krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

गेम इज ओव्हर…आपलं आयुष्य इथपर्यंतच होतं…

1 min read
Farmers Suicide : शेतकऱ्याच्या मागं आपण कधीच येणार नाही परत... गेम इज ओव्हर... आपलं आयुष्य इथपर्यंतच होत... इथून पुढं आयुष्य नाही... कारण शेतकरी नामर्द आहे... आपण शेतकऱ्याच्या जन्माला परत कधीच येणार आहे... सरकारसुद्धा शेतकऱ्याच्या नादाला लागत नाही.... शेतकऱ्यांचा कधी विचार करणार नाही सरकार हे... जोपर्यंत शेतकरी आहे, तोपर्यंत सरकार नाही... ...टण्णकन आलेला डब्ब्याचा आवाज... जगातला सगळ्यात अस्वस्थ करणारा व्हिडीओ 4 मार्च 2022 पासून समाज माध्यमात (Social Media) फिरतोय.

👉 वीज बिल आणि शेतकरी आत्महत्या
19 मार्च 1986 व 5 मार्च 2022 या दोन तारखांना शेतकरी समाजाच्या इतिहासात (History of the farming community) अत्यंत महत्त्व आहे. या दोन्ही दिवशी वीज महावितरण कंपनीचे (महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ) पैसै (वीज बिल – Electricity bill) न देऊ शकल्याने वीज पुरवठा तोडल्यामुळे साहेबराव करपे या स्वाभिमानी सधन शेतकऱ्याला अपमान सहन झाला नाही. त्यांनी आपल्या कुटुंबासह विष खाऊन आत्महत्या (Suicide) केली. या घटनेला 36 वर्ष पूर्णर्ण होत असतानाच पंढरपूर (जिल्हा सोलापूर) जवळच्या सूरज जाधव या तरुण शेतकऱ्याने वीज बिल न भरल्याने महावितरण कंपनीने वीज पुरवठा तोडल्यामुळे पीक जळत असल्याने हतबल होऊन समाज माध्यमांवर (Social Media) लाईव्ह (Live) जात विष प्राशन करून आत्महत्या केली.

👉 आत्मघाताची शृखंला
साहेबराव करपे यांनी सुरू केलेली ही आत्मघाताची शृखंला (Suicide chain) सूरज जाधवपर्यंत येऊन पोहचली. 19 मार्च, शेतकरी इतिहासात ज्ञात असलेली पहिली सहकुटुंब शेतकरी आत्मघाताची घटना घडली. त्या घटनेच्या आधीही कदाचित खूप घटना घडल्या असतील. पण त्यासमोर आल्या नाहीत. शेतकरी आत्महत्या कधीच समोर येत नाही. कारण ती अपयशी योध्द्याची (Failed warrior) हाराकिरी असते. चीनमध्ये जेव्हा योध्दा लढाईत हारतो, तेव्हा तो अज्ञात ठिकाणी जाऊन आपला जीव देतो. या योध्द्यांना चीनी समाजात मोठा मान असतो. पण भारतात ही नित्यनियमाने लाखो अन्नदाते आपल्या युद्धभूमी (Battlefield) असलेल्या शेतात आपला जीव देतात. पण सगळेच त्यांना नामर्द समजतात. अगदी जीव देणारा शेतकरीसुद्धा आपण नामर्द आहोत, हेच समजून जीव देतो.

👉 शेतीपेक्षा कचरा उचलण्याची नोकरी बरी!
जगात सगळ्यात धंद्यातील लोकांना आपण करत असलेला धंदा आपल्या लेकराबाळांनी पुढे चालवावा, असे वाटत असते. पण शेती हा एकमेव धंदा आहे, जो आपल्या लेकरांनी करू नये, यासाठी शेतकरी जीव तोडून प्रयत्न करत असतो. शेतकऱ्याच्या पोराला अगदी नगर पालिकेत (Municipality) कचरा (Garbage) उचलायची नोकरी (Job) जरी लागली तरी तो अत्यानंदीत होतो.

