krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Boron : बोरॉन; फळांचे नैसर्गिक सिमेंट

1 min read

Boron : मानवाने जेव्हा स्वतःच्या संरक्षणासाठी घर बांधायला सुरुवात केली, तेव्हा त्याला एक गोष्ट लवकर लक्षात आली. घर उभं राहताना जर भिंतींना तडे गेले, छताला भेगा पडल्या किंवा काही काळातच बांधकाम कमजोर झालं, तर त्यामागे वापरलेले दगड, विटा किंवा वाळूच वाईट होती असं नेहमीच नसतं. बहुतेक वेळा दोष असतो तो सिमेंटचा. सिमेंट चांगलं असेल तर सामान्य दगड-विटांचं घरसुद्धा पिढ्यान्‌पिढ्या उभं राहतं आणि सिमेंट कमजोर असेल तर महागडी सामग्री वापरूनही घर लवकर तडे जातं. सिमेंटचं काम म्हणजे दगड-विटांना घट्ट बांधून ठेवणं, त्यांच्यात एकजूट निर्माण करणं आणि बाहेरून येणारा ताण सहन करण्याची ताकद देणं. हेच तत्व निसर्गाने फळांच्या बाबतीत वापरलेलं आहे, फक्त इथे सिमेंटच्या जागी बोरॉन (Boron) काम करतं आणि दगड-विटांच्या जागी कॅल्शियम(Calcium)सारखी अन्नद्रव्ये असतात.

शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर असतो, आभाळाखालीच सगळं मांडलेलं असतं. तसंच झाडावरचं फळही पूर्णपणे निसर्गाच्या हवाली असतं. अचानक झालेल्या पावसामुळे फळे तडकणे, फळे फाटणे, साल फुटणे किंवा फळ पडणे ही समस्या आज जवळजवळ प्रत्येक फळबागायतदार आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्याच्या अनुभवाची झाली आहे. द्राक्ष बागेत पावसाच्या एखाद्या जोरदार सरीने घडांतील दाणे तडकतात, टोमॅटो पिकात एकाच रात्रीत फळे फाटून जातात, डाळिंबात साल फुटते, तर अंबा आणि लिंबू वर्गीय फळांत अकाली फळगळ होते. वरवर पाहता ही समस्या फक्त अवकाळी पाऊस, हवामानाचा लहरीपणा किंवा नशिबावर ढकलली जाते. पण प्रत्यक्षात ही गोष्ट झाडाच्या आत चाललेल्या सूक्ष्म पण अत्यंत महत्त्वाच्या जैविक व पोषण प्रक्रियांशी जोडलेली असते. विशेषतः कॅल्शियम आणि बोरॉन या दोन मूलद्रव्यांचा यामध्ये अत्यंत निर्णायक सहभाग आहे.

फळ तडकण्याची प्रक्रिया समजून घ्यायची असेल तर फळाची रचना समजून घेणे गरजेचे आहे. फळाची बाह्य साल म्हणजे फक्त एक पातळ कवच नाही. ती लाखो सूक्ष्म पेशींनी बनलेली असते. या पेशींच्या भिंती एकमेकांशी घट्ट जोडलेल्या असतात आणि त्या भिंतींमध्ये पेक्टिन, सेल्युलोज, हेमिसेल्युलोज अशा घटकांचे जाळे तयार झालेले असते. हे जाळे जितके मजबूत, पण त्याचबरोबर लवचिक असेल तितकी फळाची साल ताण सहन करू शकते. अगदी घराच्या भिंतीसारखंच. भिंत खूप कडक पण लवचिक नसेल, तर ती भूकंपात किंवा ताणात तुटते. फळांचंही तसंच आहे.

अचानक पाऊस झाला की, जमिनीतून पाणी झाडात झपाट्याने शोषले जाते. फळाच्या आतल्या पेशींमध्ये पाणी भरतं, फळ आतून फुगतं. या फुगवणीच्या टप्प्यावर फळाचं बाह्य आवरण मजबूतही हवं आणि परिस्थितीनुसार लवचिकही हवं. जर बाह्य साल कमजोर असेल, पेशीभित्ती नीट बांधलेली नसेल, तर आतील दाब बाहेर सहन होत नाही आणि फळ तडकतं. म्हणून फळ तडकणे ही केवळ पाण्याची समस्या नसून पेशीभित्तीच्या ताकदीची समस्या आहे.

इथेच बोरॉनचं महत्त्व समजून येतं. बोरॉन हे सूक्ष्म अन्नद्रव्य असलं तरी त्याची भूमिका मूलभूत आहे. बोरॉन पेशीभित्ती तयार होण्याच्या प्रक्रियेत थेट सहभागी असतं. पेक्टिनच्या रेणूंना एकमेकांशी जोडून पेशीभित्तीला घट्टपणा देण्याचं काम बोरॉन करतं. म्हणजेच कॅल्शियमसारखी अन्नद्रव्ये दगड-विटांसारखी असतील, तर बोरॉन हे त्यांना जोडणारं सिमेंट आहे. एवढंच नाही तर बोरॉन हे दोन अन्नद्रव्यांमधील संवाद साधणारा दुवा म्हणूनही काम करतं. झाडाच्या आत अन्नद्रव्यांचं वहन, त्यांचा परस्पर समन्वय आणि योग्य ठिकाणी योग्य वेळी पोहोचणं यामध्ये बोरॉनची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.

