krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

भावकी… गावकी…! 👨‍👨‍👦‍👦

1 min read
या दोन वर्षांत जगात खूपच बदल झाले. तसे सगळे काही हळूहळू बदलतच होते. पण या कोविड काळात खूपच झपाट्याने आणि खूपच अनपेक्षित बदल झाले. टीव्हीमुळे जगभरातल्या कोविडच्या भयकथा व शोकांतिका खेडोपाडी कळल्या. भयभीत झालेले सामान्य लोकं, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांची सेवा करणारे, सोयी पुरवणारे काही असामान्य लोकं आणि त्याही परिस्थितीत स्वतःच्या पांढऱ्या धोप कुडत्याकोटाचे खिसे भरणारे अमानुष लोकं सगळीकडे दिसत होते. सगळ्यात मन बधीर करून टाकणाऱ्या घटना म्हणजे रोजगारासाठी शहरात गेलेल्यांची पुन्हा गावाकडे धाव.

लाखोंच्या संख्येत त्या लोकांचा‌ प्रवास….. तोही पायी चालत. महिनोमहिने सुरू होता. टीव्हीवर या मरणाकडून जगण्याकडे जाणाऱ्या लाखो लोकांना बघून ग्रामीण भागात एक चर्चा सुरू होती. ‘हे इतके लोकं आपापली गावं सोडून का गेले असतील? आता गावी परतल्यावर ते काय करतील? शेतीशी मुळीच संबंध नसलेल्या चर्चाबहाद्दुरांनी ‘त्यांना शेतीवर काम करून रोजगार मिळेल! शेतकऱ्यांना कमी मजुरीत जास्त काम करून घेता येईल’ असे सांगून सुद्धा टाकले. पण ग्रामीण महिलांना त्या‌मागचे कारण उमगले. ‘भावकी आणि गावकी’ने तोंड फिरवले तर भाकर पाण्यासाठी परक्या मुलखात जावे लागते.

👨‍👨‍👦‍👦 भावकी
90 टक्के लोकं शेतीशी संबंधित होते. तेव्हापासून शेती, शेतकरी, शेतमजूर, अलुते, बलुते आणि पांढरपेशे यांची एक‌ व्यवस्था होती. तिच्यात काही दोषही तयार झाले होते. तरीही ती एक व्यवस्था होती. शेतकरी ‌कुटुंब हे त्याचं केंद्र. चार पाच पिढ्यात एका घराची अनेक घरे झाली. पिढी दर पिढी शेतीचे तुकडेही झाले. तरी आजही शेतकरी कुटुंबे शेतीच्याच गावी राहतात. हा कुटुंबाचा विस्तार म्हणजे ‘‌भावकी’. जवळपासच्या गावात शेतकरी कुटुंबातच सोयरिकी झाल्या. लेकी आपापल्या घरी गेल्या. इकडे नव्या सुना आल्या. कुणी शाळा कॉलेज शिकलेल्या, कुणाला शिलाई काम येतं, कुणाला कशिदाकारी, कुणी सुगरण कुणी गोड गाणारी. वावरातली कामं मात्र सगळ्यांना येतात. जीव झोकून त्या कामही करतात. पण आपल्या पोराबाळांनी शाळा शिकावी आणि शिकून शेती बाहेर पडावे, यावर सगळ्यांचं ठाम एकमत.

कष्ट करत, कर्ज घेत, कधी फेडत, कधी नाईलाजाने बुडवत, शेती सुरू राहिली आहे. ‘कुणी बरं तर कुणाचं नाही खरं’ अशी स्थिती असते. भावकीत भांडणं होतात, मारामाऱ्या सुद्धा होतात. तरीपण भावकीतला एकोपा टिकून असतो. कारण कुटुंबातल्या महिला कुटुंबाचे रिवाज कटाक्षाने पाळतात. कुठे अखजी (अक्षय तृतीया), कुठे बैलपोळ्याची संध्याकाळ, कुठे महालक्ष्म्या, तुळशीचं लग्न, संक्रांतीचा तिळवा अशा एखाद्या दिवशी सगळ्या जुन्या नव्या सासुरवाशीणी एकत्र येतात. साध्या जेवणाचा उत्सव करतात. या कार्यक्रमाला भावकीतल्या सगळ्या जणींनी यायचं असतं. दुर्दैवाने एखादीचं कुंकु, गळसरी हरवलेलं असलं तरी तिला कुणी वगळत नाही. मारुतीच्या पारावरचा स्वयंपाक हा खूप उत्साहाचा, आनंदाचा, एकत्र येण्याचा प्रसंग असतो. कुणाचा रुसवा, अबोला ‌झाला असेल ‌तर तो संपतो. पुन्हा मैत्री हौते. भावकीत म्हाताऱ्यांचं एक वेगळं स्थान असतं. त्यांच्या अनुभवांच्या श्रीमंतीचा मान असतो. भावकीतल्या कुणालाही ‘सरळ‌’ करण्याचा अधिकार या वाकलेल्यांना असतो.