👉 शेती करणे म्हणजे समायोजन
आत्महत्या करताना सूरजने तर सांगूनच टाकलं की, तो पुन्हा शेतकऱ्याच्या जन्माला येणार नाही. काय असतो शेतकऱ्याचा जन्म…? माझा एक मित्र म्हणतो शेती करणे म्हणजे रोज बलात्कार सहन करण्यासारखंआहे. शेती करणे म्हणजे समायोजन बोली भाषेत ‘अँडजेस्टमेंट’! (Adjustment) ज्याला काहीच जमत नाही, त्याने शेती करायची. शेती करताना काहीच तुमच्या हातात नसतं. सगळा ‘गेम’ (Game) कोणीतरी दुसरंच नियंत्रित (Controlled) करत असतं आणि तुम्हाला तो खेळावाच लागतो. हा गेम तुमच्या सगळ्या क्षमतांचा (Of abilities) कस लावणारा असतो. मग कधी कधी गेम इज ओव्हर (Game is over) होतो…. जिथे अँडजेस्टमेंट संपते तिथे तो ओव्हर होतो. अँडजेस्टमेंट करून करून तरी किती करणार… मग सांगून टाकायचं… आपण शेतकऱ्याच्या जन्माला कधी परत येणार नाही. आपण हरलो, आपण नामर्द आहोत म्हणून… सरकारसुद्धा शेतकऱ्याच्या नादाला लागत नाही.
सरकार हे चालतंच शेतकऱ्यांनाच्या जीवावर! ते कशाला लागेल शेतकऱ्याच्या नादाला? खरंच आहे, सरकार कधीच शेतकऱ्याचा विचार करत नाही. सरकार विचार करत ते देशातील 130 कोटी खाणाऱ्या फुकट्या मतदारांचा! कितीही श्रीमंत मतदार असला तरी भाडखाऊला शेतीमाल (Agricultural commodities) फुकट हवा असतो. कालच एका खासदाराने महागाई वाढली म्हणून संसदेत हंबरडा फोडला. एक जात सगळे भडवे! साले मतदारांचा विचार करतात. एकदा तुरीचा प्रश्न गंभीर झाला होता. तेव्हा देशाचं धोरण ठरवणाऱ्या एका नेत्याला बोलताना डाळीच्या अनावश्यक आयातीवर (Import) विचारलं. तर त्याने सांगितले की, ‘सरकार (Government) म्हणून विचार करताना देशातील सगळ्या नागरिकांना (Citizen) योग्य प्रोटीन (Protein) मिळावे, यासाठी विचार करावा लागतो. फक्त उत्पादकांचा (Agricultural producers) विचार करुन चालत नाही.’
सरकार समस्या क्या सुलझाए,
सरकार ये ही समस्या है।

👉 शेतकऱ्यांचा खरा शत्रू हा सरकारच
सूरजची आत्महत्या असू दे किंवा साहेबराव करपेंचा सामूहिक आत्मघात. देशभरातील सगळ्या शेतकरी कुटुंबातील आत्महत्या या सरकारी धोरणांमुळे झालेले हत्याकांड आहेत. सरकारी विभागानने वीज पुरवठा तोडल्याने या दोन्ही आत्महत्या झाल्या आहेत. प्रत्येक शेतकरी आत्महत्येला सरकारच दोषी आहे. सरकार शेतकऱ्याला सुखाने व सन्मानाने जगू देत नाही.
हे सगळ लिहिताना मनात प्रचंड राग, चिड व अस्वस्थता आहे. सुदैवाने माझं पोट शेतीवर नाही. मी मागे माझ्या वडिलांनी साठी एक कविता लिहिली होती.
धन्यवाद देवा मी सिरीयात जन्मलो नाही नाही तर मी युद्धात मेलो असतो.
धन्यवाद बाबा मी तुमच्यामुळे शेतकरी झालो नाही नाही तर आत्महत्या करून मेलो असतो.
लहानपणापासून मी शेतकऱ्यांच मरण मी सतत पाहिलं आहे. नैसर्गिक मरणापेक्षा (Natural death) माझ्या मित्रांचे वडील, काका, मामा, भाऊ आता तर मित्र पण यांच्या तर आत्महत्या पाहिल्या. शेतकरी कुटुंबातील मुलींच्या आत्महत्या सामान्यतः त्या हुंडाबळी समजल्या जातात, पण त्या ही शेतीच्या अपयशाच्याच आत्महत्या आहेत. बापाने जीव देऊ नये म्हणून पोरी स्वतःच जीव देतात.

👉 शेतकरी आत्महत्या एक सुप्त युद्ध
सध्या युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. तिथे जसं कोणाच्याच मरणाचा भरवसा नाही, तसं इथे एक सुप्त युद्ध (Latent war) सुरू आहे. जे अनेक वर्षांपासून सुरू आहे, जिथे कोणाच्याच जगण्याचा भरवसा नाही. कोण कधी कडूनिंबाला, बाभळीला लटकून (Hanging) घेईल, कोण कधी वळणात विष (Poison) पिऊन पडेल, कोण स्वतःला उसासगट फुकुन घेईल, काही सांगता येत नाही.
आपण संवेदनशील आहोत. आपण या सगळ्यावर अस्वस्थ होतो. आपल्याला चिड येते, राग येतो, संताप होतो.
पण आपण काही करू शकत नाही
कारण आपणच खरे नामर्द असतो…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!