सुहास दिवसे यांना भेटलो. त्यांनी माझे म्हणणे पूर्ण ऐकून न घेता एकतर्फी नकारात्मक उत्तर दिले. यात भ्र्ष्ट्राचार होतो,असे त्यांचे मत होते. मी त्यांना लक्षात आणुन देत होतो की, हे बियाणे महाबीज म्हणजेच शासकीय कंपनीचे आहे व अनुदान डीबीटी सरळ लाभार्थीच्या खात्यात जमा करावयाचे आहे. त्यामुळे यात भ्रष्टाचार होण्याची काहीच शक्यता नाही. पण त्यांनी कोणताही विचार न करता यास नकार दिला. म्हणून मी याकरीता राज्याच्या कृषी खात्याचे एकनाथ डवले (शेतकऱ्यांबाबत सकारात्मक विचार करणारे अधिकारी) यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. त्यांना हे म्हणणे योग्य वाटले, म्हणुन पुढील कार्यवाही करीता संबंधित संचालक कृषी आयुक्तालय पुणे यांच्याकडे पाठविले. त्यांनी त्यावर कार्यवाही न करता, ‘अशी अनुदानाची योजना राज्यात नाही’, असे उत्तर दिले. वास्तविक अशी योजना नाही म्हणुनच मी मागणी करत होतो. पण अधिकाऱ्यांना नकार द्यायचा असला तर ते कोणतेही संयुक्तिक कारण न देता, रास्त मागणी धुडकावुन लावु शकतात. अशा काही नकारात्मक विचार असलेल्या ठराविक अधिकाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊन चांगले प्रशासन पण बदनाम होते.
🟢 कृषी विद्यापीठांचे साचेबंद काम व इतर कामाबाबतची नकारात्मकता
वरील विवेचन मी माझ्या सततच्या 5/6 वर्षाच्या माती परीक्षणानुसार केलेल्या संशोधनानुसार केलेले आहे. मी केलेल्या संशोधनानुसार सेंद्रिय कर्ब तिप्पट वाढणे, सोबतच जमिनीचे हृदय असलेला जमिनीचा सामू हा कोणत्याही उपायाने मेन्टेन होत नाही. तेवढा हिरवळीच्या खताने मेन्टेन होतो. माझ्या अभ्यासानुसार माझ्या जमिनीचा जो सामू 8.2 होता, तो एकच पीक जमिनीत गाडल्याने 7.8 झाला. हे कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना खरे वाटत नाही. पण याचे सतत 5/6 वर्षाचे चांगल्या प्रयोगशाळेचे अहवाल माझ्याकडे आहेत. ही प्रत्येक बाब तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, विस्तार विभागीय कार्यालय, कृषी विज्ञान केंद्र यांच्या निदर्शनास आणुन देत होतो. हे मी एका शेतकऱ्याने सांगितले तर त्याचा प्रचार प्रसार पाहिजे तो होत नाही, म्हणुन कृषी विद्यापीठाने याचे संशोधन करुन मोघम शिफारस करण्यापेक्षा आकडेवारीसह शिफारस विद्यापीठाने करावी, म्हणुन मी संबंधित तत्कालीन, आताचे कुलगुरू, संशोधन संचालक यांना विनंती केली. पण नकार कोणीही दिला नाही मात्र संशोधनही झाले नाही.
🟢 निष्कर्ष
वरील सर्व बाबी मी माझ्या वैयक्तिक हितासाठी केल्या नाहीत तर सार्वजनिक हितासाठी केल्या आहेत. मात्र शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी, दुप्पट करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणारे सरकार, कृषी विद्यापीठे (ज्यांनी कृषीचे शिक्षण घेऊन डाॅक्टरेट मिळवुन, दुसरे हजारो डाॅक्टर तयार करीत आहेत) त्यांना जमिनीची नाडी तपासून जमिनीचा आत्मा व हृदय दुरुस्त करून, जमिनीची तब्बेत चांगली ठेऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करण्यासाठी प्रयत्न करावयास काय अडचण आहे हे समजत नाही. कारण शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करावयाचे असेल तर कमी खर्चात जमिनीची उत्पादकता वाढविणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. जमिनीची उत्पादकताच जर कमी असेल तर कोणतेही प्रयत्न केले तर उत्पन्न डबल होणार नाही.
सरकारी अनास्था… सरकारी धोरणे .