krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Cotton Straight varieties : कापूस बियाणे काळाबाजार राेखण्यासाठी सरळ वाण आवश्यक

1 min read

Cotton Straight varieties : केंद्र सरकारने 4 मे 2025 राेजी जीनाेम संपादित तांदळाच्या कमला आणि पुसा डीएसटी-1 या दाेन वाणांच्या उत्पादन आणि वापराला अधिकृत परवानगी दिली आहे. देशातील हायब्रिड कापसाची (Hybrid cotton) उत्पादकता व उत्पादन सातत्याने घटत आहे. दुसरीकडे, उत्पादन खर्च वाढत असून, दर कमी मिळत असल्याने कापसाचे उत्पादन घेणे आता अवघड झाले आहे. देशात या बियाण्यांचे उत्पादन मर्यादित असून, वापर वाढत असल्याने काळाबाजार हाेत आहे. हा काळाबाजार राेखण्यासाठी केंद्र सरकारने भारतीय शेतकऱ्यांना कापसाचे (Cotton) सरळ वाण (Straight varieties) उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे.

♻️ वाढता खर्च, घटते उत्पादन
जगात अमेरिका, भारत, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, उझबेकिस्तान, अर्जेंटिना, चीन, तुर्कस्थान, तुर्कमेनिस्तान, पाकिस्तान या प्रमुख देशामध्ये कापसाचे पीक घेतले जाते. भारत वगळता जगातील सर्वच कापूस उत्पादक देशांमध्ये बीटी कापसाचे सरळ वाण वापरले जाते. भारतात बीटी कापसाचे हायब्रिड वाण वापरले जात असून, या वाणाच्या उत्पादन आणि दर्जा यातील मर्यादा फार आधीच स्पष्ट झाल्या आहेत. भारतातील कृषी निविष्ठांचे वाढलेले दर व वापर, मजुरांची कमतरता आणि वाढलेले मजुरी दर यामुळे कापसाचा उत्पादन खर्च वाढला आहे. तुलनेत कापसाचे उत्पादन व शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी हाेत आहे. मागील काही वर्षांपासून कापसाचे उत्पादन वाढविण्यासाठी घन व अतिघन लागवडी पद्धतीचा अवलंब केला जात आहे. या दाेन्ही पद्धतीत बियाण्यांचा वापर प्रतिएकर दाेन पाकिटांवरून तीन ते सहा पाकिटांवर गेला आहे. शेतातील झाडांची संख्या वाढत असल्याने त्यांना लागणाऱ्या खते, कीटकनाशके आणि इतर बाबींवरील खर्च म्हणजेच कापसाचा एकूण उत्पादन खर्च वाढत आहे. तुलनेत कापसाला दर मात्र मिळत नाही. दुसरीकडे, देशातील कापसाचे एकूण उत्पादन 398 लाख गाठींवरून 290 लाख गाठींपर्यंत खाली आले आहे.

♻️ सन 2015 पासूनची मागणी
हायब्रिड बीटी कापसाच्या मर्यादा, खर्च व उत्पादन विचारात घेता केंद्र सरकारने भारतीय शेतकऱ्यांना बीटी कापसाचे सरळ वाण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आपण सन 2015 पासून सातत्याने करीत आहाेत. यासाठी आपण केंद्रीय कषी मंत्रालयाशी वारंपार पत्रव्यवहार केला. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी यात हस्तक्षेप करावा, यासाठी सन 2015 मध्ये त्यांनाही पत्र पाठविले हाेते. परंतु, सरकारने या 11 वर्षात भारतीय शेतकऱ्यांना बीटी कापसाचे सरळ वाण उपलब्ध करून दिले नाही, अशी माहिती कृषितज्ज्ञ विजय जावंधिया यांनी दिली. अमेरिकेत मजुरीचे दर भारतापेक्षा अधिक असूनही तिथे कापसाचे हायब्रिड ऐवजी सरळ वाण वापरले जाते.

