चुलीचा अर्थसंकल्प
1 min readपण,
❇️ दरवर्षी अर्थसंकल्प तुटीचाच (Deficit Budget) का?
❇️ या तुटीला जबाबदार कोण?
❇️ आजतागायत तूट भरून का निघाली नाही?
❇️ तूट कधीच भरून येणार नसेल तर अर्थसंकल्प सादर करताना गाजावाजा का?
❇️ सादर करणाऱ्यांना त्यात काहीच वावगे किंवा अपमानास्पद वाटत नाही का?
❇️ तूट भरून काढण्याचा संकल्प नसतो का?
❇️ सरकारी कर्मचाऱ्यांच्या (Government employees) वेतनवाढीचा त्याच्याशी काहीच संबंध नसतो का?
❇️ दरवर्षी वेतन आयोग (Pay Commission) वेतनवाढीची खैरात वाटतो आणि दरवर्षी अर्थसंकल्प तुटीचाच सादर होतो याचा अर्थ काय?
©️ व्यवहार्य अर्थसंकल्प
35 वर्षांपूर्वी आमच्या गावात टीव्ही आला, तेव्हा त्यावर सादर होणारा अर्थसंकल्प आणि त्यावरची चर्चा आम्ही गावातल्या बऱ्याच जणी बघत होतो. त्यातले इंग्रजीच काय हिंदी आणि मराठी भाषेतले अनेक शब्द आम्हाला अगम्य होते. आजही आहेत. मात्र या अर्थसंकल्पातली तूट शेतीच्या लुटीनेच भरून निघते हे तेव्हापासून जाणवत होते. आज ते ठाम मत झाले आहे. वीज बिल (Electric bill) वसुली प्रकरणाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. या मंत्र्यांच्या अर्थसंकल्पापेक्षा मला माझ्या शेतकरी मायबहिणींचे अर्थशास्त्र (Economics) त्यांचा चुलीचा अर्थसंकल्प (Budget) खूप व्यवहार्य (Viable) म्हणूनच आदर्श (Ideal) वाटतो. उत्पन्नात तूट असूनही शेतकरणीचा अर्थसंकल्प शिलकीचा असू शकतो. कारण तिच्या दृष्टीने वेळ आणि कष्ट पैशाइतकेच महत्त्वाचे आहेत. पैसा वाचवायचा असेल, वाढवायचा असेल तर वेळेचे नियोजन (Time planning) हवे आणि योग्यवेळी कष्टाची तयारी हवी. हा तिच्या अर्थशास्त्राचा मूळ विचार.
©️ आयजीच्या जीवावर बायजी उदार
असा फुकटेपणा तिच्या अर्थसंकल्पात नसतो. अर्थसंकल्प अंमलात आणताना ती स्वतःच्या वेळेचं आणि कष्टांच विचार करून नियोजन करते. शेतातल्या कामाचे वेळापत्रक पाऊस (Rain) ठरवतो. म्हणून ती पावसापूर्वीच स्वतःच्या कामाचे वेळापत्रक ठरवते. उन्हाळ्यात कैरीचे खवले, भाजीच्या खुला बरोबर कुरोड्या, शेवया, सरगुंडे कडक उन्हात वाळवून , स्वच्छ फडक्यात बांधून, घट्ट झाकणाच्या पिंपात ठेवते. उडदा मुगाचा, मटकी बरबटीचा, तुरी हरभऱ्याचा कळणा, आडडाळ स्वच्छ करून ठेवते. ज्वारी, गहू भरडून कण्या आणि सोजी तयार ठेवते. हे तिच्या कुटुंबाचे पेरणीच्या (Sowing) दिवसातले फास्ट फूड (Fast Food) असते. तुऱ्हाट्या पऱ्हाट्यांची ओझी छपरावरून ओसरीत येतात. उन्हाळ्यात सकाळी उठून लाकडाची मोळी आणावी लागते. वावरातून येताना सरपणाचे एक तरी ओझे आणायचे असते. म्हणून चुलीत लाकडं सुद्धा काटकसरीने लावायची असतात. त्याचही एक गणित असतं. स्वयंपाक करताना काय चुलीवर, काय वैलावर शिजवायचं. काय आरावर ठेवायचं, काय निखाऱ्यावर ठेवायचं हे त्या सुगरणीलाच समजतं. कमीत कमी वेळात, कमीत कमी लाकडात सगळा स्वयंपाक करायचा असतो. बजेट सांभाळून घरच्या सगळ्यांच्या आवडी निवडी सांभाळत रांधायचं ( Cooking) असतं.
