krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Unrest in Iran affects Basmati rice exports : इराणमधील अशांतता, ट्रम्पचा इशारा अन् बासमती तांदूळ निर्यात

1 min read

Unrest in Iran affects Basmati rice exports : भारतीय बासमती तांदूळ (Basmati rice) आयातदार (Importer) देशांमध्ये इराण तिसऱ्या क्रमांकाचा माेठा देश आहे. सध्या इराणमध्ये सुरू असलेली राजकीय अशांतता आणि त्यातून निर्माण झालेल्या इराणचे चलन ‘इराणी रियाल’ची अस्थिरता तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दिलेला इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर 25 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त टेरिफ लादण्याचा इशारा विचारात घेता, भारताच्या बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी नवीन आव्हाने निर्माण झाली आहेत. या घडामोडींचा बासमती तांदळाच्या निर्यात करारांसाेबतच देशांतर्गत बाजारभावांवरही विपरित परिणाम झाला आहे.

♻️ बासमती तांदूळ आयातदार देश
अपेडा (APEDA – Agricultural and Processed Food Products Export Development Authority)च्या सन 2026 च्या ताज्या आकडेवारीनुसार भारतीय बासमती तांदळाच्या जगात सर्वात माेठा आयातदार देश सौदी अरेबिया असून, दुसऱ्या क्रमांकावर इराक आणि तिसऱ्या क्रमांकावर इराण आहे. त्यानंतर संयुक्त अरब अमिराती (UAE), येमेन प्रजासत्ताक, अमेरिका (USA), युनायटेड किंगडम (UK), कुवेत, ओमान व कतार या प्रमुख देशांसाेबत कॅनडा, जर्मनी, फ्रान्स आणि इटलीचा समावेश आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षात भारताने 154 देशांना बासमती तांदूळ निर्यात केला हाेता.

♻️ 600 काेटी डॉलर्स किमतीची निर्यात
भारताच्या बासमती तांदूळ निर्यात बाजारपेठेत इराणला महत्त्वाचे स्थान आहे. सौदी अरेबिया आणि इराकनंतर, इराण हा भारतीय बासमतीचा सर्वात मोठा आयातदार आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षात भारताने इराणला 7,532 लाख डॉलर्स किमतीच्या बासमती तांदळाची निर्यात केली हाेती. त्यावर्षी भारताची एकूण बासमती तांदूळ निर्यात 6 अब्ज म्हणजेच 600 काेटी डॉलर्स होती. सौदी अरेबियाला 1.20 अब्ज म्हणजेच 120 काेटी डॉलर्स आणि इराकला 8,500 लाख डॉलर्सची निर्यात केली हाेती. ही थेट निर्यात दर्शवित असली तरी, सौदी अरेबिया आणि युएई मार्गे इराणला बासमती तांदळाची माेठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. निर्बंधांमुळे काही निर्यातदार अप्रत्यक्ष निर्यात पेमेंटसाठी अधिक सुरक्षित मानतात.

♻️ इराणमधील निर्यातीत 20.9 टक्क्यांची वाढ
चालू वर्षात म्हणजेच एप्रिल ते नोव्हेंबर 2025 या आठ महिन्यांमध्ये इराकच्या तुलनेत इराणला बासमती तांदळाची अधिक निर्यात करण्यात झाली. या काळात, इराणला 5.99 लाख टन बासमती तांदळाची निर्यात करण्यात आली, ज्यात आधीच्या तुलनेत 20.9 टक्के वाढ आहे आहे. इराकने 5.01 लाख टन आणि सौदी अरेबियाने 6.70 लाख टन बासतमी तांदूळ भारतातून आयात केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी इराक आणि सौदी अरेबियामध्ये भारतीय बासमती तांदळाची निर्यात कमी झाली.

