krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Crop Insurance Compensation : संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकविमा नुकसान भरपाई द्या!

1 min read

Crop Insurance Compensation : सन 2025 च्या खरीप हंगामातील पीकविमा (Crop Insurance) नुकसान भरपाई (Compensation) अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात देण्यात आली. परंतु, संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईतून वगळण्यात आले आहे. वास्तविक पाहता मागील खरीप हंगामात संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले होते त्यामुळेच महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई मदत दिली होती. संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना 29 मे पर्यंत पीकविमा नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटना व पीक विमाधारक शेतकऱ्यांनी केली असून, संगमनेर तालुका कृषी अधिकारी यांच्या दालनात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याच्या इशारा दिला आहे.

2025 खरीप हंगामात संगमनेर तालुक्यात विविध पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. तरीपण महसूल व कृषी विभाग प्रशासनाचे अंतिम पीक कापणी अहवाल (उंबरठा उत्पादन) हलगर्जीपणाने टेबलावर बसून पंचनामे केल्याने उंबरठा उत्पादन जास्त दाखविले. वास्तविक त्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे केले असते तर शेतकऱ्यांच्या नुकसानीची खरी आकडेवारी व मागील सरासरी 5 वर्षांपेक्षा कमी उंबरठा उत्पादन झाल्याचे अहवाल आले असते. परंतु, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे संगमनेर तालुक्यातील शेतकरी पीकविमा नुकसान भरपाईपासून वंचित ठेवण्यात आलेले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात उंबरठा उत्पादन कमी असूनही संगमनेर तालुक्यात जास्त दाखविले गेल्याने पीकविमा भरपाई नाकारण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकविमा नुकसान भरपाई देण्यात यावी, यासाठी शेतकरी संघटना अहिल्यानगर कडून जिल्हाधिकारी पंकज आशिया व जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी सुधाकर बोराळे यांना 11 मे रोजी निवेदन देण्यात आले होते. त्यांनी अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही न केल्याने शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रांताधिकारी संगमनेर अरुण उंडे यांचे मार्फत निवेदन दिले आहे. सरकारने 29 मे 2026 पर्यंत संगमनेर तालुक्यातील विमाधारक शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई त्यांच्या बँक खात्यात जमा करावी, अन्यथा शेतकरी संघटना व संगमनेर तालुक्यातील विमाधारक शेतकरी संगमनेर तालुका कृषी अधिकारी यांच्या दालनात बेमुदत ठिय्या आंदोलन करून झालेल्या अन्याय विरुद्ध न्याय मागणार असल्याचा इशारा या निवेदनद्वारे दिला आहे. शिष्टमंडळात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नीलेश शेडगे, उपाध्यक्ष नवनाथ दिघे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुनीता वानखेडे, संगमनेर तालुकाध्यक्ष रमेश शिंगोटे, बाळासाहेब घोगरे, सोमेश्वर साबळे, गणपत फटांगरे यांच्यासह पदाधिकारी व विमाधारक शेतकऱ्यांचा समावेश हाेता.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!