krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

कापसाचे दर उच्चांकावर स्थिरावले

1 min read
Cotton prices stabilized : जानेवारी-2022 च्या पहिल्या आठवड्यात कापसाने गाठलेले 10 हजार रुपये प्रति क्विंटल दर तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात थोडे उतरले होते. दक्षिण भारतातील कापड उद्योजक लॉबीच्या दबावाला बळी न पडता केंद्र सरकारने कापसावर अद्याप नियंत्रणे न आणल्याने तसेच बाजारात हस्तक्षेप न केल्याने खुल्या बाजारातील कापूस दरातील तेजी सुरुवातीपासून आजवर कायम राहिली. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून देशभरातील बहुतांश बाजारपेठेत मध्यम (Medium) व लांब (Long) धाग्याच्या (Staple) कापसाचे दर 10,100 ते 10,700 रुपये तर अतिरिक्त लांब (Extra Long Staple) धाग्याच्या कापसाचे दर 13,400 ते 14,200 रुपये प्रति क्विंटल दरम्यान स्थिरावले आहेत.

बाजारातील आवक

सन 2021-22 च्या कापूस हंगामात देशांतर्गत व जागतिक बाजारात सुरुवातीपासून आजवर (ऑगस्ट-2021 ते फेब्रुवारी-2022) कापूस दरात कमी अधिक प्रमाणात तेजी दिसून आली. भारतीय शेतमाल बाजार दरवेळी केंद्र सरकारची धोरणं, निर्णय व बाजारातील अवाजवी हस्तक्षेप यामुळे प्रभावित होतो. यावर्षी कापूस उत्पादनात मोठी घट झाल्याने तसेच कापसाचा वापर व मागणी वाढल्याने देशांतर्गत कापूस बाजारात निर्माण झालेली तेजी नैसर्गिक ठरली आहे. शेतकऱ्यांनीही काही प्रमाणात बाजारातील चढ-उताराचा अंदाज घेत कापूस विकण्याची घाई केली नाही. दर वाढण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी टप्प्याटप्प्याने कापूस विकायला आणत असल्याने बाजारातील कापसाची आवक सुरुवातीपासून स्थिर राहिली. याचाही परिणाम बाजारातील तेजीवर झाला आहे. 

कापूस दराचा अंदाज

सध्या जागतिक स्तरावर कापसाचे दर 142 सेंट प्रति पाऊंडवर स्थिर झाल्याने भारतातील कापसाच्या दराने 10,200 ते 10,500 रुपये प्रति क्विंटलची मजल गाठली आहे. सुरुवातीला जागतिक बाजारात कापसाचे दर 110 सेंट प्रति पाऊंड असल्याने भारतातील कापसाला सरासरी 7,500 ते 7,900 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. दोन आठवड्यापूर्वी देशांतर्गत बाजारातील सरकीचे दर 4,200 रुपयांवरून 3,400 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले होते. सरकीचे दर सध्या 3,700 ते 3,900 रुपये प्रति क्विंटल आहे. त्यामुळे कापसाचा पडता 10 हजार रुपयांच्या वर आहे. सरकीचे दर स्थिर राहिल्यास अथवा वाढल्यास कापसाचे दर प्रति क्विंटल 300 ते 600 रुपयांनी वाढून ते 11 हजार रुपये प्रति क्विंटलवर जाऊ शकतात. सरकीचे दर कमी झाल्यास कापसाचे दर प्रति क्विंटल 10,300 ते 10,500 रुपयांच्या आसपास राहतील. जागतिक बाजारात कापसाचे दर 150 सेंट प्रति पाऊंडच्या वर गेल्यास भारतातील कापसाचे दर 11,500 ते 12,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत मजल मारू शकेल. परंतु, ती परिस्थिती सध्यातरी जागतिक कापूस बाजारात निर्माण झाली नाही.

‘सध्याचे कापूस दर टिकून राहतील.

जागतिक बाजारात दर वाढल्यास भारतातीन कापसाचे दर वाढतील. सध्या सरकीच्या दरात चढ-उतार सुरू आहे. सोयाबीनचे दर उतरल्याने सोयाबीन ढेपेचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे सरकीच्या ढेपेचे दर कमी होत आहेत. मात्र, आगामी काळात कापसाचे दर स्थिर राहतील’, अशी माहिती शेतकरी संघटनेचे पाईक श्री विजय जावंधिया यांनी दिली. ‘देशातील कापसाच्या उत्पादनाचा निश्चित आकडा अद्याप आला नाही. फेब्रुवारीच्या शेवटी एकूण उत्पादनाचा 90 ते 95 टक्के अंदाज येऊ शकतो. त्यामुळे मार्च व एप्रिलमध्ये कापसाचे दर वाढतील आणि जुलै व ऑगस्टमध्ये ते कमी होतील. दरवाढीचा हा फरक प्रति क्विंटल एक ते दोन हजार रुपयांचा असेल’ असा अंदाज महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाचे माजी सरव्यवस्थापक श्री गोविंद वैराळे यांनी व्यक्त केला.

कापूस उत्पादनाचा अंदाज

भारतात सन 2021-22 च्या कापूस हंगामात एकूण किती लाख गाठी कापसाचे उत्पादन होईल, हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. त्यामुळे संपूर्ण बाजार कापूस उत्पादनाच्या अंदाजावर सुरू आहे. देशात कापसाचे एकूण कतिी उत्पादन झाले, हे मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात स्पष्ट होईल.