अनेक शेतकरी विचारतात की, खरंच बोरॉनच्या कमतरतेमुळे फळे तडकतात का? संशोधनाच्या आधारावर याचं उत्तर ठामपणे ‘हो’ असंच आहे. जागतिक तसेच भारतीय संशोधनाने हे स्पष्ट केलं आहे की बोरॉन कमी असेल तर फळांच्या पेशीभित्ती मजबूत राहत नाहीत, फळाची साल कडक आणि ठिसूळ बनते, लवचिकता कमी होते आणि अचानक पाण्याचा ताण आला की साल तुटते. द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो, सफरचंद, संत्री, लिंबू अशा अनेक पिकांमध्ये बोरॉन कमतरतेमुळे क्रॅकिंग मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे आढळून आले आहे.

भारतीय परिस्थितीत ही समस्या अधिक तीव्र का जाणवते, याचं कारण आपल्या जमिनीच्या स्वरूपात आहे. आपल्या देशातील अनेक भागात काळी, चुनखडीची, क्षारीय किंवा जास्त सिंचनाखालील जमिनीत बोरॉन झाडांना सहज उपलब्ध होत नाही. पावसाळ्यात बोरॉन धुऊन जातं आणि उन्हाळ्यात जमिनीत असलं तरी ते मुळांना मिळत नाही. आपण भरपूर नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम देतो, झाड हिरवंगार दिसतं, वाढ चांगली वाटते, पण आतून पेशीभित्ती कमजोर राहते. अशा झाडांवर अचानक पाऊस आला, पाण्याचं नियोजन बिघडलं, इतर अन्नद्रव्यांचं वहन वाढलं, तर फळ तडकण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो.

कॅल्शियम आणि बोरॉन यांचं नातं अगदी घरातील विटा आणि सिमेंटसारखं आहे. अनेकदा शेतकरी फक्त कॅल्शियम फवारणी करतात, पण अपेक्षित परिणाम मिळत नाही. कारण बोरॉनशिवाय कॅल्शियम पेशीभित्तीत नीट बसत नाही. सिमेंटच नसेल तर विटा एकमेकींवर ठेवल्या तरी भिंत टिकत नाही, अगदी तसंच हे निसर्गाचं गणित आहे. म्हणून फळ तडकण्याच्या समस्येवर मात करायची असेल तर कॅल्शियम आणि बोरॉन यांचा समन्वय अत्यंत आवश्यक आहे.

बोरॉनची कमतरता फक्त फळ तडकण्यापुरती मर्यादित राहत नाही. परागकणांची वाढ नीट होत नाही, परागवाहिनी लांबत नाही, फलधारणा कमी होते, फळांचा आकार बिघडतो, फळांच्या आत कॉर्कसारखी रचना दिसते आणि शेवटी उत्पादन व दर्जा दोन्ही घसरतात. फळ तडकणे हे या सगळ्या अंतर्गत बिघाडाचं एक बाह्य लक्षण आहे. संशोधन स्पष्ट सांगतं की योग्य वेळी, योग्य प्रमाणात बोरॉन दिल्यास फळांची साल अधिक लवचिक होते, पेशीभित्ती मजबूत होते, पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते आणि अचानक पावसाच्या परिस्थितीतही फळ तडकण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी होतं. भारतातील प्रयोगांमध्ये डाळिंब, द्राक्ष आणि टोमॅटोमध्ये 60 ते 70 टक्क्यांपर्यंत क्रॅकिंग कमी झाल्याची नोंद आहे. याचा अर्थ बोरॉन म्हणजे जादू नाही, पण योग्य व्यवस्थापनाचा अत्यंत महत्त्वाचा आधार आहे.

बोरॉनची गरज कमी प्रमाणात असते, पण अतिरेक घातक असतो. म्हणून अंदाजाने नव्हे तर समजून, नियोजनपूर्वक वापर करणं आवश्यक आहे. योग्य प्रमाणात दिलेलं बोरॉन झाडाला आतून बळकट करतं, फळांना संरक्षण देतं आणि शेतकऱ्याच्या मेहनतीला सुरक्षित करतं. आज बदलत्या हवामानात अवकाळी पाऊस, तापमानातील चढउतार वाढत आहेत. अशा वेळी फळ तडकण्याची समस्या वाढणारच आहे. त्यामुळे बोरॉनसारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांकडे गांभीर्याने पाहणं, त्यांची भूमिका समजून घेणं आणि योग्य नियोजन करणं ही काळाची गरज आहे. बोराॅनचा अतिरिक्त वापर पण अतिशय घातक असतो, योग्य मात्रेला प्राधान्य दिले पाहिजे. बोरॉन म्हणजे केवळ एक घटक नाही, तर फळांच्या मजबुतीचा, उत्पादनाच्या दर्जाचा आणि शेतकऱ्याच्या आर्थिक स्थैर्याचा खरा सिमेंट आहे.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!