krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Hot Zone Vidarbha : हाॅट झाेन ‘विदर्भ’ वाळवंटाच्या उंबरठ्यावर

1 min read

Hot Zone Vidarbha : 20 व 28 मार्च 1892 चा अपवाद वगळता उन्हाळ्यात विदर्भातील तापमान 40 डिग्री सेल्सिअसच्या आसपास किंवा त्यापेक्षा कमी असायचे. या तापमानात वाढ व्हायला सुरुवात झाली ती सन 1995-96 पासून ! 29 मे 2012 रोजी नागपूरचे, तर 28 मे 2019 राेजी चंद्रपूरचे तापमान अनुक्रमे 48.6 डिग्री सेल्सिअस नाेंदविले गेले. हे विदर्भाच्या इतिहासातील सर्वाधिक तापमान हाेय. मे 2026 मध्ये विदर्भातील अमरावतीचे तापमान 46.8 डिग्री सेल्सिअस नाेंदविले गेले असून, वर्धा 46.5 डिग्री सेल्सिअस, अकोला 46.3 डिग्री सेल्सिअस, चंद्रपूर (मुख्य शहर) 45.6 डिग्री सेल्सिअस, नागपूर 45.5 डिग्री सेल्सिअस आणि गडचिरोलीचे तापमान 45.2 डिग्री सेल्सिअस नाेंदविण्यात आले. वास्तवात सिमेंट राेडचे तापमान 60 ते 72 डिग्री सेल्सिअसपर्यंत पाेहाेचले आहे. या वाढत्या तापमानाला ग्लाेबल वार्मिंगसाेबतच (Global Warming) सरकारची धाेरणे व मानवी चुकाही कारणीभूत आहेत. सरकारी पातळीवरून प्रभावी उपाययाेजना केल्या जात नसल्याने ‘हाॅट झाेन’ (Hot Zone) बनलेला ‘विदर्भ’ (Vidarbha) आता वाळवंटाच्या उंबरठ्यावर आहे.

♻️ भाैगाेलिक स्थिती
विदर्भातील या तीव्र उष्णतेमागे केवळ उन्हाळा हे सामान्य कारण नसून, त्यामागे भौगोलिक, हवामानशास्त्रीय (Meteorological) आणि भूप्रदेशीय (Topographical) अशी वैज्ञानिक कारणे देखील आहेत. विदर्भ प्रांत भारतीय उपखंडाच्या अगदी मध्यभागी (Landlocked Area) असल्याने हा ‘भूवेष्टित’ प्रदेश असून, समुद्रसपाटीपासून 150 ते 300 मीटर उंचावर आहे. त्यामुळे या भाैगाेलिक स्थितीचा विदर्भातील शेती, माती व हवामानाशी थेट संबंध येताे. हा प्रांत दख्खनच्या पठाराच्या मध्य-उत्तर भागात वसलेला असून, अक्षवृत्तीय विस्तार 18° 51 उत्तर ते 21° 46 उत्तर अक्षवृत्त आणि रेखावृत्तीय विस्तार साधारणपणे 75° 57 पूर्व ते 80° 59 पूर्व रेखावृत्त आहे. नागपूरचा उत्तर भाग कर्कवृत्ताच्या अगदी जवळ असल्याने हा प्रांत उष्णकटिबंधीय आहे व येथे सूर्यकिरण थेट आणि लंबरूप पडतात. विदर्भ अरबी समुद्रापासून 550 ते 600 किलोमीटर, बंगालच्या उपसागरापासून 500 ते 550 किलोमीटर तर हिंद महासागरापासूून 1,300 ते 1,400 किलोमीटर दूर असल्याने तिथे समुद्राच्या थंड वाऱ्यांचा कोणताही प्रभाव पोहोचत नाही. या भौगोलिक स्थितीला हवामानशास्त्रात ‘कॉन्टिनेन्टॅलिटी’ (Continentality) म्हणतात, ज्यामुळे उन्हाळ्यात जमीन अत्यंत वेगाने व प्रचंड तापते.