कापूस उत्पादनाचा अंदाज –

🔆 यूएसडीए (USDA-United States Department of Agriculture) : – 346 लाख गाठी.

🔆 सीएआय (CAI-Cotton Association of India) : – 348.13 लाख गाठी.

🔆 व्यापारी वर्ग : – 310 ते 320 लाख गाठी.

कापसाचे दर (रुपये – प्रति क्विंटल)

🔆 हरियाणा :-  9,900 ते 10,700

🔆 पंजाब :-     9,500 ते 10,200

🔆 राजस्थान :- 9,800 ते 10,300

🔆 गुजरात :-    9,700 ते 10,400

🔆 मध्य प्रदेश :- 9,500 ते 10,400

🔆 महाराष्ट्र :-    9,800 ते 10,700

🔆 तेलंगणा :-    9,700 ते 10,100

🔆 कर्नाटक :-    10,300 ते 10,800

🔆 तामिळनाडू :- 9,200 ते 10,600

🔆 ओडिशा :-     9,600 ते 10,400

(हरियाणा, पंजाब, राजस्थान, गुजरात व मध्य प्रदेश येथील कापूस मध्यम (Medium) व लांब(Long) धागा (Staple). महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू व ओडिशा येथील कापूस लांब (Long Staple). अतिरिक्त लांब धाग्याच्या (Extra Long Staple) कापसाचे दर 13 ते 14 हजार रुपये प्रति क्विंटल.)

सरकीच्या दरातील चढ-उतार

सरकीच्या ढेपेचा सर्वाधिक वापर गुरांचे खाद्य म्हणून केला जातो. सध्या गुरांच्या खाद्यात शेतकºऱ्यांनी थोडे बदल केले आहेत. मका, गहू व धानाचे दर कमी असल्याने मका व गव्हाच्या कांड्या, तणस व धानाचा भुसा वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे सरकीच्या ढेपेचा वापर कमी झाला आहे. खाद्यतेलाचे दर वाढल्याने सरकीच्या दरात थोडी तेजी आली आहे. शिवाय, सरकीत तेलाचे प्रमाण चांगले म्हणजेच प्रति क्विंटल 13 किलो एवढे आहे. त्यामुळे सरकीचे दर स्थिर राहणार असल्याने आगामी काळात कापसाचे दर प्रति क्विंटल एक ते दोन हजार रुपयांनी वाढण्याची शक्यता कॉटन अ‍ॅडव्हायझरी बोर्डचे माजी सदस्य श्री विजय निवल यांनी व्यक्त केली.

सरकीचे दर (रुपये प्रति क्विंटल)

🔆 हरियाणा :-  3,580 ते 3,655

🔆 पंजाब :-     3,200 ते 3,900

🔆 राजस्थान :- 3,800 ते 3,900

🔆 गुजरात :-    3,250 ते 3,600

🔆 मध्य प्रदेश :- 3,300 ते 3,800

🔆 महाराष्ट्र : –   3,550 ते 3,900

🔆 तेलंगणा :-   3,700 ते 4,050

🔆 कर्नाटक :-    3,450 ते 3,600

🔆 तामिळनाडू :- 3,550 ते 4,000

🔆 ओडिशा :-    3,800 ते 4,200

अमेरिकन कापूस

मार्चमध्ये अमेरिकेतील कापूस बाजारात येतो. त्यामुळे पुढील महिन्यात जागतिक बाजारातील कापसाची उपलब्धता वाढणार आहे. हा कापूस बाजारात आला तरी रुईच्या दरात फारसा फरक जाणवणार नाही. त्यामुळे जागतिक बाजारातील कापसाची उपलब्धता वाढली तरी कापसाच्या दरात फारसा परिणाम होणार नाही, असे मत श्री विजय जावंधिया यांनी व्यक्त केले.

विक्रमी नसूनही विक्रमी दर

सन 2012-13 च्या हंगामात जागतिक बाजारात कापसाचे दर 220 ते 240 सेंट प्रति पाऊंड झाले होते. त्यामुळे भारतातील कापसाला 7 ते 8 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. त्या तुलनेत यंदाच्या हंगामातील कापसाचे दर विक्रमी नाहीत. मात्र, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन लक्षात घेता यंदाचे कापसाचे दर विक्रमी ठरतात. सोयाबीनचे जगात कुठेही नाही एवढे चढे दर भारतात आहेत. सोयाबीनचा हा चढा दर कृत्रिम आहेत. कापसाच्या दरातील तेजी मात्र नैसर्गिक आहे.

चांगला दर कोणत्या कापसाला?

सध्या बाजारात ज्या कापसाच्या धाग्याची लांबी  29 मिमीपेक्षा अधिक, आरडी (शुभ्रपणा) (RD) 74 पेक्षा अधिक, मायक्रोनियर (Micronier) 3.60 (Mice) असून, त्यातील कचऱ्याचे (Contamination) प्रमाण 3 टक्के व मॉईश्चर (Moisture) 9 टक्के आहे, त्या कापसाला चढा तर इतर कापसाला सरासरी दर मिळत आहे. एकंदरीत, कापूस बाजारातील सध्याची तेजी आगामी काळात कायम राहणार असून, कापसाचे दर वाढल्यास ते 11,000 ते 11,500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत चढतील.

कृषिसाधना....

1 thought on “कापसाचे दर उच्चांकावर स्थिरावले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!