स्वयंसिद्धा सीता मंदिर!… रावेरी!!
1 min readपार्श्वभूमी
रामायण… सहा-सात हजार वर्षांपूर्वी घडलेला रघुवंशातील एका राजाचा इतिहास. कुणी श्रद्धेने, कुणी
भक्तीने, कुणी कुतुहलाने या इतिहासाकडे बघतात. कुणी काल्पनिक समजून उपेक्षाही करतात. पण लोकमानसावर रामायणाचे गारुड आजतागायत कायम आहे, हे सत्य आहे. राम हा भारताचा लोकनायक आहे.
रामायणाच्या कथानकावर भक्तीची, प्रेमाची, श्रद्धेची, कर्मकांडांची आवरणे वर्षानुवर्षे चढत गेली. अनेक दंतकथा, लोककथा प्रचलित झाल्या. श्रीराम वनवासात असताना आमच्याच गावात थांबले होते. अशा आख्यायिका हजारो गावात ऐकायला मिळतात. ‘सीतेची न्हाणी’ आणि ‘रसोई’ शेकडो ठिकाणी आहेत.
लोकनायक श्रीरामांवर भारतीय जनमानसाचे प्रेम आहे. पण, सीता गर्भवती असताना तिला काहीही कल्पना न देता तिच्या चारित्र्यावर कुणीतरी संशय घेतल्यामुळे तिला रामाने पुन्हा वनवासात पाठवणे समाजमनाच्या
जिव्हारी लागलेले आहे.
सोन्याची लंका जळे,
रावण मेला मेला
सीतामाईचा गे माये
वनवास ना संपला.
तुम्ही मारीला रावण
संगे मारोती बिभीषण
सीता झुंजली एकली
तिच्या नशिबी दूषण
रामा तुझ्या मनापाठी,
कसा संशयाचा काटा
वाटे रावणाचा दंभ खरा
सीतेचा शब्द खोटा.
अशा ग्रामीण स्त्रियांच्या सहज उद्गा्रातून.. जात्यावरच्या ओव्यांमधून ही व्यथा व्यक्त होते.
महिलांविषयक प्रतिगामी-पुरोगामी विचार
याबद्दल रामाला दोष देणारे आज अनेक जण आहेत. ते बोलतातही फार हिरीरीने. तुमच्या रामाची ही चूक नाही का? अशा स्त्रियांनी काय करायचे? कसे जगायचे? समाज त्यांना स्वस्थपणे जगू देईल का? असे प्रश्न अनेक जण विचारतात. परित्यक्ता सीता मंदिराला, स्वयंसिद्धा सीता मंदिरात परावर्तित करून या प्रश्नांना युगात्मा शरद जोशींनी समर्पक उत्तर दिले आहे. युगात्मा शरद जोशींनी ‘कुटुंब’ हे समाजस्वास्थ्याचे एकक (Unit ) मानले आहे. शेतकरी संघटनेच्या विस्तारित कुटुंबातील विविध नात्यांना त्यांनी प्रतिष्ठापूर्वक जपले. प्रतिगामी विचारांचे लोक आपल्या नात्यातल्या स्त्रियांना स्वतःची मालमत्ता मानतात. त्यांच्यावर मालकी असल्याचे समजतात; तर पुरोगामी विचारांचे लोक आपल्या आणि दुसऱ्यांच्याही स्त्रियांना कुटुंबातील, समाजातील मानबिंदू मानतात. स्त्री – पुरुषांच्या प्रत्येक नात्याची प्रतिष्ठा जपणे, नात्यांचा सन्मान करणे ही वैचारिक प्रगल्भता आहे. कायदेपंडितांनी स्त्रियांना वारसाहक्क मालमत्तेत बरोबरीने वाटा मिळण्यासाठी कायदे केले. पण कायदा तयार होता होताच त्यात पळवाटाही तयार होतात. कायद्याने कदाचित काही मिळेलही. पण प्रेम, सन्मान आणि समाधान मिळवायचे असेल तर कुटुंबातील नाती सशक्त हवी.
