krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

कापुरांची झाडं अर्धा किमीपर्यंत खरंच हवा शुद्ध करते का?

1 min read
पावसाळा जवळ आला आहे. त्यातच कोरोनासारख्या आजाराने प्राणवायू (Oxygen) आणि झाडांचं महत्त्व काय आहे, याची जाणीव कित्येकांना झाली आहे. येत्या पावसाळ्यात कित्येक लोकं वृक्षारोपण करण्याचा चंग बांधून आहेत. परंतु, त्याचवेळी काही संधीसाधू लोकं आपल्या नर्सरीमधली कापुराची झाडं (Camphor Tree) खपवण्यासाठी अशास्त्रीय दावे (Unscientific claims) करत सुटली आहेत. ज्यामुळे भविष्यात भारतीय जंगलांची (Forest) वाट लागणार आहे, याचे भान त्यांना नाही.

🌳 क्लोरोफिल पिगमेंट महत्त्वाचे
सर्वच झाडं हवा शुद्ध करत असतात आणि त्यांची हवा शुद्ध करण्याची प्रक्रिया त्यांनी केलेल्या प्रकाश संश्लेषण (Photosynthesis) प्रक्रियेवर अवलंबून असते. जी त्या झाडामध्ये किती प्रमाणात क्लोरोफिल पिगमेंट (Chlorophyll pigment) आहे यावर अवलंबून असते. सर्वसामान्य माणसाच्या भाषेत सांगायचं झाल्यास, जे झाड जेवढे अधिक गडद हिरवे तेवढे त्यात क्लोरोफिल पिगमेंट अधिक आणि तेवढं त्याच प्राणवायू बनवण्याच प्रमाण अधिक. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वड, पिंपळ ही झाडे सर्वाधिक हवा शुद्ध करतात. पण आपण त्याची लागवड करतच नाही. त्यांची लागवड करणे अत्यंत सोपे आणि स्वस्त असते. पावसाळ्याच्या वेळी वडाच्या झाडाची चार एक फूट लांब फांदी. पारईने नुसती जमिनीत खोवली तरी पुढल्या पावसाळ्यात वड मोठा झालेला असतो.

🌳 कापुराची आयात, लागवड नाही
आता मूळ मुद्यावर येऊया कापूरचे झाड हे मूळचे जपान आणि चीन मधले. भारतीय आयुर्वेदात गेली कित्येक वर्षे कापूर आपण वापरत असलो तरी, कापुरची झाडं भारतात कधीच आयात (Import) केली गेली नव्हती. त्याऐवजी कापूर आयात केला जात होता. कदाचित परदेशी वृक्ष लावू नयेत, याचं पुरेपूर ज्ञान आपल्या ऋषीमुनींना असाव. म्हणून त्यांनी कधी कापुराची लागवड केली नव्हती. त्याऐवजी थेट कापूरच आयात केला जात असे.

🌳 क्रमांक-1 चे आक्रमक झाड
आता थोडं कापुराच्या झाडाबद्दल जणून घेऊया. कापुराचे झाड मूळचे जपान (Japan), चीन (China) आणि इंडोनेशिया (Indonesia) मधले. तेथील जंगलांमध्ये ही झाडे सापडतात. काही दशकांपूर्वी कापुराची झाडे फ्लोरिडा (Florida) राज्यात लावली गेली होती. अगदी पाच दहा वर्षात त्यांची संख्या हाताबाहेर गेली. ज्यामुळे फ्लोरिडामधील कीटक आणि परदेशी उपद्रवी वृक्ष निवारण मंडळाने कापुराच्या झाडाला क्रमांक-1 चे आक्रमक झाड म्हणून घोषित केलं आहे.

🌳 कापुराच्या झाडांपासून उद्भवणारे धोके
त्यामागची कारणे देखील तशीच आहेत. हे झाड अगदी चटकन वाढते आणि स्थानिक हळुहळू वाढत असलेल्या झाडांशी स्पर्धा करते. उंच होते आणि जवळपास 50 टक्के सूर्यप्रकाश अडवणारी सावली (Shadow) निर्माण करते. ज्यामुळे स्थानिक हळूहळू वाढत असलेली झाडं मरून जातात किंवा त्यांची वाढ खुंटते. आता हे झाड मोठे झाल्यानंतर त्याला काळ्या रंगाची खूप सारी फळे (Fruit) येतात. जी पक्ष्यांना (Bird) आवडतात. ज्यामुळे पक्षी ही फळे खाऊन त्यांच्या बिया (Seed) इतरत्र पसरवतात. काही बिया जर जंगलामध्ये पडल्या तर तिथल्या सर्व वृक्षांसोबत स्पर्धा करतात. ज्यामुळे स्थानिक वाढ कमी असलेली वृक्ष स्पर्धेतून बाद होऊन त्यांच्यावर अवलंबून असलेले कित्येक प्राणी नष्ट होतात. शिवाय, कापुरच्या झाडांखाली तयार झालेल्या दाट सावलीमुळे लहान मोठी झुडपे देखील वाढत नाही. ज्यामुळे पावसाळ्यात मातीची धूप (Soil Incense) होते. शिवाय, कापुरचे झाड कमकुवत असल्याने सोसाट्याच्या वारा पावसात उन्मळून पडते. खाली वाढत असलेली कित्येक स्थानिक वृक्षांची रोप मारून टाकते. जिथे कापुराची झाडं अधिक असतात, तिथे भुसख्खलन (Landslide) होण्याचा संभव वाढतो. कारण त्यांच्यामुळे लहानसहान माती धरून ठेवणारी झुडुपे उगवत नाहीत.

🌳 भारतीय जैवविविधता जपा
आपल्याला जर प्राणवायू हवा असेल तर वड, पिंपळ, अवदुंबर, कडुनिंब, फणस, आंबा अशी उंच व मोठी वाढणारी कोणतीही स्थानिक जैवविविधता (Biodiversity) टिकवून ठेवणारी झाडे लावा. एवढी मोठी झाड लावणे शक्य नसल्यास स्थानिक बांबूचे बेट तयार केलं तरी चालेल. पण आणखी विदेशी वृक्ष नकोत. आधीच गलिरिसिडिया-गिरिपुष्प (gliricidia), विदेशी नीलगिरी (Eucalyptus), घाणेरी सारख्या झाडांनी भारतीय जंगलांची वाट लावली आहे, त्यात आणखी भर नको.

2 thoughts on “कापुरांची झाडं अर्धा किमीपर्यंत खरंच हवा शुद्ध करते का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!