krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

‘बहावा’ : सौंदर्याची नैसर्गिक खाण

1 min read
बहावा ही भारतीय वनस्पती आहे. प्राचीन काळापासून भारतामध्ये सर्वत्र ही पाहायला मिळत आहे. सध्याच्या काळात ही वनस्पती खूप दुर्मिळ झालेली आहे. अनेकांनी ही कधी पाहिलीही नसेल. त्यामुळे या वनस्पतीचे संवर्धन करण्याचा निर्णय 'नागर फाउंडेशन'ने घेतला आहे. आतापर्यंत आपण 100 झाडे नागर उद्यानात आणि 10 झाडे स्मशानभूमी प्रकल्प रवळगाव येथे यशस्वी केली आहेत. आज आपण या झाडाचे पर्यावरणीय आणि मानवी जीवनातील महत्त्व काय आहे ते पाहू.

🌳 पानगळीचा वृक्ष
बहावा हे झाड भारतात सर्वत्र येते. हे झाड 40-50 फूट वाढते. बहाव्याच्या पानांचा रंग गडद हिरवा असून, ती संयुक्त प्रकारची असतात. बहाव्याला 3-8 पर्णिकेच्या जोड्या असतात. हा पानगळीचा वृक्ष असल्यामुळे साधारण फेब्रुवारीपासून पानगळीला सुरुवात होते.

🌿 निसर्गाची अप्रतिम कलाकृती
साधारण एप्रिल महिन्यापासुन याला फुले येण्यास सुरुवात होते. याला फुलांचे लांब लांब गजरे येतात. या गजऱ्यांना असंख्य पिवळे फुले येतात. यावेळी हे संपूर्ण झाड पिवळ्या धमक फुलांनी बहरून जाते. कितीही लांबून पहिले तरी हे झाड पिवळे धमक दिसते. यावेळी याचे सौंदर्य पाहताच राहावे असे वाटते. यावरून आपली नजरच हटत नाही. निसर्गाची अप्रतिम कलाकृती काय आहे याचा अनुभव आपल्याला यावेळी येतो.

🌿 बहाव्याचे औषधी गुण
केरळ या राज्याचे हे राज्यफूल आहे. भारत सरकारच्या टपाल खात्याने या फुलाचे तिकीट बनविले आहे. त्वचाविकारावर बहाव्याची पाने अत्यंत गुणकारी असून, भाजल्यामुळे होणाऱ्या जखमेवरदेखील यांचा वापर होतो. कोरडा खोकला तसेच ताप यावरदेखील ही पाने औषधी म्हणून वापरतात. बहाव्याची साल आणि मुळंदेखील औषधात वापरली जातात. सर्दीमुळे वाहणाऱ्या नाकाला बहाव्याच्या मुळाची धुरी दिली असता तात्काळ फरक पडतो. बहाव्याची मुळेदेखील तापावर गुणकारी आहेत.

🌳 लाकडाचा वापर
बहाव्याचे लाकूड अत्यंत टणक असून, ते वजनाला जड असते. शेतीची अवजारे, चाके, टेबल, खुर्च्या बनविण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. तसेच सरपणासाठीदेखील हे लाकूड वापरले जाते.

🌿 सौंदर्याचे प्रतीक
या प्रकारे बहावा हे झाड सौंदर्याचे प्रतीक आहे. प्रत्येकाने हे झाड आपल्या शेतात, दारात, बांधावर किंवा जेथे जागा असेल तेथे लावलेच पाहिजे. हे झाड आपल्या घरच्या सौंदर्यात भर पाडणारे आहे. ज्यावेळी आपण हे झाड फुललेले पहाल त्यावेळी आपण याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. कारण एप्रिल – मे महिन्यातील रखरखत्या, कडक उन्हामध्ये याची फुले मनाला शीतलला प्रदान करतात.
(🌱 बहाव्याला ‘नेचर इंडीकेटर’ तसेच ‘शाॅवर ऑफ द फाॅरेस्ट’ असेही म्हणतात. या झाडाच्या फुलधारणेवरून पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो.)

4 thoughts on “‘बहावा’ : सौंदर्याची नैसर्गिक खाण

  1. खूप छान माहिती दिलीत धन्यवाद, याची रोपे कूठे मिळतील, आपलया लोकल नर्सरी मध्ये असतील…गावाच्या दुतर्फा रस्त्यावर लावण्याचा विचार आहे

  2. मुरलीधर बेलखोडे निसर्ग सेवा समितीवर्धा says:

    खूप छान माहिती दिली.आम्ही सुद्धा आपल्याशी सहमत आहोत.ही झाडे दुर्मिळ होत आहे त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे.आम्ही बहव्याची खूप झाडे लावली आहे, व त्याची रोपाची नर्सरी केली आहे. वीस वर्षे पूर्वी लावलेली झाडे आज छान बहरलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!