मानवी उत्क्रांतीतला व्यवसाय व व्यवस्था
शेती हा मानवी उत्क्रांतीतला पहिला व्यवसाय आणि कुटुंब ही त्याच उत्क्रांतीतील शेवटची आणि सर्वोत्तम
व्यवस्था! शेतकऱ्याची ‘घरलक्ष्मी’ शेती आणि कुटुंब दोन्ही समर्थपणे सांभाळते. शेतकरी स्त्री शेतामध्ये
घरधन्यापेक्षा जास्त कष्ट करते’ हे तर आता निर्विवादच आहे. पण आतापर्यंत शेतकऱ्याच्या घरलक्ष्मीचे
कष्ट मोजलेही जात नव्हते. ना घरातले ना शेतीतले. मग त्याचे मोल मिळणे तर दूरच. लाखो शेतकरणींच्या थोरल्या भावाने.. ‘युगात्मा शरद जोशी’ यांनी शेतकऱ्यांना आपल्या घरलक्ष्मीच्या कष्टांची मोजणी करायला सांगितले. त्यांची मजुरीही ठरवायला सांगितले. आयुष्यभर जीव ओतून घरा-वावरात कष्ट करणाऱ्या घरलक्ष्मीची मजुरी कशी ठरवायची? कशी द्यायची? यावर उत्तर होते ‘लक्ष्मीमुक्ती’!
लक्ष्मीमुक्ती आंदोलन
शेतजमिनीचा थोडा हिस्सा घरलक्ष्मीच्या नांवे करायचा. हे लक्ष्मीमुक्ती आंदोलन यशस्वी ठरले. हजारो शेतकरी भावांनी आपल्या घरलक्ष्मीच्या नावे शेतजमिनीचा काही भाग केला. सातबारा (७/१२)वर घरलक्ष्मीचे नाव चढले. हे शेतकरी जमीनदार ‘बडे कास्तकार’ नव्हते. अगदी पोटापुरते देणाऱ्या जमिनीचे मालक होते. हे नुसते जमिनीचे हस्तांतरण नव्हते, हा कष्टकरी घरलक्ष्मीचा सन्मान होता. आपल्या घरलक्ष्मीचा सन्मान करण्यातला आनंद शेतकऱ्यांनी अनुभवला. कुटुंबातील स्त्रियांवर ‘मालकी’ गाजवणे, हे वैचारिक दारिद्र्याचे लक्षण आहे. अनेक शेतकऱ्यांच्या घरातले वैचारिक दारिद्र्य लक्ष्मीमुक्ती आंदोलनाने दूर केले .युगात्मा शरद
जोशींनी या आंदोलनाचे ‘मंगल सावकाराचे देणे’ असे मनाला भावणारे सुंदर वर्णन केले आहे. दिवसभर घरावावरात काळजीने कष्ट करणाऱ्या,जीव लावून बैलांची, गाई म्हशींची, वगारा-वासरांची देखभाल करणाऱ्या, तुटपुंज्या उत्पन्नातूनही नाण्याला नाणे जोडून बचत करणाऱ्या त्या घरलक्ष्म्यांना खरेच ‘सावकार’ झाल्यासारखे वाटत असेल.आयुष्यभर जीव जोडून कष्ट केल्याच्या मुद्दलावरचे हे प्रेमाचे सन्मानाचे भरघोस व्याज!
सीता शेती – माजघर शेती
शेतकरी संघटनेच्या सन 1991 च्या शेगांव अधिवेशनात युगात्मा शरद जोशींनी ‘चतुरंग शेती’ची संकल्पना मांडून सीता शेती आणि माजघर शेती हे विशेष प्रकल्प स्त्रियांच्या मर्यादा आणि क्षमता विस्तारत जोडले. बांधावरच्या झाडांचे महत्त्व शेतकरणीला जास्त वाटते. बांधावरच्या झाडांची लागवड पैसा तर देईलच, शिवाय फळे आणि रानमेव्याचा आनंद घरच्या सगळ्यांनाच
मिळेल. तो शब्दात सांगता येणार नाही. स्वयंपाक घरात ‘सीतेच्या रसोईत’ परंपरागत स्वादिष्ट पदार्थ तयार करून ते माजघरात ‘पॅकींग’ करून विकले तर उत्पन्न चांगले मिळेल. या उपक्रमात पदार्थाचा दर्जा चांगला असेल. सातत्य असेल, तर बाजारपेठेत चांगले नाव ही मिळवता येते. शेतकऱ्यांच्या घरच्या अन्नपूर्णेला नवनवीन कल्पना आणि कर्तृत्वाची दोन मोठी दालने शरदभाऊंनी उघडून दिली. आज अनेक जणी अनेक बचतगट तयार करून सीता शेती, माजघर शेती यशस्वीपणे करत आहेत.
आठवणींचा कोपरा ‘माहेर’
रावेरीला जीर्णोद्धार करण्यात आलेल्या सीता मंदिरासमोरच एक सभागृह बांधले आहे.
