माती जिवंत तर शेती जिवंत!
1 min readजागृतीची आवश्यकता
कृषी विद्यापीठाच्या विशेष प्रयत्नामुळे सुधारीत, संकरित बियाणे, खते व कीटकनाशकांच्या वापरात वाढ झालेली आहे. त्याच पद्धतीने आता आपण सर्वांनी शाश्वत शेतीच्या विकासासाठी शेतकऱ्यास जमिनीचे महत्त्व व अधिक उत्पादनासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे, याबाबत जागृत करण्याची आवश्यकता आहे. जमीन ही चिरंतर उत्पादकाभिमुख ठेवण्यासाठी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना व शेतकऱ्यांना जाणीव करून देणे गरजेचे झालेले आहे.
आरोग्यपत्रिकेचे महत्त्व
जमिनीच्या आरोग्यपत्रिकेच्या माध्यमातून जमिनीचे रासायनिक गुणधर्म स्थिती कळते.
प्रमुख अन्नद्रव्याची पातळी ( नत्र, स्फुरद, पालाश).
दुय्यम अन्नद्रव्याची पातळी ( गंधक, कॅल्शियम, मॅग्नेशियम).
सुक्ष्म अन्नद्रव्याची पातळी (लोह, जास्त, तांबे, मंगल, बौरान).
आरोग्यपत्रिकेच्या अहवालानुसार पिकांना खतमात्रा देणे सोयीस्कर जाते.
रासायनिक खते, पाण्याचा अनिर्बंध वापर
गेल्या 50 वर्षात रासायनिक खतांचा आणि पाण्याचा अनिर्बंध वापर झाला. त्यामुळे लाखो हेक्टर जमीन नापीक झाली. रासायनिक खतांच्या वापरामुळे मोठा फायदा होतो, असे प्रारंभी दिसले खरे, परंतु लहान मुलांची प्रकृती लक्षात न घेता खाद्यपदार्थाचा आणि विटामिन्सचा मारा केला तर त्याची प्रकृती सुधारण्याऐवजी बिघडत जाते, तसाच काहीसा प्रकार शेतजमिनीच्या बाबतीत झाला. जमीन सुधारण्याऐवजी जादा उत्पादन मिळण्याऐवजी पिकाला आवश्यकतेपेक्षा जास्त खत दिल्यामुळे जमीन बिघडली. उत्पादन कमी येऊ लागले. त्याचबरोबर खरोखरच आवश्यक असलेल्या सेंद्रिय खतांकडे दुर्लक्ष झाले. पाटाचे पाणी परत केव्हा मिळेल याची खात्री नसल्यामुळे ते मिळाले की, पिकाला आवश्यकता नसतानाही जड पाणी दिल्याने जमिनीत क्षाराचे प्रमाण वाढत गेले. त्या जमिनीत पुढे पीक येईनासे झाले. जमीन नापीक झाली, क्षारपड झाली. खते आणि पाणी यांच्या अधिकाधिक वापराने अधिकाधिक उत्पादन घेण्याची हाव नडली. अतिरेक अंगलट आला. हरितक्रांतीच्या यशाच्या नादात शेतजमिनीचे आजारपण फार उशिरा लक्षात आले. दोहनऐवजी जमिनीचे शोषण झाले. अशा निसत्व केलेल्या जमिनीतून येणारे पीकही सत्वहीन झाले. त्यावर जगणारे आपणही सत्वहीन झालो तर नवल कसले?
लागवड योग्य क्षेत्रात घट
देशाच्या लोकसंख्येत होणारी झपाट्याने वाढ, या वाढत्या लोकसंख्येचा शेती क्षेत्रावर पडणारा भार, वाढते शहरीकरण, उद्योग व्यवसायाकरिता शेतजमिनीचा वापर, यामुळे लागवड योग्य क्षेत्रात घट होत आहे. जागतिक हवामान बदलात होणारी गारपीट, थंडी, अवकाळी पाऊस, तापमानातील चढ-उतार, यामुळे मातीवर परिणाम होत आहे. अमर्याद सिंचन, रासायनिक खते, कीडनाशकाच्या अमर्याद वापराने माती प्रदूषित होत आहे. जमिनीची धूप होऊन सुपीक मातीचा थर वाहून जातोय.
खालावत चाललेला पोत एक आव्हान
एकीकडे लागवड योग्य क्षेत्रात अनेक कारणांनी होत असलेली घट, जमिनीचा खालावत चाललेला पोत हे आजच्या शेतीसमोरील मोठे आव्हान आहे. त्यामुळे शेती टिकवायची असेल तर माती जिवंत राहिली पाहिजे. संयुक्त राष्ट्र संघाने 2015 या वर्षापासून दर वर्षी 5 डिसेंबर रोजी ‘जागतिक मृदा दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. या पाठीमागील प्रमुख उद्देश जमिनीच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि त्यावरील उपाययोजना यासंदर्भात शेतकऱ्यांनामध्ये जाणीव निर्माण करणे हा होय.
सुपिकता व उत्पादकतेवर विपरीत परिणाम
सद्य परिस्थितीत मातीच्या आरोग्याकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याने जमिनीच्या सुपिकतेवर आणि उत्पादकतेवर विपरीत परिणाम झाला आहे. दरवर्षी हेक्टरी 16 टन माती वाहून जात आहे. जमिनीतील सेंद्रीय पदार्थाचे प्रमाण अत्यंत कमी (0.03 टक्क्यापर्यंत) झाले आहे. यामुळे मातीमध्ये विविध प्रकारच्या अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येते. याचा विपरीत परिणाम मानवांच्या जनावरांच्या आणि सुक्ष्मजीवांच्या आरोग्यावर होत आहे. जागतिक स्तरावर या बाबींची प्रकर्षाने नोंद घेतली गेली आहे. अन्नसुरक्षा आणि सुरक्षित अन्न दोहोमध्ये संतुलन साधण्याकरिता मातीचे आरोग्य जपावेच लागेल. माती जिवंत असेल तर शेती जिवंत राहील. याकरिता येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात सेंद्रीय पदार्थाचा वापर करावयास हवा. पीक उत्पादनाकरीता जमिनीची ऊत्पादनक्षमतेनुसार, काटेकोर आणि कार्यक्षम वापर होणे गरजेचे आहे. यासाठी माती आणि पाणी परिक्षण करून त्या नुसार रासायनिक खतांचा वापर व्हायला हवा. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेत जमिनीची आरोग्यपत्रिका तयार करून घेणे आवश्यक आहे.
राज्यातील जमिनी नापीकी होण्याची प्रमुख कारणे
रासायनिक खतांचा असंतुलित वापर.
पाण्याचा अतिरिक्त वापर.
सेंद्रीय खतांचा अभाव.
पिकांची फेरपालट न करणे.
जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांच्या वाणांचा वाढता वापर.
पुरेशा अन्नधान्याचे उत्पादन आवश्यक
वाढत्या लोकख्येसाठी पुरेशा अन्नधान्याचे उत्पादन करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. अन्नधान्य हि सकस असले पाहिजे याबाबतीत स्वावलंबी होणे हि जरुरी आहे. त्यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न होत आहेत. शासन हि सतर्क झाले आहे. जमिनीत काय कमी आहे हे आजमावत रासायनिक खतांचा आणि पाण्याचा मारा करण्यापूर्वी झालेली चूक परत होऊ नये म्हणून जमिनीची तपासणी करून ती सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा तपासणीमुळे जमिनीत काय कमी आहे आणि किती कमी आहे हे आजमावता येते आणि ते व तेवढेच देण्याच्या प्रयत्न करता येतो. (क्रमशः)