♻️ बियाण्याचे मर्यादित उत्पादन व काळाबाजार
मर्यादित उत्पादन आणि वाढती मागणी यामुळे हायब्रिड बीटी कापसाच्या बियाण्याचा काळाबाजार वाढत आहे. त्यातच बाेगस बियाणे बाजारात येऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. भारतातील हायब्रिड बीटी कापूस बियाण्याच्या एकूण उत्पादनापैकी 90 टक्के उत्पादन गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या तीन राज्यांमध्ये हाेताे. एकट्या महाराष्ट्रात दरवर्षी कापूस बियाण्याच्या किमान 3 लाख तर तेलंगणात 2 लाख पॅकेटची आवश्यकता असते. घन व अतिघन लागवड पद्धतीत बियाण्याच्या पॅकेट दुप्पट व तिपटीने वाढतात, असेही विजय जावंधिया यांनी सांगितले. कापूस बियाण्याचे उत्पादन आणि वापर याचा ताळमेळ विचारात घेता देशात बीटी कापसाच्या बियाण्याचा तुटवडा निर्माण हाेऊन काळाबाजार हाेत आहे. प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे चाेरून विकले जात असल्याने हा तुटवडा फारसा कुणाच्या लक्षात येत नाही.

♻️ अतिघन लागवड पद्धती व अमेरिका
अलीकडे शेतकऱ्यांना कापूस उत्पादन वाढविण्यासाठी घन व अतिघन लागवड पद्धतीचे अवलंब करण्याचा सल्ला दिला जात आहे. या पद्धतीत प्रतिएकर २५ ते ३० हजार झाडे लावाली लागतात. त्यामुळे बियाण्याचे प्रतिएकर चार ते सहा पॅकेट वापरावे लागतात. पूर्वी आपल्या देशात कापसाचे प्रति एकर पाच किलाे बियाणे वापरले जायचे. तीच पद्धती अमेरिकत आजही सुरू आहे, अशी माहिती विजय जावंधिया यांनी दिली.

♻️ गुलाबी बाेंडअळीचा धाेका कायम
तांत्रिक कारणांमुळे कापसाच्या हायब्रिड बियाण्यांमध्ये बीटी जनुके पूर्ण क्षमतेने सक्रिय हाेत नसल्याने सिद्ध झाले आहे. त्यामुळे कापसावरील गुलाबी बाेंडअळीचा धाेका, त्यातून हाेणारे नुकसान व खालावणारा रुई व सरकीचा दर्जा या समस्या कायम ऐरणीवर आल्या आहेत. या बाबी सरळ वाणामध्ये टाळल्या जात असल्याचे जगभरातील संशाेधन व वापरावरून सिद्ध झाले आहे.

♻️ सीआरवाय-1 एसी जनुकांचा वापर का नाही?
पेटेन्ट ॲक्टनुसार सीआरवाय-1 एसी (एमओएन-531) (CRY-1-MON-531) या जनुकाची (Gene) राॅयल्टी सन 2012 मध्ये संपुष्टात आली आणि हे जीन राॅयल्टीमुक्त झाले. याच जीनचा वापर जीनाेम संपादित तांदळाचे दाेन वाण विकसित करण्यासाठी केला आहे. मग याच जनुकाचा वापर आजवर बीटीकापूस बियाण्यांमध्ये का केला नाही, याचे उत्तर कुणीही देत नाही. सरळ वाणासाठी भारतीय बियाणे उत्पादक कंपन्यांना अमेरिकेप्रमाणे शेतकऱ्यांकडून राॅयल्टी हवी आहे. केंद्र सरकार याला परवानगी देत नाही. हायब्रिड बियाणे हाय इल्ड (High yield) नसून, खते, पाणी याला हाय रिस्पाॅन्स (High response) आहे. हायब्रिड बियाण्यांमुळे कापसाच्या उत्पादनात फारसी वाढ हाेत नाही. काेरडवाहू उत्पादनासाठी सरळ वाण फायदेशीर ठरते, हे अनुभवावरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे सरकारने भारतीय शेतकऱ्यांना बीटी कापसाचे सरळ वाण उपलब्ध करून द्यायला हवे, अशी मागणीही कृषितज्ज्ञ विजय जावंधिया यांनी केली आहे.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!