♻️ तापमानवाढीची नैसर्गिक कारणे
दरवर्षी विदर्भ व लगतच्या मध्य भारताच्या आकाशात 850 हेक्टोपास्कल पातळीवर प्रति-चक्रवात म्हणजेच उच्च दाबाचे क्षेत्र तयार होते. यात हवा आकुंचन पावत असल्याने हवेचे तापमान नैसर्गिकरीत्या कमालीचे वाढते. या दाबामुळे हवेची ऊर्ध्वगामी हालचाल थांबत असल्याने आकाशात ढग तयार होत नाहीत. त्यामुळे निरभ्र आकाशातून तीव्र सूर्यकिरण थेट जमिनीवर आदळतात. यात उत्तर-पश्चिमेकडून येणारे कोरडे व उष्ण वारे भर टाकतात. हे वारे हवेतील आर्द्रता पूर्णपणे शोषून घेत असल्याने सूर्याची उष्णता जमिनीलगत अधिक वेगाने साचते.

♻️ कोरडे व अति-उष्ण वारे
उन्हाळ्यात उत्तर-पश्चिम भारत विशेषत: राजस्थानमधील थर वाळवंट आणि पाकिस्तानचा बलुचिस्तान भाग प्रचंड तापलेला असतो. या भागात मे महिन्यात हवेचा कमी दाबाचा तसेच विदर्भात उच्च दाब पट्टा निर्माण हाेताे. त्यातच राजस्थानातील थर वाळवंट व पाकिस्तानच्या बलुचिस्तानात निर्माण होणारे काेरडे व अति-उष्ण वारे (Advection of Hot Air) अर्थात ‘लू’ (Loo) मध्य भारताकडे वाहतात. हे वारे पश्चिम राजस्थानातील जैसलमेर, बारमेर, बिकानेर, चुरू, बुंदेलखंडातील बांदा, झाशी, छतरपूर, माळवा प्रांतातील इंदाेर, उज्जैन, देवास, रतलाम, बैतूल मार्गे सातपुडा पर्वत ओलांडून अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा भागात दाखल हाेतात व विदर्भभर पसरतात. हे वारे विदर्भातील हवेतील उरलीसुरली आर्द्रताही शोषून घेत असल्याने येथील तापमान झपाट्याने वाढ हाेते.

♻️ प्रति-चक्रवात स्थिती व हवेचे खाली बसणे
उन्हाळ्यात अनेकदा मध्य भारताच्या आकाशात प्रति-चक्रवात (Anti-Cyclone) म्हणजेच उच्च दाबाचे क्षेत्र तयार होते. या स्थितीमध्ये वरच्या थरातील हवा वर्तुळाकार गतीने जमिनीच्या दिशेने खाली दाबली जाते (Subsidence of Air). जेव्हा हवा वरून खाली येते व ती खाली बसते (Anti-Cyclonic Circulation) तेव्हा ती संकुचित होते आणि अॅडिआबॅटिक उष्णता (Adiabatic Heating) या प्रक्रियेमुळे तिचे तापमान आणखी वाढते. या दाबामुळे आकाशात ढग तयार होण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबते आणि निरभ्र आकाशामुळे सूर्यकिरण थेट जमिनीवर आदळतात.

♻️ खडकाळ जमीन व विशिष्ट काळी माती (Soil & Topography)
विदर्भाचा मोठा भूभाग हा दख्खनच्या पठाराचा (Deccan Traps) भाग आहे, जो प्रामुख्याने बेसाल्ट (Basalt) खडकापासून बनलेला आहे. येथील काळी रेगूर माती (Soil & Topography) आणि खडकाळ जमीन (Rocky land) उष्णता शोषून घेण्यास अत्यंत संवेदनशील आहे. ही माती दिवसा स्वतःमध्ये सूर्यप्रकाशाची प्रचंड उष्णता (Heat) साठवून ठेवते आणि रात्रीच्या वेळी ही उष्णता संथ गतीने वातावरणात सोडली जाते (Radiation), त्यामुळे संपूर्ण विदर्भ उन्हाळ्यात रात्रीसुद्धा अत्यंत उकाड्यात व उष्ण राहतात.

