krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Labor-Farmer Platform : मजूर-शेतकरी जोडणारा अभिनव ‘प्लॅटफॉर्म’

1 min read

Labor-Farmer Platform : भारतीय कृषिक्षेत्र आधीच अनेक अडचणींमध्ये असल्याचे वारंवार बोलले जाते. गेल्या काही वर्षांत सेवा आणि उद्योग क्षेत्रापेक्षा चांगली कामगिरी करणाऱ्या शेती क्षेत्राचा विकास दर यंदा कमी राहिला आहे. शेती आणि संलग्न क्षेत्राचा विकास दर 5.7 टक्क्यांनी घसरला असून, यंदा केवळ 3.4 टक्के वाढ राहण्याची शक्यता असल्याचे यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे.

♻️ फलाेत्पादनात वाढ
जगातील इतर देशांच्या तुलनेत सूर्यप्रकाश आणि इतर नैसर्गिक संसाधने पाहिली तर ती भारताच्या शेतीक्षेत्रासाठी अनुकूल आहेत. ऑगस्ट 2025 पर्यंतच्या 2024–25 च्या दुसऱ्या शासकीय अंदाजानुसार भारतातील फलोत्पादन क्षेत्रातील उत्पादन 2013–14 मधील 2,807 लाख टनांवरून वाढून 3,677.2 लाख टनांपर्यंत पोहोचले आहे. वाढते फलोत्पादन क्षेत्र हे भारताच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. मात्र फलोत्पादन क्षेत्रात सखोल व्यवस्थापन आवश्यक असते. तसेच आपल्या देशात यांत्रिकीकरण मर्यादित असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मजुरांची गरज भासते. परंतु मजुरांची (Labor) योग्य वेळी उपलब्धता ही मागील काही वर्षांपासून गंभीर समस्या बनत चालली आहे.

♻️ फला एक डिजिटल प्लॅटफॉर्म
विशेषतः द्राक्ष, केळी, डाळिंब, संत्रा आणि आंबा यांसारख्या फलोत्पादन पिकांमध्ये कामाची वेळ, कौशल्य आणि अचूकता अत्यंत महत्त्वाची असते. मात्र आज शेतकऱ्यांसमोर (Farmer) सर्वात मोठे आव्हान म्हणजे योग्य वेळी कुशल मजूर मिळणे. महाराष्ट्रातील अनेक भागांत ही समस्या अधिक तीव्र आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईस्थित ‘भारत इंटेलिजेंस’ या ‘अ‍ॅग्रीटेक स्टार्टअप’ने कृषी क्षेत्रात ‘फला’ नावाचा डिजिटल प्लॅटफॉर्म (Digital Platform) तयार केला असून, तो आज यशस्वीपणे चालवत आहेत. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गरजू शेतकरी आणि कुशल मजूर यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने यशस्वीपणे जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

♻️ शेतकरी-मजूर यांच्यातील दरी
भारतातील कृषिक्षेत्रात जवळपास 14 कोटी मजूर इतरांच्या शेतात काम करतात. मात्र, या कामगारांना वर्षभर सातत्याने रोजगार मिळत नाही. बहुतांश काम हंगामी असल्यामुळे त्यांना वर्षातील काही महिन्यांतच काम मिळते. दुसरीकडे, शेतकऱ्यांना योग्य वेळी मजूर मिळत नाहीत. द्राक्ष शेतीसारख्या पिकांमध्ये छाटणी, पेस्टिंग, डिपिंग, शूट टायिंग, घड व्यवस्थापन अशा अनेक कामांसाठी वेळेवर प्रशिक्षित मजूर आवश्यक असतात. योग्य वेळी काम न झाल्यास उत्पादनावर थेट परिणाम होतो. अनेकदा मजूर आधी पैसे घेऊनही कामावर येत नाहीत, कामाचा दर्जा सातत्यपूर्ण राहत नाही आणि शेतकरी-मजूर यांच्यातील विश्वास कमी होऊन दरी वाढत चालली आहे. द्राक्ष उद्योगातील मजूर समस्यांमध्ये वेळेवर उपलब्धता, कामाचा दर्जा, वाढणारा मजुरी दर, सर्वांगीण वाढणारा खर्च आणि शेतकरी-मजूर यांच्यातील दरी या प्रमुख समस्या असल्याचेही अभ्यासातून दिसून आले आहे.

♻️ डिजिटल मार्केटप्लेसची संकल्पना
मजूर क्षेत्रातील या अडचणीच्या पार्श्वभूमीवर ‘भारत इंटेलिजेंस’ या स्टार्टअपने तंत्रज्ञानाच्या मदतीने मजूर व्यवस्थापनाचे अनोखे मॉडेल तयार केले आहे. या स्टार्टअपचे संस्थापक अझान मर्चंट आणि गौरव संघाई यांनी ग्रामीण महाराष्ट्रातील बागायती क्षेत्रांचा अभ्यास करताना मजूर व्यवस्थापनातील अडचणी ओळखल्या. अनेक ठिकाणी यांत्रिकीकरण हा उपाय म्हणून मांडला जात असला तरी तो सर्वच परिस्थितीत व्यावहारिक किंवा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर नसतो, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकरी आणि मजूर यांना जोडणारा ‘डिजिटल मार्केटप्लेस’ तयार करण्याची संकल्पना विकसित केली.

