‘महादूध’ प्रकल्पाच्या समृद्धी मार्गात पशुवंध्यत्वाचे अडथळे
1 min read‘पशुसंवर्धन’ ग्रामविकासाचा केंद्रबिंदू
पशुसंवर्धन हाच ग्रामविकासाचा केंद्रबिंदू ही बाब विदर्भ- मराठवाड्यात ‘साय’ ठरू शकेल यादृष्टीने शासकीय प्रयत्न झाले आणि केंद्र शासनानेही सहभाग नोंदविला. मात्र, योजनेतील चुकांबाबत मौन पाळत नवीन काय? याचाच पाठपुरावा झाला. पंतप्रधान प्रोत्साहनातून वाटप झालेल्या जनावरांची संख्या आणि वाढलेल्या दूध उत्पादनाची आकडेवारी सहसा पडताहणे आणि सगळा काथ्याकूट करणे अपेक्षित नाही. देशातील अनेक दुर्गम, अविकसित, निरक्षर भागात प्रचंड वेगाने गतिमान झालेला दूध व्यवसाय विदर्भ-मराठवाड्यात मागे का राहिला? याचे उत्तर महत्त्वाचे ठरते. खरे तर, राज्यात पशुधनाची संख्या या दोन्ही विभागात मोठी आहे आणि शेती हा जीवनाचा मुलाधार आहे. कष्टकरी, शेतकरी यांच्यासाठी दूध व्यवसायाचे तंत्र योग्यप्रकारे समजावता येणे महत्त्वाचे ठरते.
पशुधन वाटप आणि स्वयंनिर्भरता
दूध व्यवसायाला चालना म्हणजे पशुधन वाटप हाच न्याय सर्वच यंत्रणेला आवडणारा आहे, कारण, त्यात भ्रष्टाचाराचा मलिदा खचाखच भरलेला आढळतो. पशुधन वाटपाच्या योजनेचे परिणाम अभ्यासल्यास ही योजना निरंतर सुरू राहावी, असा पायंडा पडला. मात्र, किती कुटुंब त्यात स्वयंनिर्भर झाली, याची संख्या सूक्ष्मदर्शक यंत्रात पाहावी लागते. दारासमोर असणारी गाय गावठी, देशी, स्थानिक म्हणून दुर्लक्षित आणि अर्धवट पोट भरवत ठेवल्यामुळे दूध विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. मात्र, हीच गाय माफक, योग्य पैदाशीत हिरव्या चाऱ्यासह जगवली तर चार-पाच लिटरपेक्षा कमी कधीच नव्हती. एकदा भाकड ठरवली की, सुटका होईपर्यंत दुर्लक्ष अशीच रित दिसून आली.
विज्ञानाचा अवलंब करा
राज्यात बँक व्यवहार, कायदा, हक्क, जाणिवा बदललेली जीवनशैली सहज स्वीकारली गेली. मात्र, जनावरे सांभाळताना विज्ञान समजावून घेण्यात कमीपणाची भावना रुजली. आम्ही किती दिवस जनावरे सांभाळायची? म्हणणारे काळाच्या गरजा न ओळखल्यामुळे मागे राहिले. जनावरे सांभाळताना विज्ञान अवलंबून राज्यात अनेक जण दूध समृद्ध बनले. त्यांच्या यशकथा आणि आदर्श बघताना आनंद वाटतो. दुधाळ जनावरे गोठ्यात असण्यासाठी लाखो रुपये खर्च करून इतर राज्यातून जनावरे खरेदी करता येतात. मात्र, यात नेहमी धोका असतो. दूध संपल्यावर पुन्हा जनावर दुधात कसं आणायचं? हे तंत्र कळलं नाही तर धंद्यातच बुडावं लागतं. घरचे जनावर गाभण केले तर मात्र शून्य खर्चात दूध सुरू होते. पहिले एक दोन वर्ष मेहनतीचे असतात. मात्र त्यानंतर हमखास उत्पादन मिळतं.
जनावराकडे दुर्लक्ष म्हणजे पदरी निराशा
‘जनावरं दूध देतात’ हा समज जोपर्यंत मनात आहे, तोपर्यंत दूध धंदा तोट्यात. मी दूध मिळवतो ही पशुविज्ञान आणि तंत्र माहित असल्याची धमक दूध व्यावसायिक निर्माण करते. योग्य सांभाळ, परिपूर्ण पोषण, सुदृढ आरोग्य आणि प्रजननावर अंकुश म्हणजे मनावर जनावरांच दूध. मात्र, रात्रंदिवस कासेवर डोळा ठेवून जनावराकडे दुर्लक्ष म्हणजे निराशा. माझ्या गोठयात दरवर्षी जनावर विणार/ प्रसूत होणार अशी भिष्मप्रतिज्ञा आणि ध्येयनिश्चिती झाल्यास दुधवाडा निर्माण होईल. मात्र दरवर्षी फक्त 30 जनावरे प्रसूत झाल्याने 70 टक्के जनावरांचा चारा, पाणी, कष्ट, औषध, सांभाळ खर्च आधीच आर्थिकटंचाई असलेल्या कुटुंबात पुन्हा कर्ज वाढतात.