♻️ औद्योगिक प्रदूषण, खाणी आणि शहरीकरण
चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात काेळसा खाणी (Coal Mines) तसेच औष्णिक वीज निर्मिती केंद्र (Thermal Power Plants) आहेत. या प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड (Carbon dioxide), सल्फर डायऑक्साइड (Sulfur dioxide), नायट्रोजन ऑक्साइड (Nitrogen oxide) आणि इतर हरितगृह वायू (Greenhouse Gases) वातावरणात सोडले जातात.
सिमेंटचे रस्ते, जंगलांची झालेली कटाई आणि वाढत्या शहरीकरणामुळे विदर्भातील प्रमुख शहरे ही उष्णतेचे बेट म्हणजेच हीट आयलंड (Urban Heat Island) बनली आहेत. कॉंक्रीट आणि डांबरी रस्ते उष्णता धरून ठेवत असल्यामुळे तसेच ग्रीनहाऊस व शेतांमध्ये कचरा जाळणेदेखील तापमान वाढीस कारणीभूत ठरत असल्याने येथील तापमानात 3 ते 4 डिग्री सेल्सिअसची अतिरिक्त वाढ होते.

♻️ उष्ण वाऱ्यांचा मार्ग व बाेडख्या पर्वतरांगा
राजस्थानातील थर वाळवंटाकडून निघालेले हे कोरडे व अति-उष्ण वारे प्रामुख्याने उत्तर-पश्चिम (North-West) दिशेकडून आग्नेय (South-East) दिशेकडे प्रवास करतात. ते राजस्थानातील अरवली, मध्य प्रदेशातील विंध्य व महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमावर्ती भागात असलेल्या सातपुडा या तीन पर्वतरांगा ओलांडून विदर्भातील अमरवती, अकाेला जिल्ह्यात पाेहाेचते. अर्थात राजस्थानातून मध्य प्रदेशचा माळवा पठार भाग (इंदूर, उज्जैन), बुंडेलखंड आणि निमाड परिसर, दक्षिण मध्य प्रदेश (बैतूल, छिंदवाडा) मार्गे थेट विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा जिल्ह्यात दाखल हाेते. पूर्वी या तिन्ही पर्वतरांगा घनदाट जंगलांनी समृद्ध हाेत्या. अरवली पर्वताची उंची 300 ते 900 मीटर असून, विंध्य पर्वताची उंची 300 ते 600 मीटर आणि सातपुडा पर्वताची उंची 300 ते 1,350 मीटर आहे. पर्वतांची उंची आणि त्यावरील घनदाट झाडांमुळे या कोरडे व अति-उष्ण वाऱ्यांचे तापमान काही प्रमाणात कमी व्हायचे. त्यामुळे पूर्वी विदर्भात फारसे तापमान जाणवत नव्हते. अलीकडे, नागरीकरण व औद्याेगिकीकरणामुळे या तिन्ही पर्वतरांगा झाडे ताेडून बाेडख्या केल्या असून, वणव्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हवेचे तापमान कमी हाेण्याऐवजी कायम राहते.

♻️ हरित भिंत धाेक्यात
📍 अरवली पर्वत
अरवली पर्वतावरील जंगलांची स्थिती सध्या सर्वाधिक चिंताजनक आहे. त्यामुळे वाळवंटातील काेरड्या व अति-उष्ण हवेला रोखणारी ही हरित भिंत आता मानवी कृत्यांमुळे धोक्यात आली आहे. हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीच्या भागात पसरलेल्या अरवलीचा जवळपास 90 टक्क्यांपेक्षा जास्त भाग खाणकाम आणि शहरीकरणामुळे उघडा पडला आहे. येथील स्थानिक शुष्क पानझडी (Dry Deciduous) जंगले वेगाने नष्ट होत आहेत. या पर्वतावरील झाडे नष्ट झाल्यामुळे राजस्थानच्या वाळवंटातील वाळू आणि धुलिकण आता दिल्ली आणि मध्य भारताकडे सरकू लागले आहेत, याला हवामानशास्त्रात ‘गॅप एरिया’ (Gap Area) म्हणतात. हळूहळू या भागाचे वाळवंटीकरण (Desertification) हाेत आहे. अरवलीच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) कठोर पावले उचलली असून, 2025-26 मध्ये एका उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीची (HPEC – High Powered Expert Committee) स्थापना केली आहे. बेकायदेशीर दगड खाणींवर पूर्ण बंदी घालण्यात आली असून अरवली ग्रीन वॉल इनिशिएटिव्ह (Aravalli Green Wall Initiative) अंतर्गत पुन्हा मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जात आहे. वास्तवात, या कामांचा फारसा प्रभाव दिसून येत नाही.

📍 विंध्य पर्वत
मध्य भारताची जीवनवाहिनी असलेल्या विंध्य पर्वतावरील जंगले अजूनही काही प्रमाणात टिकून असली तरी त्यांची घनता वेगाने कमी होत आहे. येथे प्रामुख्याने उष्णकटिबंधीय कोरडी पानझडी जंगले (Tropical Dry Deciduous Forests) आहेत. यामध्ये प्रामुख्याने सागवान (Teak), साल (Sal) आणि बांबूची झाडे आढळतात. उन्हाळ्यात ही झाडे आपली पाने पूर्णपणे गाळतात, त्यामुळे जमीन थेट तापते. पन्ना व बुंडेलखंड परिसरात पायाभूत सुविधांचे प्रकल्प (उदा. केन-बेतवा नदी जोड प्रकल्प), रस्ते आणि औद्योगिक विस्तारामुळे या जंगलांचे लहान-लहान तुकडे (Forest Fragmentation) पडत आहेत. सॅटेलाइट डेटाच्या ताज्या अहवालानुसार, उन्हाळ्यात विंध्य पर्वताच्या रांगांमध्ये वणवे (Forest Fire Hotspot) लागण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. यामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थ आणि लहान वनस्पती जळून खाक होत आहेत.

📍 सातपुडा पर्वत
विदर्भाच्या डोक्यावर असलेल्या सातपुडा पर्वतावरील (मेळघाट, सातपुडा टायगर रिझर्व्ह, पेंच) जंगलांची स्थिती तिन्ही पर्वतांमध्ये सर्वात चांगली आणि घनदाट हाेती. मानवी हस्तक्षेपामुळे या जंगलांची घनता कमी हाेत चालली आहे. येथे उष्णकटिबंधीय दमट आणि कोरडी पानझडी जंगले (Moist & Dry Deciduous) आढळतात. विदर्भाचे तापमान नियंत्रित ठेवण्यात या जंगलांचा मोठा वाटा आहे. येथील व्याघ्र प्रकल्प आणि राष्ट्रीय उद्यानांमुळे या जंगलांना कायदेशीर संरक्षण मिळाले आहे. संवर्धन प्रयत्नांमुळे सातपुडा रांगांमधील गवताळ प्रदेश (Grasslands) पुन्हा जिवंत केले जात आहेत. सध्या तापमान 45 डिग्री सेल्सिअसच्या वर गेल्यामुळे सातपुडा पर्वतातील मेळघाट आणि चिखलदरा परिसरातील जंगले पूर्णपणे सुकली आहेत. मे महिन्यात मोहफुले व तेंदुपत्ता गोळा करणे व त्यासाठी स्थानिक पातळीवर वणवे लावले जात असल्याने येथील जंगलाचा मोठा भाग आगीच्या विळख्यात सापडतो.

♻️ विदर्भातील आल्हाददायक वातावरणासाठी काय करावे?
वाढत्या तापमानाचा परिणाम विदर्भातील नैसर्गिक व कृत्रिम जलस्राेतांची पाणीपातळी खालावण्यावरही हाेत आहे. रेतीच्या वारेमाप उपशामुळे माेठ्या नद्या मृतवत हाेत असून, अतिक्रमणामुळे मध्यम व छाेट्या नाल्यांचे अस्तित्व धाेक्यात आले आहे. गाव असो वा शहर रस्त्याच्या दोन्ही बाजूला सावली देणारे कडूनिंब, वड ,उंबर, पिंपळ, जांभुळ, करंज, चिंच आणि कांचन या सारखे झाडे लावून त्यांचे भुयार तयार करावे लागेल, ज्यामुळे रस्ते तापणार नाही. विदर्भातील सर्व टेकड्यांवर (उन्हाळ्यात) सदाहरित राहणारे झाडे लावावे लागेल. वेगाने जंगले वाढविण्यासाठी सीड बोंम्बिंगचा प्रयोग करावा लागेल. भूगर्भातील पाणी पातळी वाढविण्यासाठी प्रत्येक शेतात जलतारा, रिचार्ज विहीर आणि रिचार्ज शाफ्ट यासारख्या उपाय योजना राबवाव्या लागतील, नाहीतर शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येचे सत्र वाढत जाईल.

©️ मातीतलं विज्ञान

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!