‘मिडियम’ कांदा टप्प्याटप्प्याने विका आणि ‘सुपर’ कांदा रोखा!
1 min read
🎯 वरील पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक मित्रांच्या विचारार्थ काही निरीक्षणे नोंदवत आहे.
✳️ यंदा देशांतर्गत बाजारात सूपर क्वॉलिटी (Super Quality) मालाची उपलब्धता कमी राहणार आहे, तर गोल्टा-गोल्टी मीडियम (Medium) क्वॉलिटीच्या मालाचा पुरवठा तुलनेने अधिक राहणार आहे. सध्या काय होतंय, की ओल्या बरोबर सुकेही (कोरडे) जळतंय. या न्यायाने मिडीयम क्वॉलिटी मालाचा ‘फ्लो’ (आवक) जास्त प्रमाणात असल्याने तो सूपर क्वॉलिटी मालाच्या रेटलाही (Rate-दर) खाली खेचतो आहे. म्हणून मे अखेरपर्यंत फक्त टिकवण क्षमता कमी असणारा मिडियम क्वॉलिटी माल विकला तर एकूण पुरवठा थोडा बॅलन्स (Balance) राहील व बाजारभावही सन्मानजनक मिळण्याची आशा वाढेल. हाच मुख्य विषय आपल्या सर्वांच्या अवलोकनार्थ ठेवत आहे. त्यावर जरूर व्यक्त व्हा.
✳️ रोगराईमुळे, वीजटंचाईमुळे कांदा पिकाचे नीट पोषण न झाल्यामुळे गोल्टा-गोल्टी जास्त पिकलाय, आणि त्यातला काही माल साठवण योग्यही नाही, म्हणून असा माल मे अखेरपर्यंत अपरिहार्यपणे शेतकरी विकत राहतील. अशा वेळी सूपर क्वॉलिटीचा माल जर बाजारात येत गेला तर दोन्हींच्या रेट (दर)ला फटका बसेल. म्हणून, ही कोंडी टाळण्यासाठी आपण सामूहिकरित्या काही निर्णय़ घेवू शकतो का मे अखेरपर्यंत टिकवण क्षमता कमी असलेला ‘मिडियम’ कांदा टप्प्याटप्प्याने विका आणि सुपर कांदा रोखा’ अशी स्ट्रॅटजी (Strategy) योग्य राहील का? याबाबत गांभीर्याने विचार करा आणि योग्य निर्णय घ्या.
✳️ ‘मंदीच्या मानसिकेत राहू नये’. यंदा देशात उन्हाळ कांद्याच्या क्षेत्रात वाढ जरूर आहे. पण एकरी उत्पादकतेही कमाल घट आहे. परिणामी, एकूण देशांतर्गत पुरवठा गेल्या वर्षाइतकाच राहण्याचे प्राथमिक अनुमान आहे. दुसरीकडे, यंदा कोरोना प्रतिबंध नाहीत, हॉटेल्स सुरू आहेत. लग्नसराई जोरदार आहे. निर्यातीसाठीही सध्याच्या रेटला चांगली पडतळ आहे. सारांश, यंदा देशांतर्गत उन्हाळ ‘क्रॉप साईज’ जवळपास गेल्या वर्षीइतकी आहे तर तुलनेने कांद्याची मागणी व उठाव मात्र चांगला राहणार आहे. म्हणून एक शेतकरी म्हणून आपण तरी मंदीच्या मानसिकतेत राहू नये.
✳️ जाता जाता काही ताजी निरीक्षणे – अल्वरपासून ते चित्रदुर्गपर्यंत येत्या खरीप कांद्याबाबत शेतकरी फारसे उत्साही नसल्याचे रिपोर्ट मिळत आहेत. सलग तीन वर्ष अतिपाऊस व बुरशीजन्य आजारांमुळे अर्ली खरीप कांदा पीक फेल (Fail) जात असल्याने तिथे फारसा उत्साह दिसत नाहीये. आपल्याकडे धुळे तालुक्यात सर्वप्रथम खरीपाचे उळे टाकले जाते. तिथेही यंदा खरीपात मक्याकडे (Maize) कल दिसतोय आणि त्यानंतर रांगडा कांद्याचा विचार शेतकरी करत आहेत.
✳️ मार्च ते आज अखेर कांदा बाजार बाजार नरमाईत राहण्याचे कारण आपल्याला माहितीच आहे. देशभरात यंदा लेट खरीप (लाल) खूपच लेट झाला. (या दरम्यान आगाप उन्हाळ कांदाही बाजारात येत आहे). महाराष्ट्रासह राजस्थानातील शेखावटी रिजन असो वा पश्चिम बंगालमधील सुखसागर. सिजन लेट झालाय आणि एप्रिलमध्येही या लाल मालाने उन्हाळ मालाबरोबर स्पर्धा केलीय. रिटेल मार्केटमध्ये आजही लाल कांदा सर्क्युलेशनमध्ये आहे. रिटेलमधून लाल कांद्याचा भर जसजसा ओसरत जाईल, त्याप्रमाणात सुपर क्वॉलिटी उन्हाळ मालाची पडतळ उंचावण्याची अपेक्षा आहे.
🎯 तर मुख्य विषय, ‘मिडियम टप्प्याटप्प्याने विका आणि सुपर रोखा’ यावर जरूर तुमचे मत व्यक्त करा.. जर सर्वानुमते ठरले, तर असे आवाहन व्यापक स्वरुपात करता येईल.