Imposter Saint : उद्धार संत न करीती|
1 min read
Imposter Saint : भोंदूबाबा (Imposter Saint) अशाेक खरात (Ashok Kharat) बाबत मागील तीन-चार दिवसांपासून प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रातील बातम्या वाचल्यानंतर तसेच टीव्हीवरील बातम्या ऐकल्या व बघितल्यानंतर अंगावर अक्षरशः काटे येतात. मनाला प्रश्न पडतो की, महाराष्ट्राला वारकरी साधुसंतांची परंपरा लाभलेली असताना व मोठ्या प्रमाणात प्रबोधनात्मक संत साहित्य उपलब्ध असताना सुद्धा कॅप्टन अशाेक खरात सारखे भोंदूबाबा त्यांचे साम्राज्य निर्माण करतात व यामध्ये सर्वात जास्त शिकले सवरलेले उच्च पदावर असलेले अधिकारी, राजकारणी लोक फसतात, याचे नवल वाटते.
📍 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत लिहितात,
जनी कर्तव्य न करिता|
संत लाभ न देती आइता|
नुसता त्यांचा मंत्र घेता|
मोक्ष होतो म्हणू नये ||१३||
संत जे ज्या कोणा सांगती|
तैसेचि जरी ते जण वागती|
त्यांचाची उद्धार होतो जगती|
ऐसे आहे||१६||
उद्धार संत न करिती |
मार्ग सांगती जनांप्रती |
त्यांच्या बोधवचने प्रगती|
केली पाहिजे साधके||१७||
आपले कर्तव्य पार न पाडता संत कृपेचा लाभ सहज पदरात पडत नसतो. केवळ मंत्र घेतल्याने मोक्ष मिळतो, असे समजू नये. संत ज्याला जे काही करायला सांगतात, ते त्याने अक्षरशः केले तरच त्याचा उद्धार होतो, हे यातले गृह आहे. संत उद्धार करीत नाही ते उद्धाराचा मार्ग लोकांना दाखवितात. त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागून साधकाने आपली आत्मिक प्रगती करून घेतली पाहिजे.
📍 संत चमत्कार
करोनिया चमत्कार|
संत न करिती उद्धार|
हाची मनी राखा निर्धार|
बोधचि सार तयांचा||४९||
चमत्काराच्या भरी भरोनि|
झाली अनेकांची धुळधानी|
संत-चमत्कार यापुढे कोणी|
नका वर्णु, सज्जन हो!||५०||
चमत्कार करून संत कधी कोणाचा उद्धार करीत नाहीत. त्यांचा बोधच जीवनात तारक ठरतो. हे मनात पक्के असू द्या. चमत्काराच्या मागे लागून अनेकांनी आपल्या आयुष्याची धुळधान केली, म्हणून सज्जन हो यापुढे तरी कोणी संताच्या चमत्काराचे वर्णन करू नका.
📍 भोंदूगिरी
वास्तविक संत नव्हे जादूगार|
करावया चमत्कार|
हा तो चालत आहे व्यवहार|
पोटभऱ्यांचा||६८||
खरे म्हणजे संत काही चमत्कार करणारे जादूगार नव्हेत. हा व्यवहार पोटभरू लोकांचा असतो.
📍 संत नवसाला पावणारी नसतात
साधुसंतची मूल देती|
तरी का वांझ जगी राहती|
संत धन वैभव अर्पिति|
तरी भिकारी न दिसावे||८५||
संत बिमारी बसविती|
मग बुवांचेही का प्राण जाती?|
जगी कोणीच ना मरती|
ऐसे का होऊ नये?||८६||
साधुसंताच्या कृपेने मुले झाली असती तर जगात वांझ स्त्रियाच राहिल्या नसत्या. संत धन वैभव मिळवून देऊ शकले तर कोठे कोणी भिकारी दिसले नसते. संतांनी रोग दुरुस्त केले असते तर संतांनाच मरण काय यावे? जगात कोणी कधी मरू नये, असे का होऊ नये?
📍 संत म्हणजे?
संत अज्ञान रोगाचे वैद्य|
जीवन विकासाचे सर्वाद्य|
शुद्ध कर्मांनी असती वंद्य|
तिन्ही लोकी||९६||
संत अज्ञानरूपी रोग नाहीसा करणारे वैद्य आहेत. आदर्श जीवन घडविणारे सर्वश्रेष्ठ उदाहरण आहेत. आपल्या निष्काम कर्माने संत तिन्ही लोकी वंदनीय ठरले आहेत.
तरीही लोकांच्या डोक्यातील अंधश्रद्धा मात्र दूर होत नाही.
राष्ट्रसंत म्हणतात,
लोकात वाढवावा भ्रम|
आपले चुकवावेत श्रम|
देवाचिये नामे चालवावे कुकर्म|
त्यांनीच समाज बुडविला||
समाज उच्चशिक्षित झाला असला तरी देवाधर्माच्या बाबतीत मात्र अजूनही तो माघारलेलाच आहे. तीन वर्ग शिकलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 41 अध्यायांची ग्रामगीता लिहिली व त्या ग्रामगीतेमध्ये संत स्वरूप व संत चमत्कार हे दोन अध्याय लिहून समाजाची मानसिक स्थिती सुधारण्याचे कार्य केले. परंतु समाज मात्र परिवर्तन स्वीकारायला तयार नसल्याने पुरोगामी व जगद्गुरू तुकाराम महाराज, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, वैराग्यमूर्ती गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात मात्र दिवसेंदिवस भोंदूबाबांचे पीक जोमाने वाढताना दिसत आहे.