♻️ लेबर कॅलेंडर
मजूर व्यवस्थापनाच्या या संकल्पनेत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या टीमने तयार केलेले ‘डिजिटल व्हिलेज मॉडेल’. भारत इंटेलिजेंसने महाराष्ट्रातील सुमारे 40 हजार गावांचे डिजिटल प्रोफाइल तयार केले आहे. प्रत्येक गावातील मजुरांचा मजुरी दर, संख्या, गरजा आणि वैशिष्ट्य यांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्या आधारे त्या भागातील लोकसंख्या, कामगारांची उपलब्धता, त्यांची कौशल्ये आणि कामाचे हंगामी स्वरूप यांचा सविस्तर अभ्यास करून प्रत्येक गावासाठी प्राथमिक ‘लेबर कॅलेंडर’ तयार केले जाते. त्यामुळे कोणत्या भागात कोणत्या काळात किती मजूर उपलब्ध असतील, याचा अंदाज घेता येतो. दुसरीकडे, शेतकऱ्यांच्या बाजूनेही मोठ्या प्रमाणावर डेटा गोळा केला जातो आणि त्यावर आधारित शेत व्यवस्थापनाचे नियोजन केले जाते.

♻️ पूर्वनोंदणीद्वारे मजुरांची कामानुसार उपलब्धता
नाशिकमधील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसोबत काम करताना शेतकऱ्यांचे सविस्तर प्रोफाइल तयार करून त्याचे गरजेनुसार विश्लेषण करण्यात आले. त्यात शेताचे क्षेत्रफळ, पिकाचा प्रकार, कामाचा कालावधी, मजुरांची गरज आणि भौगोलिक माहिती यांचा समावेश आहे. या सर्व माहितीच्या आधारे ‘एआय’ आधारित प्रणाली शेतकरी आणि मजूर यांच्यात योग्य आणि आवश्यक जोडणी तयार करते. त्यामुळे मजुरांची कामानुसार उपलब्धता पूर्वनोंदणीद्वारे निश्चित करता येते. ‘फला’ प्रणालीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती शेतकरी वर्गाला वापरण्यास अत्यंत सोपी आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आणि मजूर यांना मोबाईल अ‍ॅप वापरणे कठीण जाऊ शकते, ही अडचण ओळखून व्हॉट्सॲप आधारित तंत्रज्ञान विकसित करून सेवा देण्यावर भर देण्यात आला आहे. शेतकरी किंवा मजूर व्हॉट्सॲप किंवा कॉलद्वारे आपली गरज सांगतात. त्यानंतर एआय आधारित प्रणाली त्या संवादाचे विश्लेषण करून त्यातून आवश्यक माहिती काढते आणि त्यानुसार मजूर किंवा काम उपलब्ध करून देते.

♻️ राेजगारासाेबतच काैशल्य व गुणवत्तेवर भर
सध्या ही सेवा प्रामुख्याने नाशिकमधील द्राक्ष उत्पादकांसाठी सुरू करण्यात आली आहे. द्राक्ष शेती ही अत्यंत मजूरप्रधान शेती असल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर कामगारांची गरज असते. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळेवर कुशल मजूर उपलब्ध होतात, तर मजुरांना देखील नियमित रोजगार मिळण्याची संधी मिळते. कंपनीच्या मते भविष्यात मजुरांना वर्षातील किमान 300 दिवस रोजगार उपलब्ध करून देणे हे त्यांचे पुढील पहिले मोठे उद्दिष्ट आहे. मजुरांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देऊन त्यांना कुशल बनवणे आणि कामात गुणवत्ता व वेग आणण्याचे देखील त्यांचे दुसरे उद्दिष्ट असणार आहे.

♻️ मजूर व्यवस्थापनाला नवा आयाम
महाराष्ट्रातील सोलापूर भागात केळी आणि डाळिंब, अमरावती भागात संत्रा तसेच इतर फलोत्पादन क्षेत्रातही अशी सेवा सुरू करण्याची योजना ते आखत आहेत. जशी ही संकल्पना द्राक्ष पिकात बऱ्यापैकी यशस्वी झाली आहे, तशीच इतर पिकांच्या शेतीतही मजूर व्यवस्थापनाला एक नवा आयाम मिळू शकतो. जसे ‘अर्बन कंपनी’ने विविध शहरांमध्ये सेवा देणाऱ्या कामगारांना ग्राहकांशी जोडले, तसेच कृषी क्षेत्रात शेतकरी आणि मजूर यांच्यातील दरी कमी करण्याचे काम हा प्लॅटफॉर्म करत आहे. मागील वर्षी सह्याद्री फार्म्स या भारतातील प्रसिद्ध शेतकरी उत्पादक कंपनीने 7 कोटी रुपयांची गुंतवणूक ‘भारत इंटेलिजेंस’मध्ये केलेली आहे. आजच्या काळात कृषी क्षेत्रात उत्पादन वाढीसोबत व्यवस्थापनातील नवकल्पना देखील तितक्याच महत्त्वाच्या ठरत आहेत. मजूर व्यवस्थापन, कौशल्य विकास आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर यामुळे फलोत्पादन शेती अधिक शाश्वत आणि उद्योगाभिमुख होऊ शकते. भारत इंटेलिजेंससारख्या नाविन्यपूर्ण आणि काळाच्या पुढे काम करणाऱ्या स्टार्टअप्सच्या प्रयोगांमुळे भविष्यात भारतीय कृषी व्यवस्थेत अनेक अडचणींना डिजिटल परिवर्तनाची नवी दिशा निर्माण होण्याची शक्यता निर्माण होत आहे.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!