©️ पाण्याचा काटकसरीने वापर
शेतकरणीच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा (Pot of water) काही गावांत बराच हलका झाला आहे. कुठे कुठे नळयोजना आल्या आहेत. लोडशेडींगशी (Load shedding) सामना करत नळाचं पाणी थोडं का होईना घरापर्यंत येतंय. तरीही अनेकदा डोक्यावर हंडा,कमरेवर कळशी आणि हातात दोरपोहरा अशा थाटात ती दिसते. मग पाणी वापरताना ती काटकसरीने वापरते. ढोरा वासरांना तर भरपूर पाणी लागतं. तिथे काटकसर नाही. मग घरातल्या वापराचं पाणी, नालीतून वळवून अंगणातल्या झाडांना देते. वांगी, मिरची, भेद्र, भेंडी, धोपा, एकट दुकट पपई, लिंबाचं झाड, काकडी, कोहळ्याचा, वालाचा, तोंडल्याचा वेल, कढीपत्ता…. अशी तिची बाग असते.
©️ पैशाची बचत
हे असं घरी असलं की पैसा वाचवता येतो. बाजाराच्या गावाला जाताना ओझं असेल तेव्हांच आटोरिक्षा नाही तर पैदलच….हाही तिचा नेम असतो. अंगणात कोंबड्यांचा एखादा तरी बेंडा असतो. किडे किटकुले, रुण्या, अळ्या खात पिलं मोठी होतात. विकवाक करून आलेला पैसा, तिच्या बँकेत (लसूण जिऱ्याच्या डब्ब्यात) ठेवला जातो. हा पैसा औषध पाण्याला, पोरांच्या शिक्षणाला उपयोगी पडतो.
©️ वेळ आणि कष्टाची किंमत
पावसाळ्याच्या दिवसात झड लागली तर वावरात जाता येत नाही. मग सुईसूत घेऊन जुन्या कपड्यांवर ती कला
कुसर करते आणि नवीन वाकळ तयार होते. ठिगळं लावण्याची तिची कलाच वेगळी. वाकळीचं जोडणी आणि रंगसंगतीचं ‘डिझाईन’ फार सुंदर असतं. पूर्वी सुतीच कपडे असत. त्यामुळे वाकळ, गोधडीला उब असायची. आता टेरेलिन, टेरिकॉट…..त्या गोधडीला ना रूप, ना उब! वेळेची आणि कष्टांची ‘किंमत’ तिला माहीत आहे. म्हणून ती वेळ आणि कष्ट फुकट जाऊ देत नाही.
©️ शिलकीचा अर्थसंकल्प
शेतातले निंदणाचे कष्ट तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी होत आहेत. त्यामुळे वाचलेला वेळ आणि शक्ती ती काही तरी चांगलं, नवीन शिकण्यासाठी वापरते आहे. घरातल्या इतरांसाठी कष्ट, वेळ आणि पैसा सुद्धा ती खर्च करते. स्वत:साठी मात्र काटकसर आणि बचत. शेतकऱ्याला उत्पादन कितीही झाले तरी उत्पन्न तुटपुंजेच होते. तरीही शेतकरीण आपल्या अर्थसंकल्पातील तरतुदींनी बचत करून, कष्ट आणि वेळेचे नियोजन करून ‘चुलीचा अर्थसंकल्प’ शिलकीचा करते. चुकीचा, तुटीचा आणि लुटीचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्यांना ते केव्हा कळेल?
प्रज्ञा ताई आपण खरोखरच या देशाचा व राज्याचा अर्थसंकल्प मांडणाऱ्यांच्या लालम-लाल मुस्कित मारलीय ,स्वताच्या घरच्या तीजोऱ्या भरणाऱ्या राज्य कर त्यांच्या असला अर्थसंकल्प पचणी लागेल तरी ❓जेव्हा लागेल तेव्हा ‘तुटिचा अर्थसंकल्प’ ही बाब उरणार नाही.