मान्सून अंदमानच्या सागरात दाखल; उष्णतेच्या लाटेसोबतच तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस!
1 min read
☔ सहा दिवस आधी आगमन
दक्षिण-पश्चिम मान्सूनचे दरवर्षी साधारणत: 20 ते 22 मे दरम्यान आगमन होते. यंदा मात्र सहा दिवस अगोदरच आगमन झाले आहे. बंगालच्या उपसागरातील ‘असानी’ चक्रीवादळ निवळत असतानाच अंदमान निकोबार बेट समूहावर दक्षिण-पश्चिम मान्सून दाखल होण्यास पोषक हवामान निर्माण झाले आहे. मान्सून साधारणत: 21 मेपर्यंत अंदमानाची राजधानी पोर्टब्लेअर येथे पोचतो. त्यापूर्वी दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होतो. पुढे 1 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतो. यंदा 16 मे लला अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे. मागील वर्षी (सन 2021) मान्सूनने 21 मेला अंदमान बेटांचा बहुतांश भाग व्यापला होता व 3 जूनला केरळ आणि 5 जूनला महाराष्ट्रात दाखल झाला होता.
❄️ कमी दाबाचे क्षेत्र
‘असानी’ चक्रीवादळ निवळत असून, कर्नाटक व आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर 5.8 किमी वरपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. हे क्षेत्र दक्षिण-पश्चिमेकडे म्हणजेच पाकिस्तान व पंजाबच्या दिशेने झुकले आहे. याची एक टफ रेषा पूर्व-उत्तर प्रदेश तर दुसरी उत्तर-दक्षिण ट्रफ टफ रेषा बिहार ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत पसरली आहे. ही रेषा उत्तर छत्तीसगड, विदर्भ, तेलंगाना आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवरून प्रवास करत आहे.
🌧️ मेघगर्जनेसह पाऊस
परिणामी, गेल्या 24 तासात उप हिमालयी पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम आणि अरुणाचल प्रदेश, अंदमान-निकोबार द्वीप समूह, झारखंडचा काही भाग, केरळ, तामिळनाडू, पूर्वोत्तर भारत, गंगीय पश्चिम बंगाल, ओडिशाचा काही भाग, छत्तीसगड, तेलंगाना,जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश, कर्नाटकची किनारपट्टीच्या काही भागात मध्यम स्वरूपात पाऊस बरसला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसतील. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
💥 उष्णतेची लाट
विदर्भ, कोकण, गोवा, दक्षिण-पश्चिम उत्तर प्रदेश, दक्षिण हरियाणा, दिल्ली, दक्षिण उत्तर प्रदेश, जम्मू, हिमाचल प्रदेश, पश्चिम राजस्थान, पूर्व राजस्थान, पंजाब, पूर्व व उत्तर मध्य प्रदेशात, दक्षिण-पश्चिम बिहार, झारखंडच्या काही भागात उष्णतेची लाट कायम आहे.
🌤️ हवामानाचा अंदाज
येत्या 24 तासात सिक्कीम, पूर्वोत्तर भारत, अंदमान-निकोबार द्वीप समूह, केरळ, दक्षिण कर्नाटक, तामिळनाडू, कर्नाटक, बिहार, रायलसीमा, छत्तीसगड, पश्चिम हिमालय, कोकण व गोव्यात काही ठिकाणी हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेशचा पश्चिमी भाग आणि उत्तर राजस्थानच्या काही भागात धूळमिश्रित तेज व हलकी हवा वाहण्याची शक्यता आहे. पंजाब, दक्षिण हरियाणा, राजस्थान, विदर्भ आणि दक्षिण उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहील.