krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Monsoon Rain Possibility : आठवड्यानंतर महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसाची शक्यता

1 min read

Monsoon Rain Possibility : गेल्या आठवड्यापासून म्हणजे सोमवार (दि. 8 जून)ला तळकोकणातील हर्णाई ते सोलापूर पर्यंत पोहोचलेला मान्सून (Monsoon) आजपावेतो महाराष्ट्रात जागेवरच खिळलेला आहे. त्याची पुढे प्रगती नाही. वायव्येकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्याचा तसेच अरबी समुद्रात साडे तीन ते पावणेचार किमी दरम्यान असणाऱ्या प्रत्यावर्ती वाऱ्याच्या प्रणाली व कमकुवत मान्सून वारे महाराष्ट्रातील मान्सूनच्या वाटचालीस अडथळा ठरत असल्याने मान्सून जागेवरच खेळंबलेला आहे.

🔳 मान्सून कधी सरकणार?
तळकोकणातील सध्याच्या जागेवरून महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर म्हणजेच मुंबईपर्यंत पोहोचण्यास मान्सूनला कदाचित आठवड्याभराचा कालावधी लागू शकतो. अर्थात मंगळवार (दि. 23 जून)ला वातावरणात बदल होवून मान्सूनला पुढे सरकण्यास सक्रियता मिळण्याची शक्यता जाणवते.

🔳 कोकण व महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात मान्सून कधी?
गुरुवार (दि. 25 जून) ते बुधवार (दि. 1 जुलै) दरम्यानच्या जूनच्या शेवटच्या (एकादशी, वाटपौर्णिमा) आठवड्यात, मुंबईसह संपूर्ण कोकणात मान्सूनच्या चांगल्या पावसाची शक्यता जाणवते. मुंबईत चांगल्या पद्धतीने सेट झालेला मान्सून सह्याद्री ओलांडून मध्य महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात हजेरी लावू शकतो.

🔳 विदर्भ, मराठवाड्यात मान्सून कधी येणार?
गेल्या आठवड्यात चांगलीच वाटचाल केलेल्या बंगाल उपसागरीय मान्सूनची शाखा ही सध्याच्या पूरक प्रणाली अभावी सध्याच्या आठवड्यात काहीशी स्थिरावून धिम्या गतीने वाटचाल करू शकते. त्यामुळे विदर्भ व पूर्व मराठवाड्यासाठी मान्सूनच्या पावसाची शक्यता ही मान्सूनच्या या शाखेच्या वाटचालीवर अवलंबून असू शकते. ही शाखाही गुरुवार (दि. 25 जून) ते बुधवार (दि. 1 जुलै) दरम्यानच्या जूनच्या शेवटच्या (एकादशी, वाटपौर्णिमा) आठवड्यात सक्रिय होवून तेथे मान्सूनच्या पावसाची (Rain) शक्यता (Possibility) जाणवते.

🔳 उष्णतेची लाट, दमट वातावरण व रात्रीचा उकाडा कुठे जाणवेल?
आजपासून (मंगळवार, दि. 16 जून) ते शुक्रवार (दि. 19 जून) दरम्यानच्या चार दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील 29 जिल्ह्यात भाग बदलत तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती जाणवू शकते. याच दरम्यान कोकणातील 7 जिल्ह्यात उष्ण व दमट वातावरण राहून रात्रीचा उकाडाही जाणवेल.

🔳 पेरणीसंबंधी काय खुलासा असू शकतो?
प्रशांत महासागरातून येणाऱ्या मान्सून वाऱ्यांना एल-निनो (El-Nino) प्रभावामुळे काहीसा रोध तयार होत असून, येणाऱ्या वाऱ्यात अधिक बळकटी अभावी कमी जोर असल्यामुळे महाराष्ट्रात दमदार पाऊस व पेरणीयोग्य ओलीसाठी वाटच पहावी लागेल असे वाटते. जूनच्या शेवटच्या आठवड्यातील पावसाच्या शक्यतेनंतर, 1 जुलैनंतरच वातावरणीय बदलानुसार यावर भाष्य करता येईल. या व्यतिरिक्त दरम्यानच्या काळात वातावरणात एकाकी काही बदल झाल्यास तसे सूचित केले जाईल.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!