Cotton seed de-oil cake GST : सरकीच्या ढेपेवर 5 टक्के जीएसटी लावावा
1 min read
module: a; hw-remosaic: 0; touch: (-1.0, -1.0); modeInfo: ; sceneMode: Night; cct_value: 2828; AI_Scene: (-1, -1); aec_lux: 221.85612; hist255: 0.0; hist252~255: 0.0; hist0~25: 0.0;
Cotton seed de-oil cake GST : केंद्र सरकारने सरकी (Cotton seed) आणि सरकीच्या तेलावर (Cotton seed oil) 5 टक्के जीएसटी (GST – Goods and Services Tax) लावली आहे. पशुखाद्य (Cattle feed) असलेल्या साेयाबीन, मका व तांदळाच्या ढेपेवर 5 टक्के जीएसटी लावण्यात आली असली तरी सरकीची ढेप (Cotton seed de-oil cake) पशुखाद्य असूनही त्यावर मात्र जीएसटी लावण्यात आलेली नाही. सरकी, तेल, ढेप या साखळीतील व्यापार सुरळीत करण्यासाठी पशुखाद्य असलेल्या सरकीच्या ढेपेवर केंद्र सरकारने 5 टक्के जीएसटी लावावा, अशी मागणी मध्य भारत ऑइल मिल असाेसिएशनचे काॅन्क्लेव्हमध्ये सरकी तेल उत्पादकांनी केली आहे. त्यामुळे सरकारच्या उत्पन्नात भर पडणार असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले असून, यासाठी त्यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणीचे निवेदनही साेपविले आहे.
काेराडी, ता. कामठी, जिल्हा नागपूर येथील हाॅटेल नैवद्यम नाॅर्थ स्टारमध्ये आयाेजित या काॅन्क्लेव्हचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कामगार मंत्री आकाश फुंडकर, भाजपचे दयाशंकर तिवारी, असाेसिएशनचे मावळते अध्यक्ष विपीन अग्रवाल, उपाध्यक्ष राधेश्याम सुदा, मनीष शाह, सचिव तपेश चांदराणा उपस्थित हाेते. सरकी तेल उत्पादकांच्या सर्व समस्या साेडविण्याची ग्वाही चंद्रशेखर बावनकुळे व आकाश फुंडकर यांनी दिली.
⚫ जीएसटीबाबत मार्गदर्शन
पॅनल डिस्कशनमध्ये साैरभ मालपाणी यांनी सरकी व त्यापासून तयार हाेणारे तेल व ढेप ही उत्पादने, सरकी साठवून ठेवण्यासाठी लागणारा बारदाना, मशीन व इतर यंत्र सामग्री यासह जमीन, त्यावरील इमारत या स्थावर संपत्तीच्या खरेदी, विक्री प्रक्रियेतील जीएसटी व परतावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जीएसटीच्या परताव्यासाठी सरकीच्या वाहतुकीची बिल्टी, कॅश व जीएसटी इन्व्हाइस, वाहन क्रमांक, त्या वाहनाचा फास्टॅग, पुरवठादारांचे जीएसटी डिटेल्स, ई-वे बिल, पाेर्टल, ई-मेल याबाबत काेणती काळजी कशी घ्यावी, ई-वे बिलमध्ये हयगय केल्यास द्यावी लागणारी २०० टक्के पेनाॅल्टी यासह जीएसटी व कर कायद्यात करण्यात आलेल्या बदलांची माहिती दिली. पुरवठादाराने जीएसटी न भरल्यास ताे आपल्याला भरावा लागताे. त्यात आपले आर्थिक नुकसान हाेते, असेही साैरभ मालपाणी यांनी स्पष्ट केले.