शरदभाऊंनी त्याचे नाव ठेवले ‘माहेर’! सगळ्या महिलांच्या मनातला सुखाच्या आठवणींचा कोपरा!! माहेर…..जिथे लेकीला वाढवले आणि घडवले जाते….
आत्मजा – जनकात्मजा
राजा जनकानेही शेत नांगरतांना सापडलेली नवजात मुलगी, जिची आई कोण, वडील कोण हेही माहीत
नव्हते. त्या मुलीला ‘आत्मजा’ म्हणून स्वीकारले. तिला शिकवले, घडवले. जगाला तिची ओळख ‘जनकात्मजा’ अशीच दिली. त्याकाळच्या रिवाजाप्रमाणे तिचे लग्न पराक्रमाच्या निकषावर श्रीरामाशी झाले. आपल्या मुलीची ओळख सांगताना जनकाने सांगितले ‘हिचा जन्म जणू नांगराच्या फाळातून झाला.’ आपल्या मुलीच्या कणखरपणाचे वर्णन त्या सहृदय बापाने किती नेमकेपणाने केले आहे. खऱ्या मायबापाने टाकून दिलेल्या तान्हुल्या सीतेचा ‘आत्मजा’ म्हणून स्वीकार जनकाने केला. तर रामाने त्याग केल्यावर परित्यक्ता सीतेच्या पाठीशी वाल्मिकी बाप होऊन उभे राहिले. समाजात कोणी परित्यक्ता असूच नये. पण चुकून एखादी दुर्दैवी असेल तर तिला समाजाने वाल्मिकी होऊन आधार दिला पाहिजे. त्या स्त्रियांनीही समाजातील ‘बापाचा’ आधार डोळसपणे स्वीकारला पाहिजे. सीतेसारखेच खंबीर आणि गंभीर होऊन मुलांना वाढवले घडवले पाहिजे.
शापमुक्तीसाठी गव्हाची ओटी
रावेरीच्या मंदिरासाठी, शेतकरी संघटना आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी अथक काम केले. या प्रकल्पाचा त्या मागच्या संकल्पनेचा प्रचार प्रसार केला. जमेल तशी वर्गणीही दिली आणि मिळवली. पण लोकवर्गणी पुरेशी नव्हती म्हणून युगात्मा शरद जोशींनी स्वतःची शेती विकून पैसा उभा केला आणि मंदिराचा जीर्णोद्धार केला. या मंदिराबद्दल एक आख्यायिका आहे. सीतेची प्रसूती झाल्यानंतर सोजी करण्यासाठी कुणीच गहू दिले नाहीत, म्हणून रावेरीच्या पंचक्रोशीत गहू पिकणार नाही,असा शाप सीतेने दिला. त्यामुळे तिथे गहू पिकत नव्हता. सुधारित, संकरित वाणाचा गहू पिकू लागल्यानंतर शापमुक्त होण्यासाठी आजही सीतामाईची ओटी गव्हाने भरण्याची पद्धत आहे.
सीतानवमी आणि कार्यक्रम
रावेरीच्या मंदिराला आणि माहेर सभागृहाला असे संदर्भ आणि असे अर्थ आहेत. युगात्मा शरद जोशींनी परित्यक्ता सीतेच्या भग्न मंदिराचा जीर्णोद्धार केला. ते स्वयंसिद्धा सीता मंदिर लोकार्पण केले. श्रद्धा, निष्ठा, भक्तीचा वारसा तोच ठेवला. मातृत्व किती सतर्क, सजग, सुजाण असते, कर्तृत्ववान असते हे नव्या दृष्टिकोनातून सांगितले. ज्या देवस्थानात गेल्यावर मनात आनंद, उत्साह आणि जबाबदारीची जाणीव होते ते देवस्थान जागृत असते. रावेरीचे सीता मंदिर जागृत देवस्थान आहे. सन 2001 पासून दरवर्षी ‘सीता नवमी’ या तिथीला ज्या स्त्रियांनी आई आणि बापही होऊन आपल्या मुलांना सुशिक्षित संस्कारित केले’ अशा पाच मातांच्या मातृत्वाचा गौरव केला जातो. कार्यक्रमाचे आयोजन माजी आमदार वामनराव चटप यांचे असते. यावर्षी (मंगळवार, दि. 10 मे 2022) आपल्या सगळ्यांचाच सहभाग अपेक्षित आहे. आपल्या घरलक्ष्मीला सोबत घेऊन या जागृत देवस्थानात सगळ्यांनी अवश्य यावे.
माहितीपूर्ण लेख