अंगणातल्या वाळवणाची राखण, वावरात गेलेल्या लेकीसुनांच्या चिल्यापिल्यांच, ,वडा पिंपळाच्या सावलीतलं पाळणाघर, यावर‌ अजूनही मोठ्या मायचीच काळजी भरली नजर असते. पेरण्यांची निंदणाची वेळ वखत सांभाळायला शेतकरणी एकमेकींच्या वावरात लगबगीने जातात. पिकं हाताशी येताहेत म्हणताना पावसाचा, गारपीटीचा धाक असतो. अशावेळी कापूस वेचायला, गहू, हरबरा सवंगायला एकमेकींचा आधार असतो. कणीक, पिठाचीच काय, खता बियाण्यांची सुद्धा आपसात उधारी उसनवारी चालते. या साली इतका कापूस झालाच पाहिजे, एवढी तरी तूर झालीच पाहिजे. गव्हा हरभऱ्यावर कर्ज फेडूनच टाकू, अशा जबरदस्त इच्छेने सगळ्याच कष्ट करत असतात. आपल्या शेतमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे, तरच कर्ज फेडता येईल असा विचारही काहीजणी एकमेकींच्या मनात‌ पेरून देतात.

पाणवठ्यावर धुणं धुताना, पाणी भरताना, वावरात निंदताना एकमेकींच्या मनातली सुख ‌दुःख ऐकली सांगितली जातात. दारू‌ जुगारामुळे झालेली दुर्दशा, मुलामुलींच थांबलेलं शिक्षण घरातल्या बायकांच्या आरोग्याची हेळसांड अशा‌ दुःखाला तिथे वाचा फुटते तर सुपारीच्या खांडाचही व्यसन नसलेला नवरा, घरच्या परिस्थितीची जाणीव ठेवून शिक्षण घेणारी मुलं अशा सुखावणाऱ्या गोष्टींची उजळणी होते. पावसाने साथ‌ दिल्यामुळे झालेलं ‌भरपूर उत्पादन आणि चक्क चांगला भाव मिळाल्याचा चमत्कार, कुठे जुळलेल्या तर कुठे मोडलेल्या सोयरिकी याबद्दल सांगितले जाते. पत्ते कुटताना आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या राजकारणावर मोठमोठ्या गप्पा करताना माणसांना घरावावराचा विसर पडतो. पण शेतकरणींना घर, घरातली माणसं, वावर, वावरातली कामं सगळं सांभाळायच असतं. त्यासाठी एकमेकींची साथ हवी असते. जिथे घरधन्याची पूर्ण साथ असते, तिथे
कष्टाचंही चीज होतं.