⚫ सरकारचे वीजधाेरण, बचत व सबसिड
करण चाेपडा यांनी ऑइल मिलला केला जाणारा वीजपुरवठा, राज्य सरकार व महावितरण कंपनीने वीज धाेरणांमध्ये केलेले बदल, महाराष्ट्र सरकारने वीज धाेरण 2025, या धाेरणाचा प्रवास, विजेची बचत, वीज नियमांमध्ये करण्यात आलेले बदल, विजेची बिले, मिलला केल्या जाणाऱ्या वीजपुरवठ्याचे राेजचे झाेन व त्या झाेनच्या वेळा, झाेननिहाय वेळेतील विजेचा वापर, त्याचे बिल आणि त्यावर सरकारकडून मिळणारी सवलत, साैरऊर्जा, साेलर झाेन, विजेचे स्मार्ट मीटर, पाॅवर फॅक्टर, त्यातील करावयाच्या सुधारणा, ग्रुप नेट मीटरिंग पाॅलिसी, ग्रीन ओपन ॲक्सेस, बॅटरी एनर्जी स्टाेरेज सिस्टम यासह विजेच्या इतर बाबींची विस्तृत माहिती दिली.
आशिष चंद्राना यांनी राज्य सरकारचे ऑइल मिल वीजपुरवठा धाेरण, विजेचा तुटवडा, विजेचे ऑफ्टिक अवर, साेलर एनर्जी पाॅलिसी, दिवसा व रात्रीचे साैरऊर्जा उत्पादन आणि वापर, साैरऊर्जा साठवणुकीची साधने व त्यावरील खर्च (प्रतियुनिट 2 रुपये), विजेची बचत करण्यासाठी करावयाचे एनर्जी ऑडिट, मशीनला जाेडणारी माेटर, या माेटरचे आरपीएम (राेटेशन पर मिनीट), विजेची बचत करण्यासाठी वापरावयाची विजेची उपकरणे, इन्फ्रारेट, माेटारींना लावण्यात येणारे बेल्ट, बॅटरी एनर्जी स्टाेरेज सिस्टम तसेच विदर्भ व मराठवाड्याविषयीचे सरकारने वीज धाेरण व त्या धाेरणांतर्गत दिली जाणारी सबसिडी, सिझन सिलेक्शन यासह विजेच्या संदर्भातील इतर महत्त्वाच्या बाबींची माहिती दिली.
⚫ तेलाचे न्युट्रिलाझेशन
सरकीपासून दर्जेदार तेल तयार करायचे झाले तर ते किती तापमानावर (40 डिग्री सेल्सिअस) तयार करावे, या तेलाचे न्युट्रिलाझेशन (Neutralization) कसे करायचे, याची पद्धती महेंद्र गडिया यांनी समजावून सांगितली. न्युट्रिलाझेशनसाठी कच्चे तेल, कास्टिक साेडा (Sodium hydroxide) व पाण्याचा वापर, तेलाचा दर्जा, त्यातील फॅटी ॲसिड (Fatty acids), त्याचे गुणधर्म व परिणाम, न्युट्रिलाझेशनसाठी आवश्यक असलेला 15 ते 20 डिग्रीचा भाेवरा, त्याचा सेंटिमेंटल फाेर्स, कास्टिक साेड्याचे याेग्य प्रमाण, त्याची रिॲक्शन व त्यातून हाेणारे याेग्य न्युट्रिलाझेशन, तेलाचा रंग या महत्त्वाच्या बाबी त्यांनी समजावून सांगितल्या.
तेलाच्या न्युट्रिलाझेशनसाठी पाणी व कास्टिक साेडा महत्त्वाचा असताे. बाेअरवेलचे पाणी वापरू नये. पाण्याची हार्डनेस १०० पेक्षा अधिक नसावी. त्यात क्षारांचे प्रमाण अधिक नसावे. कारण हार्ड पाणी कास्टिक साेड्याची तीव्रता कमी करते. त्यासाठी पाण्याला साॅफ्टर लावावे. 1,000 किलाे तेलाचे इमल्शन (Emulsion) करण्यासाठी 1 किलाे कास्टिक साेडा वापरावा. इमल्शनसाठी तेलात कास्टिक साेडा टाकावा. कास्टिक साेड्यात तेल टाकू नये आदी महत्त्वाची काळजी घेण्याचे आवाहन महेंद्र गडिया यांनी केले.
