krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Southwest monsoon : यंदा बंगालच्या उपसागरात लागणार मान्सूनची चाहूल

1 min read

Southwest monsoon : नैऋत्य मान्सून (Southwest monsoon) म्हणजेच भारतीय मान्सून (यंदाचा पावसाळा) विषुवृत्त समांतर पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रशांत महासागरीय प्रवास करत मलेशिया, सिंगापूर, सुमात्रा बेटाचा उत्तरेकडील भाग ओलांडून भारताच्या अंदमान व निकोबार बेटांच्या दक्षिणेकडील आग्नेय बंगालच्या उपसागरात म्हणजे 10 डिग्री उत्तर अक्षवृत्त व 100 डिग्री पूर्व रेखावृत्त दरम्यान येत्या आठ दिवसात म्हणजे 13 मे दरम्यान मजल-दरमजल करत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अर्थात भारत महासागरीय परिक्षेत्रात मान्सून प्रवेशला तरी भारत भू-भागावर म्हणजे केरळमध्ये व त्यानंतर सह्याद्री ओलांडून महाराष्ट्रात येण्यासाठी बराच कालावधी लोटला जातो. मात्र, मान्सूनच्या या गतीविधीमुळे त्या अगोदर पडणाऱ्या पूर्वमोसमी गडगडाटी पावसाला चालना मिळते.

अवकाळी पावसाचे वातावरण व गारपीट संबंधी रविवार (दि. 4 मे) ला दिलेला अंदाज कायम असून उर्वरित महाराष्ट्राबरोबरच मुंबईसह कोकणात 6 व 7 मे तर मराठवाड्यात 7 व 8 मे ला अवकाळीच्या वातावरणाची शक्यता वाढली आहे.

🎯 दिवसाची तापमाने
कोकण 33 ते 35 डिग्री सेंटिग्रेड, मध्य महाराष्ट्र 37 ते 41 डिग्री सेंटिग्रेड, विदर्भ व मराठवाडा 38 ते 41 डिग्री सेंटिग्रेड. कोकणातील ही तापमाने सरासरी तर उर्वरित महाराष्ट्रात ही तापमान (Temperature) सरासरीच्या खाली असून, भर उन्हाळ्यात उष्णतेच्या तापेपासून महाराष्ट्राला सुसह्यताच मिळत आहे. महाराष्ट्रात रात्रीचा उकाडा वा उष्णतेच्या लाटेची (Heat waves) सध्या कुठेही शक्यता जाणवत नाही.

🎯 कमाल तापमान व दुपारचा ताप
अवकाळीच्या वातावरणामुळे, कोकण वगळता मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दुपारच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा 2 ते 4 डिग्री सेंटिग्रेडने घट झाली आहे. त्यामुळे उन्हाची ताप विशेष जाणवत नाही. विशेषतः पुढील ठिकाणचे दुपारचे कमाल तापमाने ही सरासरीपेक्षा जळगाव 4.8, वर्धा 4.5, परभणी 3.9, अमरावती 3.7, चंद्रपूर 3.6, नागपूर 3.4, छत्रपती संभाजीनगर 3.2 डिग्री सेंटिग्रेडने खालावलेले आहे.

🎯 रात्रीच्या उकाड्यापासून सुटका
अवकाळीच्या वातावरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेच्या किमान तापमानात सरासरीपेक्षा 2 ते 6 डिग्री सेंटिग्रेडने घट झाली आहे. त्यामुळे रात्रीच्या उकाड्यापासून दिलासा मिळत आहे. विशेषतः पुढील ठिकाणचे पहाटेचे किमान तापमाने ही सरासरीपेक्षा, चंद्रपूर वगळता संपूर्ण विदर्भ 4 ते 6, धाराशिव वगळता संपूर्ण मराठवाडा 3 ते 5, जळगाव 6.5, अलिबाग 5.8, डहाणू 5.2, मुंबई कुलाबा 3.7, सांतक्रूझ 2.4 डिग्री सेंटिग्रेडने खालावलेले आहे. महाराष्ट्रातील तापमानाची स्थिती ही सोमवार (दि. 12 मे) म्हणजे बुद्ध पौर्णिमेपर्यंत अशीच टिकून राहील.

🎯 गारपिटीचा धोका
गुरुवार (दि. 8 मे)पासून संपूर्ण महाराष्ट्रात केवळ गारपिटीचा (Hail) धोका कमी होण्याची शक्यता जाणवते.

🎯 अवकाळीचे वातावरण
संपूर्ण कोकणातील व मध्य महाराष्ट्रातील (7+10) या 17 जिल्ह्यात मात्र अवकाळी पावसाची (Unseasonal rain) शक्यता रविवार (दि. 11 मे) पर्यंत टिकून राहण्याची शक्यता कायम आहे. विशेषतः कमी अधिक प्रमाणात रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर या 9 जिल्ह्यात मात्र अवकाळीचा प्रभाव हा असाच टिकून राहील, असे वाटते.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!