krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

‘चला… मातीचे आरोग्य जपू या!’

1 min read
Let's take care of soil health : भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारताची अर्थव्यवस्था ही कृषिक्षेत्रावर आधारित आहे. साहजिकच भारतीय समाजजीवनात शेतीला पर्यायाने शेतकऱ्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. भारतात 'कृषी संस्कृती' ही पारंपारिक असली तरी स्वातंत्र्यानंतर झालेल्या हरितक्रांतीमुळे भारतात आधुनिक शेतीला खऱ्या अर्थाने चालना मिळाली.

आज जगात भारताचा लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरा क्रमांक लागतो आणि विशेष म्हणजे या लोक संख्येला आवश्यक असणाऱ्या अन्नधान्याबाबत भारत स्वंयपूर्ण आहे. यावरून भारतीय संस्कृतीत शेतीचे महत्त्व विशद होते. परंतु, असे असले तरीही दुसरीकडे मात्र पिकाच्या अधिक उत्पादनाच्या हव्यासापोटी भारतीय शेतीचे आरोग्य बिघडत चालले असल्याचे चित्र सामोरे येत आहे.

माती तपासणी महत्त्वाचे

सधन कृषी पद्धतीत रासायनिक खतांच्या अनिर्बंधित वापरामुळे तसेच तदनुषंगिक कारणामुळे जमिनीचा कस कमी होत आहे. त्याचा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. मातीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी माती तपासणी आधारित खतांच्या परिणामकारक वापरास महत्त्व प्राप्त झाले आहे. परिणामी, शेतीबाबत पर्यायाने मातीच्या आरोग्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे महत्त्वाचे आहे.

या अनुषंगाने मातीच्या निरोगी आरोग्याचे गांभीर्य ओळखून केंद्र शासनाने देशभरात मृदापात्रिका आरोग्यपात्रिका अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानांतर्गत जिरायती व बागायती जमिनीचा म्हणजेच मातीचा सामू म्हणजेच जमिनीचे आम्ल आणि विम्ल (अल्कली) गुण निर्देशित करणारे परिमाण मूल्य (Quantitative values ​​indicating the acid and alkali properties of the soil) व क्षारता (Alkalinity), मातीतील सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र (Nitrogen), स्फुरद (Phosphorus) व पालाश (Potassium), सूक्ष्म मूलद्रव्ये (Micronutrients) जसे जस्त (Zinc), तांबे (Copper), लोह (Iron), मंगल आदी घटक तपासून शेतकऱ्यांना मृदा आरोग्य संवर्धनासाठी योग्य त्या उपाययोजनांचे मार्गदर्शन केले जात आहे.

शाश्वत शेती व्यवस्थापनामध्ये जमिनीचे आरोग्य अबाधित राखून किफायतशीर पीक उत्पादन घेण्यासाठी सेंद्रिय खताबरोबर रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर करणे आवश्यक असते. दरवर्षी पीक घेतल्यामुळे पिकांच्या शोषणामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचा साठा दिवसेंदिवस कमी होत असतो. त्यामुळे जमिनीची सुपिकता कमी होते. जमिनीची सुपिकता आजमाविण्यासाठी भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्माची तपासणी करणे आवश्यक असते. त्यासाठी माती परीक्षणाची गरज आहे. माती परीक्षणामुळे जमिनीच्या सर्व गुणधर्माची माहिती मिळते. जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते आणि त्यानुसार रासायनिक खतांच्या मात्रा व शिफारशी ठरविणे सुलभ होते. 

‘माती व पाणी’ पिकांची संजीवनी

माती आणि पाणी ही पिकांची संजीवनी आहे. पिकांचे अस्तित्व मातीच्या व पाण्याच्या स्वास्थ्यावर अवलंबून असते. पीक उत्पादनातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ‘जमीन’. कालांतरापासून शेतकरी जमिनीत विविध पिके घेत आला आहे. पूर्वीच्या काळात सेंद्रिय पदार्थ जमिनीत साचण्याचे प्रमाण जास्त होते. साहजिकच जमिनीचा पोत टिकण्यास आपोआपच मदत होत असे. अन्नधान्याची गरज जसजशी वाढू लागली, तसा जमिनीतून अधिकाधिक उत्पादन काढण्याकडे कल वाढत गेला. त्यासाठी प्रगत व उच्च तंत्रज्ञानावर आधरित शेतीसाठी अधिक भांडवल गुंतवावे लागत असल्याने याठिकाणी माती व पाणी परिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण झाले आहे.

महाराष्ट्रातील मातीच्या आरोग्याबाबत सद्यस्थिती

सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी (सर्व जिल्हे)

नत्राचे प्रमाण कमी (10 जिल्हे)

स्फुरदाचे प्रमाण कमी (23 जिल्हे)

पालाशचे प्रमाण अधिक (सर्व जिल्हे)

लोहाचे प्रमाण कमी (23 जिल्हे)  

जस्ताचे प्रमाण सर्वात कमी (28 जिल्हे)

माती परीक्षणाचे महत्त्व

माती परिक्षणावर आधारित खत व्यवस्थापन केल्याने खतांच्या मात्रेत बचत तर होतेच, परंतु जमिनीचे स्वास्थ टिकवण्यासाठी सुद्धा मदत होते. जमिनीच्या स्वास्थ्याविषयक समस्यांचे निदान व त्यावरील उपाययोजना याबाबतचे नियोजन हे या माती व पाणी परीक्षणावरच आधरित असते.

जमिनीच्या नियोजनासाठी माती परीक्षणाबरोबर मृद सर्वेक्षणामुळे जमिनीची उत्पत्ती, तिचे गुणधर्म काय आहे हे समजते. मृद सर्वेक्षणामुळे जमिनीच्या समस्या व प्रमाण याची माहिती मिळते. अशा समस्या दूर करण्यासाठी कोणकोणते उपाय करावेत, याचे नियोजन व व्यवस्थापन मृद सर्वेक्षणाच्या आधारे करता येते.

‘सुपिक जमीन’ निसर्गाची एक देणगी

सुपिक जमीन ही निसर्गाची एक देणगी असून, तिची योग्य काळजी घेतल्यास ती एक चिरकाल ठेव आहे. पिकांपासून अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी जमिनीची पिकांच्या मुळांना अन्नद्रव्ये पुरविण्याची क्षमता चांगली असावी लागते. सुपिक जमिनीत जीवाणूमध्ये ऊर्जाशक्ती निर्माण होते. उष्णता व प्रकाश यांचे रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर होते. हीच उर्जा जमिनीला परत मिळून जीवांची उपजीविका होते. जमिनीची सुपिकता व उत्पादनक्षमता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक बाजू जरी कमी पडली तरी उत्पादनात घट येते. जमिनीची सुपिकता, तिचे महत्व, आणि ती वाढविणे किंवा टिकविणे याबाबतच्या उपाययोजना करणे खूप महत्त्वाचे आहे. जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारल्यामुळे जमिनीची सुपिकता वाढते आणि जमीन उत्पादनक्षम बनते. पिकांचे उत्पादन व गुणवत्ता वाढविण्यासाठी मातीच्या परीक्षणावर आधरित खतांचा संतुलित वापर करणे फायद्याचे आहे. (क्रमशः)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!