आजकाल सगळ्यांच्या मनात न सांगता येणारी एक भीती असते. घरातल्या ‌कर्त्या माणसाने आत्महत्या केली तर? दुष्काळ, दुबार पेरणी, पुराचा फटका, बोंडअळी, चक्रीभुंगा, नापिकी, बॅंकेचं कर्ज… या सगळ्यांशी पदर खोचून लढणारी शेतकरीण त्या एकाच गोष्टीला भयंकर भीते. भावकीत असं काही घडलं तर सगळ्याजणी कासावीस होतात. भेट द्यायला ‌येणाऱ्या साहेबांची, पुढाऱ्यांची त्यांना चीड येते. साहेब किंवा पुढारी अशा थाटात मदत देऊ करतात की, जणू त्यांच्या खिशातूनच पैसे देणार आहेत. दर मिनिटाला फोटो काढले जातात. टीव्हीवाला तिला विचारतो ‘तुमच्या नवऱ्याने आत्महत्या केली. तुम्हाला काय वाटतं?’ ….’आमची मजाक करणाऱ्या तुम्हा सगळ्यांना जित्तं गाडावं वाटतं’ असं मनात येऊनही ती बोलत नाही. तिचा हुंदका सुद्धा गळ्यात अडकतो. घरापुढे गंभीर सुतकी चेहरे करून बोलणारे ते ढोंगी गाडीत बसताच रुमालाने शेतकऱ्याच्या आत्महत्येचं
प्रकरणच पुसून टाकतात. सरकारी मदतीसाठी अनेक कागदपत्रं, घरावावरातली कामं सोडून कचेरीतले हेलपाटे, आत्महत्याग्रस्त शेतकरीण म्हणून निरखून बघणाऱ्या वेगवेगळ्या नजरा! या सगळ्यात वेळेवर मदत झाली तर भावकीचीच होते. भावकीत सगळेच भरडल्या गेलेले… कोणी किती आणि कितीदा मदत करायची? भावकीत प्रेम आहे. मैत्री आहे. जिव्हाळा आहे, मदत करण्याची मनापासून इच्छा आहे. पण त्यांचीही ओंजळ रिकामी आहे. कारण तेही शेतकरी आहेत.

👨‍👨‍👦‍👦 गावकी
गावकीची गोष्ट वेगळी. काळी कसणारे पांढरपेशांकडे आशेने बघतात. पण ‘एक बळी’ हजार छळी’ ही म्हण आज जास्त खरी वाटते. पाटील, कुलकर्ण्याचं महत्त्व गेलं. आता महत्त्वाचे… पटवारी, ग्रामसेवक, सरपंच, बॅंक मॅनेजर, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे पुढारी. पुर्वी कुलकर्णी, पाटील गावच्या पांढरीतच राहायचे. गावगाडा बरा चालला होता. आता सगळेच सन्माननीय सदस्य. जिल्ह्याच्या नाही तर तालुक्याच्या गावी राहतात. उपकार केल्यासारखे आठवड्या महिन्याने एकदा येतात. मदतीतला आपला हिस्सा काढून बाकीचे शेतकऱ्याच्या हातात देतात. मग ते रस्ते बांधणी असो, घरकुल, संडास असो, कोंबड्या बकऱ्यांच कर्ज असो की, मनरेगा असो.

भावकीतल्या काहींना या नव्या ‘गावकी’त सामील व्हायची संधी मिळाली. संधी‌ साधून ते खुर्चीत बसले. शेतकऱ्याच्याच पोटचे पण मायबापाला विसरले. कधी खोटं बियाणं, खतात झालेली ‌फसगत, विजेचा लपंडाव, चुकीची भरमसाठ वीजबिलं, वीज तोडण्याची भीती, जंगली प्राण्यांचा ‌उपद्रव अशा अडचणी आणि तक्रारी घेऊन शेतकरी संबंधित ‌कचेरीत जातो. मनात आशा असते, दिलासा वाटत असतो,….’इथला माणूस आपल्या भावकीतलाच आहे. आपल्याला मदत होणारच!’ पण खुर्चीत बसल्या बरोबर तो ‘साहेब’ झालेला असतो.

👨‍👨‍👦‍👦 विस्कळीत भावकी-गावकी
भावकी विस्कळीत झाली. गावकी फुटकी आणि फुकटी झाली. शेतकरणीच्या शेतीचा वर्षाचा हिशोब, जमाखर्चाचा ताळेबंद चुकायला लागला. वर्षानुवर्ष चुकल्यावर पोटापाण्यासाठी शहर गाठण्याशिवाय‌ दुसरा ‌पर्याय नव्हता. निरुपाय होऊन शहराकडे गेलेली लाखो कुटुंबे निरुपाय होऊनच पुन्हा खेड्याकडे परतली होती. देशाच्या तुटीच्या, चुकीच्या आणि लुटीच्या अर्थसंकल्पाचा भारतावर झालेला हा परिणाम आहे. इंडियातील अर्थशास्त्रज्ञांना विनम्र अभिवादन!

1 thought on “भावकी… गावकी…! 👨‍👨‍👦‍👦

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!