Return journey of Monsoon : मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू
1 min read
Return journey of Monsoon : यावर्षी 24 मे 2025 रोजी मान्सून (Monsoon) केरळ, तामिळनाडू व कर्नाटकात या तीन राज्यांमध्ये एकाच दिवशी प्रवेश करून देशात दाखल झाला होता. देशात त्याने आजपर्यंत 113 दिवस हजेरी लावून आज (14 सप्टेंबर 2025) राजस्थानच्या वाळवंटी, मारवाड भागातील श्रीगंगानगर, बिकानेर, नागौर, फालुदी, जैसलमेर, जोधपूर, बारमेर जिल्ह्यांच्या भागातून माघारी फिरत त्याने आज रविवार 14 सप्टेंबर 2025 ला त्याच्या अपेक्षित सरासरी तारीख दि. 17 सप्टेंबरच्या तीन दिवस अगोदरच परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. परंतु, त्याला अजून पुढील महिनाभर देशात परतीचा प्रवास (Return journey) पूर्ण करावयाचा असून, साधारण 15 ऑक्टोबर या त्याच्या सरासरी तारखेदरम्यान देशातून निघून जाईल आणि दक्षिणेकडील चार राज्यात तो ईशान्य मान्सून म्हणून तो स्थिरावेल.
📍 कोणत्या कसोट्यावर मान्सून परतीची घोषणा?
🔆 सलग गेले पाच दिवस त्या भागात हवेच्या शुष्क वातावरणाचे प्राबल्य वाढून पावसाची गतिविधिता थांबली.
🔆 जमिनीपासून साधारण दीड किमी उंचीपर्यंत हवेचे उच्च दाबाची प्रत्यावर्ती वाऱ्याची स्थिती निर्माण झाली.
🔆 हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण कमी होवून हवेतील सापेक्ष आर्द्रता टक्केवारी खालावली.
🔆 दिवसाच्या कमाल तापमानात वाढ व रात्रीचे किमान तापमानात घट जाणवू लागली. म्हणून तर काल श्रीगंगानगर येथे देशातील सर्वाधिक कमाल तापमान 38 डिग्री सेंटिग्रेड होते.
🔆 आकाशातील निरभ्रता वाढली.
📍 महाराष्ट्रातील पाऊस
आजपासून (14 सप्टेंबर 2025) पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार, 18 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता जाणवते. त्यातही आज व उद्या म्हणजे रविवार व सोमवारच्या दोन दिवसात, दि. 14 व 15 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात अतिजोरदार पावसाची शक्यता अधिक जाणवते.
📍 अतिजोरदार पाऊस
मान्सूनच्या सक्रियतेनंतर आजपासुन सुरू होणाऱ्या संपूर्ण आठवड्यात म्हणजे गुरुवार दि. 18 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता निर्माण झाली असून, त्यातही उद्या व परवा, म्हणजे रविवार व सोमवार दि. 14 व 15 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता जाणवते.
📍 अत्याधिक पाऊस
विशेषतः पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर म्हणजे मावळ मुळशी ताम्हिणी, लोणावळा, खंडाळा, वेल्हे तसेच पोलादपूर, महाबळेश्वर, जावळी, पाटण व लागतच्या परिसरात या दोन दिवसात अत्याधिक पावसाची शक्यता जाणवते.
📍 पाऊस तीव्रतेतील कमी अधिक फरक
मंगळवार दि. 16 सप्टेंबरपासून संपूर्ण मराठवाडा, खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर अशा 18 जिल्ह्यात पावसाचा जोर (तीव्रता) पूर्णपणे नव्हे परंतु काहीसा कमी जाणवेल.
📍 कोकण, विदर्भातील पावसाचे सातत्य
मुंबईसह संपूर्ण कोकण व विदर्भ अशा 18 जिल्ह्यात मात्र जोरदार पावसाचे सातत्य सध्या तरी शनिवार 13 सप्टेंबरपासून पुढील 10 दिवस म्हणजे 22 सप्टेंबरपर्यंत टिकून राहण्याची शक्यता जाणवते.