जनावर गाभण कशी करायची?
जनावर गाभण कशी करायची? याला सोपं उत्तर आहे आणि त्यासाठी 10 रुपये खर्च येतो. शिंप्याकडचा मोजमाप टेप जनावराच वजन किती यासाठी उपयोगी पडतो. शरीर वजन वाढत जाणारी जनावर माजावर येतात, गाभण ठरतात. सुलभ वितात आणि दूधही देतात. मात्र, राज्यात असा सोपा मार्ग मूर्खाचा सल्ला. राज्याच्या एकाही पशुसंवर्धन योजनेत शरीर वजनाबाबत शब्दसुद्धा बोलला जात नाही, हे दुर्दैव! नुसत्या गुळावर तेही काळ्या, मागच्या वर्षीचा आणि साठवून मागे पडलेला असला तरी 10 दिवसात धक्का लागून 30 ते 40 200 जनावरे माजावर येतात. पण औषधाशिवाय आणि खर्चाशिवाय माज शक्य असतो, यावर अवलंब न करता आधीच मनात नकार घंटा सुरू असते. अन् महिनोनमहिने उलटली तरी ठरत नाही, अशी तक्रार नेहमी असतेच. वैताग असतो, चिडचिड असते, उपाय लागू पडत नाही आणि जनावरांचा संताप येतो. यात मोठी चूक नेहमी पशुपालकांचीच असते. गोठ्यात थेंबभर पाणी नको, जमीन कोरडी असावी, जनावरे धुणं करावं, हे सल्ले टाळले तर गर्भाशय पू भरलेलं असणारच.
‘कोरडा गोठा अन् मोजा नोटा’
मुक्तसंचार, गोठा, कासदाह आणि गर्भाशय कमी करतो. पण कमी खर्चाचा, शंभर उपयोगाचा सल्ला फूकट जातो. पाणी असलं की, रोगजंतूवाढ हे शाळेतल्या पोराला कळतं. पण गोठ्याची जमीन कोरडीच नाही तर, निर्जंतूक करणारा सूर्यप्रकाश अजिबात वापर न करणार सगळेच तोट्याचे पशुपालक कसे समजावणार? ‘कोरडा गोठा अन् मोजा नोटा’ हे प्रत्येक गोठ्यात ठळक लिहिल्यास अन् अवलंबल्यास निम्मी उलटणारी जनावरं आपोआप गाभण ठरतात. प्यायला पाणी 24 तास, पण डोळ्याचे आसू सुद्धा जमीनवर पडणार नाहीत, इतका कोरडा लागतो. दूधाळ जनावरांना गोठा रोगी वातावरणात कास अन् गर्भाशय निरोगी राहत नाही, हे सांगण्याची गरजच नाही.
पशुधन विज्ञानात सांभाळा
आता शेवटचा भाग माजाचा स्वच्छ बळस आणि दर चार-आठ दिवसाचा माज. फक्त 21 दिवसांनी देणाराच माज खरा असतो आणि गाभण ठरण्यात फायद्याचा ठरतो. उठसूट भरवू नका, माजाच्या तारखा लक्षात ठेवा आणि माजाची खात्री पशुवैद्यकाकडून तपासणीने करा म्हणजे गर्भधारणा. आधी पशुधन विज्ञानात सांभाळायचं, वाचन करायचं, संवाद ठेवायचा, प्रश्न विचारायचे, लेखी नोंदी ठेवायच्या आणि मग यंत्रणेची झोपमोड करायची. यातून ठरतात अनेक जनावर गाभण आणि लाभते दूधसमृद्धी! आपल्या जनावरांना पशुवंध्यत्व शिबिरात फुकट खर्चिक महागाचा उपचार केला तरी गर्भधारणा तेव्हाच होईल, जेव्हा सुलभ प्रजननाचे तंत्र समजेल. दुधवाढीसाठी यंत्रणा गतिमान होणार, कारण वरच्या ऑफीसचा पाठपुरावा आहे. आपण सहभाग वाढवा, जनावरे सुदृढ ठेवा, वंध्यत्वात अडकू नका, शरीर वजन नोंदीचा उपाय योजा म्हणजे सकाळ संध्याकाळ दूधच दूध!