krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Pre-monsoon rain : मेच्या शेवटच्या 10 दिवसात जोरदार पाऊस

1 min read

Pre-monsoon rain : मुंबईसह कोकण व संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत दिवसागणिक शनिवार (दि. 31 मे) पर्यंत मान्सूनपूर्व (मान्सूनचा नव्हे) विजा, वारा, वावधनासह केवळ मान्सूपूर्व (Pre-monsoon) अवकाळी (Unseasonal) पावसाची (rain) शक्यता कायम आहे. बुधवार (दि. 21 मे) ते शनिवार (दि. 31 मे) पर्यंतच्या 10 दिवसात मुंबईसह संपूर्ण कोकणातील 7 जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

कोकणाबरोबरच मध्य महाराष्ट्रातील 10 व मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात आजपासून (दि. 18 मे) पुढील आठवडाभर म्हणजे रविवार (दि. 25 मे)पर्यंत जोरदार तर विदर्भातील 11 जिल्ह्यात या दरम्यान मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी, खानदेश, नाशिक, अहिन्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी व नांदेड या 17 जिल्ह्यात या आठवड्यात वळवाच्या पावसाचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

🔆 शेतकऱ्यांना सल्ला
महाराष्ट्रात या पावसामुळे केवळ पेरणपूर्व शेतीच्या मशागतीचाच विचार व्हावा, असे वाटते. कपाशी व टोमॅटो लागवडी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी पाण्याची व्यवस्था असेल तरच लागवडीचा विचार करावा, अन्यथा लागवडीवर विपरीत परिणामही होऊ शकतो. अर्थात हा निर्णय शेतकऱ्यांनी स्वतःच्याच हिंमतीवर घ्यावा. कारण मान्सून अजूनही टप्प्यात नसून दूर आहे. त्याच्या सरासरी तारखेचा विचार केल्यास महाराष्ट्रात येण्यास 25 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्याच्या आगमनानंतर त्याची स्थिती काय असेल, त्याच वेळेस व्यक्त करता येईल.

🔆 पावसाचा जोर कशामुळे?
एकाच वेळी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर व दक्षिण चीनच्या प्रशांत महासागर या तीन समुद्रात 17 ते 20 डिग्री उत्तर अक्षवृत्त दरम्यान तिन्हीही ठिकाणी तयार होणारे कमी दाब क्षेत्रे व त्यातून तयार होणारी चक्रीय वाऱ्यांची स्थिती आणि या तिन्ही ठिकाणी त्यांचे उत्तरेकडे होणाऱ्या मार्गक्रमणामुळे वळवाच्या गडगडाटी पावसाची शक्यता या आठवड्यात निर्माण झाली आहे. अरबी समुद्रात गुजरात व महाराष्ट्र किनारपट्टी समोर तर बंगालच्या उपसागरात पश्चिम बंगाल व ओडिशा किनारपट्टी समोर तर प्रशांत महासागरात चीनच्या गूएन्गडॉन्ग राज्याच्या माकू शहराजवळील किनारपट्टी समोर या चक्रीय वाऱ्यांच्या स्थिती तयार होणार आहे. अरबी समुद्रातील गुजरातकडे तर बंगालच्या उपसागारातील ओडिशा छत्तीसगडकडे चक्रीय वाऱ्यांचे मार्गक्रमण होणार आहे. म्हणून महाराष्ट्र व गुजरात तसेच ओडिशा व पश्चिम बंगालमध्ये अवकाळी पावसाची शक्यता जाणवत आहे.

🔆 महाराष्ट्रातील तापमाने व आल्हाददायकपणा
वळवाच्या वातावरणामुळे महाराष्ट्रात दिवसाचे कमाल तापमान, त्याचबरोबर पहाटेचे किमान तापमानही सरासरीच्या खालीच असून, अशाच पद्धतीने राहण्याची शक्यता ही कायम आहे. या व्यतिरिक्त वातावरणात जर एकाकी काही बदल झालाच तर तसे सूचित करता येईल.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!