नवीन शेळी, गोट, बकरी पालकांनो! ही दक्षता घ्या!!
1 min readअलीकडे सोशल मीडियावर काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात, जसे…
मी शेळीपालन करू का?
यातून मला फायदा होईल का?
पण माझ्याकडे जमीन नाही, पाणी नाही?
मी नव्याने शेळीपालन व्यवसाय सुरू करणार आहे, मला मार्गदर्शन कराल का?
कोणत्या जातीच्या शेळ्या घेऊ?
मला शेळीपालनासाठी कर्ज मिळेल का?
यासह अनेक प्रश्न सोशल विचारले जातात.
या प्रश्नांना काही बकरीपालक खरोखर खूप चांगली व प्रामाणिकपणे माहिती देतात. त्यांचे मनापासून धन्यवाद! एक शेळीपालक या नात्याने मी माझ्या परीने या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करतो आहे. मनाला पटले तर स्वीकारावे नाही तर मोकळेपणाने सोडून द्यावे.
प्रश्न :- मी शेळीपालन करू का? मला फायदा होईल का?
उत्तर :- हो नक्कीच करा! तुमच्यात जर मेहनत करण्याची हिंमत असेल तर नक्कीच करा! शेळ्यांच्या कमी संख्येपासून शेळीपालनाला सुरुवात करा आणि अनुभव घ्या. 10 ते 15 वर्षांपूर्वी ज्यांच्याकडे शेती नव्हती, ते लोकं आपले पोट फक्त बकरीच्या भरवशावर भरत असत. गाठीला दोन पैसेसुद्धा शिल्लक ठेवत असत. त्यावेळी इ क्लासची जमीन भरपूर प्रमाणात असायची. फुकटचा सरकारी जमिनीवर चारा असायचा. आता त्या प्रमाणात चारा उपलब्ध नाही. पण; नद्या-ओढे, थोडीफार सरकारी पडीक जमीन आजही आहे. त्यावर आपण आपले बकरीपालन करू शकतो. जसे मी करतो. (काही लोकं शिव्या घालतात ती गोष्ट वेगळी). तसेच तुम्ही नवीन बकरीपालक आहात तर आधी शेळीची आपली स्थानिक (Local) जात निवडा, त्यावर काम करा. बकरी समजून घ्या. मग तुम्ही जगातील कोणतीही ब्रीड (Breed) आणून त्यांचे संगोपन करू शकता. पण, फक्त तुम्हाला ती विकता आली पाहिजे. कारण, आजकाल लोकांची स्वप्न खूप मोठी झाली आहेत. अनेकांना तबकरीपालनामध्ये एका वर्षातच लाखो रुपये नफा हवा असतो. आमची स्वप्नसुद्धा मोठी आहेत, पण आम्ही पायरी पायरीने चढण्यात हुशारी मानतो. एकदमात उडी घेत नाही. शेती नसलेल्या बऱ्याच लोकांचे आज गोट फार्म दिमाखात उभे आहेत. ते सुद्धा आज या व्यवसायात यशस्वी (Success) झाले आहेत. ते लोकं डोक्याने भजी खातात, उतावीळपणा पना करत नाहीत.
प्रश्न :- मी नवीन शेळीपालन सुरू करणार आहो? कोणत्या जातीच्या शेळ्या घेऊ?
उत्तर :- हा प्रश्न विचारणाऱ्यांना कोणी बिटल (Beetle) सांगते तर कोणी शिरोही (Shirohi) सांगते. कोणी सोजत (Sojat) सांगते तर कोणी अन्य काही सांगतो. पण काही बकरीपालक मित्र मात्र खूप चांगला सल्ला देतात. मित्रांनो! तुम्ही नवीन बकरीपालक आहात. तुम्हाला बकरीचा कुठलाही अनुभव नसताना तुम्ही आपल्या स्थानिक जाती (Local Breed) सोडून इतर जाती (Breed)बचा विचार का करता? तुम्ही आधी बकरी काय आहे, हे समजून घ्यावं. तिचे खानपान, आरोग्य आणि विशेष म्हणजे तुमच्या भागात काय विकल्या जाते, याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. मग कोणत्या जातीमध्ये (Breed) काम करायचे ते ठरवावे. यासाठी किमान तुम्हाला अडीच ते तीन वर्षे बकरीला द्यावे लागती. या काळात बकरी समजून घ्यावी लागेल. तुम्हाला बकरी व पिलांना गोळी, औषध व इंजेक्शन देता आली पाहिजे. बकरी आजारी आहे काय? हे बघताच क्षणी ओळखता आली पाहिजे. यात जेव्हा तुम्ही पारंगत व्हाल, तेव्हा तुम्ही जगातली कोणत्याही जातीची (Breed) घेऊन आपला बकरीपालन व्यवसाय सुरू करू शकता.
काही मित्र कर्ज काढून बकरीपालन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करीत असतात. पण खरंच कर्ज काढून बकरीपालन करता येईल का? मित्रांनो येथे आपल्या जीवाचा भरवसा नाही, तिथे तुम्ही बकरीच्या भरवशावर कर्ज काढून यशस्वी होऊ शकाल का? निश्चितच नाही. तुम्ही बकरीसाठी नक्कीच कर्ज काढा. पण त्या अगोदर 5-10 बकऱ्यांपासून स्वतःच्या बकरी फार्मची सुरुवात करा. साईड बाय साईड शेती असेल तर शेती करा. दुसरा काही धंदा असेल तर तो करा. दोन वर्षे पूर्ण झाली की कर्ज काढण्याचा विचार तुमच्या डोक्यातून निघून जाईल. जर आज तुम्ही काही लाख रुपये कर्ज घेतले. उद्या एखाद्या आजाराने बकऱ्यांवर हल्ला केला. त्यात अर्ध्या बकऱ्या मृत्युमुखी पडल्या, तेव्हा तुम्ही काय कराल? एकीकडे बकरी मरत आहे त्याचे टेन्शन, दुसरीकडे कर्जाचे हप्ते भरायचे आहेत त्याचे टेन्शन! म्हणून हात जोडून विनंती आहे की, कर्ज काढून बकरीपालन करू नका. यात खूप धोका (Risk) आहे. बकरीपालनाला कमी प्रमाणापासून (Quantity) सुरुवात करा. पण, कर्ज काढून बकरीपालन करू नका!
टिप :- ज्याला घ्यायचे आहे, त्याने घ्यावे. उगाच वाद नको. निरर्थक प्रतिक्रिया नको
छान माहिती दिलीत,