krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

‘माती व पाणी परीक्षण’ किफायतशीर शेतीची गुरुकिल्ली!

1 min read
Soil and water testing : शेती व्यवसायामध्ये सुपिक जमिनीस अत्यंत महत्त्व आहे. म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीविषयीची सखोल माहिती करून घेणे अत्यावश्यक आहे. आपली जमीन कशी आहे, पाणी कसे आहे, त्यानुसार कोणते पीक घेतले पाहिजे, त्या पिकास कोणत्या अन्नद्रव्यांची केव्हा आणि किती प्रमाणात गरज आहे, जमिनीत किती प्रमाणात अन्नघटक उपलब्ध आहेत, त्याची भरपाई कोणत्या खतामधून भागविता येईल, याचा विचार करताना जमिनीचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे, याचाही विचार करणे आवश्यक आहे.

यशस्वी शेतीचे रहस्य प्रामुख्याने जमिनीतून भरघोस पीक घेणे तसेच जमिनीची उत्पादनक्षमता कायम टिकवून ठेवणे हे आहे. म्हणूनच प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतजमिनीची आरोग्यापत्रिका तयार करून घेतली पाहिजे. आपले आरोग्य दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी नियमितपणे डॉक्टरांकडे सर्व चाचण्या करून त्याप्रमाणे शरीर सुदृढ ठेवतो, तसेच नियमित माती व पाणी परीक्षण ही नियोजनबद्ध, किफायतशीर शेतीची गुरुकिल्ली आहे.

जमिनीची सुपिकता व खतांचा संतुलित वापर

आधुनिक शेतीमध्ये अधिक भांडवल गुंतवावे लागत असल्याने या ठिकाणी माती व पाणी परीक्षणाचे महत्त्व अन्यन्यसाधारण झालेले आहे. माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन केल्याने खतांच्या मात्रेत बचत तर होतेच त्याचबरोबर प्रमाणशीर खतांची मात्रा देता येते. त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढविता येते. तसेच जमिनीचे आरोग्य चिरकाल टिकविण्यासाठीसुद्धा मदत होते. जमिनीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्मांचे संवर्धन लागते. शाश्वत शेतीमध्ये पिकांचे फायदेशीर उत्पादन घेऊन सेंद्रीय व रासायनिक खतांचा संतुलित वापर करून जमिनीची सुपिकता टिकविली जाते. ही जमिनीची सुपिकता आजमिविण्यासाठी मातीची तपासणी करणे आवश्यक आहे.

 रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर

खत व्यवस्थापनामध्ये माती परीक्षणास अनन्यसाधारण महत्त्व आहे. पिकाना संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा होण्यासाठी नत्र, स्फुरद व पालाश या प्रमुख अन्नद्रव्यांसोबत सुक्ष्म अन्नद्रव्यांची देखील आवश्यकता असते. परंतु, गरज असल्यास माती परिक्षणानुसार त्यांचा पुरवठा करता येतो. त्यामुळे पिकाच्या गरजेनुसार रासायनिक खत मात्रा देखील कमी जास्त करता येते. त्यामुळे रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होऊन पिकांचे किफायतशीर उत्पादन घेता येते. त्यामुळे रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होऊन पिकांचे किफायतशीर उत्पादन घेता येते. तसेच अति रासायनिक खते वापरण्यामुळे होणारा शेतकऱ्यांचा आर्थिक तोटा टाळता येतो व जमिनीचे आरोग्य व्यवस्थित ठेवता येते.

माती परीक्षणाचा फायदा

माती परीक्षणामुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्माचा अंदाज येतो. जमिनीच्या रासायनिक गुणधर्मामध्ये सामू, विद्राव्य क्षार उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, सेंद्रीय कर्ब, चुनखडीचे प्रमाण इत्यादी माहिती मिळते. जमिनीतील विद्राव्य क्षारांचे प्रमाण व सामूद्वारे जमीन क्षारयुक्त किंवा चोपण झाली आहे का? याची ढोबळमानाने कल्पना करता येते. जमीन क्षार व चोपणयुक्त झाली असल्यास सेंद्रीय खतांचा व भूसुधारकाचा वापर करणे सोयीचे ठरते. जमिनीच्या भौतिक गुणधर्माद्वारे जमिनीचा पोत, चिकण मातीचे प्रमाण, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, घनता, पाणी मुरण्याचा वेग, निचऱ्याची क्षमता इत्यादी बाबींची माहिती मिळते. तर जैविक गुणधर्मामुळे उपयुक्त तसेच रोगकारक जीवाणूंची चाचणी करता येते.

माती परीक्षणासाठी काय करावे?

🔆 माती परीक्षणासाठी प्रमुख घटकांमध्ये मातीचा प्रातिनिधिक नमुना घेणे. 

माती नमुन्यांचे प्रयोगशाळेत निरीक्षण करणे. 

🔆 माती परीक्षणावर अहवाल तयार करणे. 

🔆 पिकांसाठी खतांच्या शिफारशी ठरविणे. 

क्षार व चोपणयुक्त जमिनी सुधारण्यांचे उपाय सुचविणे, इत्यादींचा समावेश होतो.

राज्याचा मृद सर्वेक्षण अहवाल

राज्यातील कृषी विभागाच्या मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळा विभागातर्फे मागील वर्षी (सन 2020-21) घेण्यात आलेल्या माती तपासणीनुसार

🔆 राज्यातील 10 जिल्ह्यात नत्राचे प्रमाण कमी, 

24 जिल्ह्यात स्फुरदाचे प्रमाण कमी, 

🔆 सर्व जिल्ह्यात पालाशचे प्रमाण अधिक,

 🔆 23 जिल्ह्यात लोहाचे प्रमाण कमी, 

🔆 28 जिल्ह्यात जस्ताचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.

माती परीक्षणाची सोय

राज्यात कृषि विभागाने माती परीक्षणाची सोय सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयी केलेली आहे. याशिवाय कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, साखर कारखाने, रासायनिक खत उत्पादन संस्था व खासगी संस्थांद्वारे माती परीक्षण प्रयोगशाळा राज्यात सर्वत्र उपलब्ध आहे. जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने राज्यातील शेतकऱ्यांना जमिनीच्या आरोग्यपत्रिकेचे वाटप करण्यात आले.

शेतकऱ्यांना आवाहन

शेतकरी बंधुनो, मी या निमित्ताने आपणास आवाहन करतो की, हंगामापूर्वी तसेच नवीन फळबागा पिकांचे नियोजन करताना माती परीक्षण करूनच खतांचे व्यवस्थापन करावे व आपली लाख मोलाची जमिन चिरकाल, चिरंजीवी व शाश्वत ठेवावी अन्नसुरक्षा आणि सुरक्षित अन्न या दोघांमध्ये संतुलन साधण्यासाठी मातीचे आरोग्य जपावे. (समाप्त)

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!