⚫ कुशल मनुष्यबळाचा अभाव
सरकार २९ कामगार कायद्यांचे रुपांतर चार कायद्यांमध्ये करीत आहे. नवीन कामगार कायद्यानुसार कामांचे तास आठवरून 12 तास करण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयाचा उद्याेगाला फायदा हाेणार असल्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले तर सरकी तेल उद्याेगात कुशल मनुष्यबळाचा अभाव असल्याचे महेंद्र गडिया यांनी स्पष्ट केले. देशात कुशल कामगार तयार करणाऱ्या संस्था नाहीत. त्यामुळे काेणत्याही उद्याेगाला लागणारा कुशल कामगार हा त्याच उद्याेजकाला तयार करावा लागताे. लाेकसंख्येसाेबतच बेराेजगारांची संख्या वाढत आहे. त्यातच कामाचे तास 12 करण्यात येणार आहे. सलग अथवा एखाद दाेन टप्प्यात 12 तास काम करण्याची कामगारांची शारीरिक क्षमता आणि मानसिकता असेल काय, याचा मात्र धाेरणकर्त्यांनी विचार केला नाही.
या काॅन्क्लेव्हला असाेसिएशनचे संस्थापक अध्यक्ष विपीन अग्रवाल, हरयाणातील नवनितसिंग सैनी, पंजाबमधील अश्विनीकुमार, अश्विन गुप्ता, भगवान बन्सल, वीरेंद्र तापडिया, नितील गाेयल, गिरीश झांझरिया, भावेश शहा, प्रशांत मेहता, विनय सिंगल, अशाेक पारेख, मनाेज गाेयल यांच्यासह पंजाब, हरयाणा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांमधील मध्य भारत ऑइल मिल असाेसिएशनचे ४०० प्रतिनिधी उपस्थित हाेते.
⚫ गणेश चाैधरी नवे अध्यक्ष
या काॅन्क्लेव्हमध्ये मध्य भारत ऑइल मिल असाेसिएशनच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. गणेश चाैधरी, मलकापूर, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र यांची असाेसिएशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रताप ठाकूर, आर्वी, जिल्हा वर्धा, महाराष्ट्र, राधेश्याम सुदा, बेरडी, ता. साैंसर, जिल्हा पांढुर्णा, मध्य प्रदेश, करमचंद ठाकूर, अमरावती, महाराष्ट्र व अविन अग्रवाल मूर्तीजापूर, जिल्हा अकाेला यांची उपाध्यक्ष आणि मनीष शहा, नागपूर, महाराष्ट्र यांची सचिवपदी एकमताने निवड करण्यात आली. काेषाध्यक्षपदी विनाेद मुथा, वणी, जिल्हा यवतमाळ, महाराष्ट्र, सहसचिवपदी चंदन मुथा, मांधेली, समन्वयकदी तपेश चंदराणा, हिंगणघाट, जिल्हा वर्धा, महाराष्ट्र, सह-समन्वययकपदी पिकेश अग्रवाल, विसरवाडी, संस्थापक अध्यक्ष विपीन अग्रवाल, आर्वी, जिल्हा वर्धा, महाराष्ट्र यांची निवड करण्यात आली. सल्लागार समितीवर सतीयश राठी, खामगाव, जिल्हा बुलढाणा, विजय अग्रवाल, अमरावती, गाेविंद कलिया, अदिलाबाद, तेलंगणा, संजय अग्रवाल, अमरावती व नितीन गाेयल, इंदाेर, मध्य प्रदेश आणि सदस्यपदी अकीब चिनी, वणी, जिल्हा यवतमाळ, मुकेश मालपाणी, अदिलाबाद, तेलंगणा, भाविक काेचर, हिंगणघाट, जिल्हा वर्धा, सुनील जैन, यवतमाळ, सागर हरिआयानी, चंद्रपूर, राेहित सारडा, बीड, नितीन गाेयल, इंदाेर, मध्य प्रदेश, संदीप अग्रवाल, आकाेट, जिल्हा अकाेला आणि भूषण झंवर, वसमत, जिल्हा हिंगाेली यांची निवड करण्यात आली. या सर्व पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ एक वर्षाचा असताे.