♻️ इराणचे डाॅलरमधील व्यवहार बंद
इराण सरकार बासमती आणि इतर आवश्यक वस्तूंच्या आयातीसाठी अनुदानित परकीय चलन (डॉलर) देत असे. परंतु, त्यांचे डाॅलर्समधील हे व्यवहार जानेवारी 2026 पासून बंद करण्यात आले आहेत. याचा थेट परिणाम भारती बासमती तांदळाच्या निर्यातीवर होत आहे. त्यात डाेनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या व्यापारावर 25 टक्के अतिरिक्त टेरिफ लावण्याची धमकी दिल्यामुळे बासमती तांदळाच्या शिपमेंटमध्ये विलंब हाेत असून, पेमेंटमध्ये व्यत्यय हाेण्याची भीती निर्माण झाली आहे. ट्रम्पच्या या निर्णयानंतर भारतातील देशांतर्गत बाजारात बासमती तांदळाच्या किमती घसरू लागल्या आहेत. दुसरीकडे, चांगल्या किमतीच्या आशेने बासमती तांदूळ रोखून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती हानिकारक ठरण्याची शक्यता बळावली आहे.

♻️ मध्यस्थांचा मार्ग अधिक खर्चिक
या परिस्थितीमुळे इराण संबंधित बासमती तांदळाच्या निर्यातीचे जवळपास 2,000 काेटी रुपयांचे पेमेंट अडकले आहे, अशी माहिती भारतीय तांदूळ निर्यातदारांनी दिली. इराणमधील इंटरनेट सेवा खंडित झाल्यामुळे आणि बँकिंग चॅनेलमधील समस्यांमुळे भारतीय निर्यातदार आणि इराणी आयातदारांमधील संवाद विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नवीन करार जवळजवळ थांबले आहेत असन, बंदरे आणि राइस मिलच्या गोदामांमध्ये तांदळाचा साठा वाढला आहे. काही निर्यातदार युएई व तत्सम मध्यस्थांद्वारे इराणला जाणारी शिपमेंट पाठवण्याचा प्रयत्न करत असले तरी या व्यवहारात त्यांचा खर्च आणि पेमेंट सायकल वाढली आहे.

♻️ देशांतर्गत बाजारातील किमतीत घसरण
इराणसोबतच्या व्यापारातील व्यत्ययामुळे बासमती तांदळाच्या देशांतर्गत बाजारातील किमतीवरही परिणाम झाला आहे. गेल्या आठवड्यात हरियाणा, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेश या प्रमुख बाजारपेठांमध्ये घाऊक बासमती तांदळाच्या किमती सुमारे 5 ते 7 टक्क्यांची घसरण बघायला मिळाली. बासमती तांदळाच्या प्रमुख जातींच्या किमती प्रति किलो 5 ते 10 रुपयांनी कमी झाल्या आहेत, अशी माहिती तांदूळ व्यापाऱ्यांनी दिली असून, निर्यातदारांकडून होणारी खरेदी कमी झाल्याने बाजारावरील दबाव वाढत आहे, असेही त्यांनी सांगितले.

♻️ बासमती धान उत्पादक शेतकऱ्यांनाही फटका
या तिमाहीच्या सुरुवातीला बासमती तांदळाचे दर 950 डाॅलर्स प्रतिटन हाेते, ते दर आता 900 डाॅलर्स प्रतिटन पर्यंत खाली आले आहेत, अशी माहिती निर्यातदारांनी दिली. मध्यम श्रेणीच्या बासमती वाणांमध्ये ही दर घसरण अधिक असून, प्रीमियम क्वालिटी बासमती तांदळाची मागणी अमेरिका आणि युरोपीय राष्ट्रांमध्ये स्थिर आहे, अशी माहिती राइस मिलर्सनी दिली. इराणशी संबंधित भू-राजकीय स्थिती आणि कर जोखमी यामुळे भारतीय बासमती तांदूळ बाजाराचे नजीकचे भविष्य कमकुवत आणि अनिश्चित आहे, असे मत काही बाजारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय बासमती तांदळाची निर्यात वाढली असली तरी, वाढीचा दर लक्षणीय राहिलेला नाही. पाकिस्तानच्या प्रीमियम क्वालिटीच्या बासमती तांदळाने युरोपियन बाजारपेठेतील महत्त्वपूर्ण वाटा काबीज केला आहे. दुसरीकडे, बासमती तांदळाच्या निर्यातीच्या किमती वाढल्या असून, बासमती तांदळाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणारे भाव, जे काही वर्षांपूर्वी म्हणजे प्रतिक्विंटल 4,000 ते 4,500 रुपये होते, ते आता प्रति क्विंटल 3,000 ते 3,500 रुपयांपर्यंत खाली आल्याने या परिस्थितीचा फटका बासमती धान उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला आहे.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!