Monsoon, storm, hailstorm : यंदा मान्सून लवकर; वादळ, गारपिटीचे सावट कायम
1 min read
Monsoon, storm, hailstorm : यंदा मान्सूनचे (Monsoon) आगमन लवकर हाेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रावर वादळ (storm), अवकाळी पाऊस (Unseasonal rain) आणि गारपिटीचे (hailstorm) सावट रविवार (दि. 11 मे)पर्यंत कायम राहणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
🌀 सध्याच्या गारपिटीची कारणे
मध्य पाकिस्तान लगतच्या पंजाब आणि उत्तर-पश्चिम राजस्थानवर चक्रीवादळ म्हणून बनलेले वेस्टर्न डिस्टर्बन्स (पश्चिमी विक्शोभ) हे समुद्र सपाटीपासून वरच्या थरात 3.1 किमी वर आणि 7.6 किमी दरम्यान पसरलेले आहे. समुद्रसपाटीपासून वरच्या हवेचे चक्रीवादळ ईशान्य राजस्थान आणि शेजारच्या भागावर 1.5 किमी पर्यंत पसरलेले आहे. त्यामुळे वातावरणात अनपेक्षित बदल बघावयास मिळत आहे. हे बदल गारपिटीस अनुकूल ठरत आहेत.
🌀 गारपीट कशी होते ?
बंगालच्या उपसागरावरील हवेत वरच्या स्तरात अँटी सॉयक्लॉनिक सर्क्युलेशन (उलट्या दिशेने चक्राकार फिरणारे वारे) तयार झाले आणि तिथून थंड वारे विदर्भाकडे वाहू लागले तर याउलट दुसरीकडे गुजरात आणि अरबी समुद्रावरील हवेच्या वरच्या स्तरातही अँटी सॉयक्लॉनिक सर्क्युलेशनमुळे तिथले गरम वारे वाहू लागले की हे दोन्ही वारे मध्य भारतात येऊन एकमेकांना भिडतात. त्यामुळे छत्तीसगडपासून तर आंध्र प्रदेशपर्यंत वाऱ्यांच्या प्रणालीवर परिणाम होऊन इथे राज्यात पाऊस आणि गारपीट होते.
संपूर्ण राज्यात हे वातावरण रविवार (दि. 11 मे)पर्यंत कायम राहील. हे वारे ताशी 40 ते 50 किमी वेगाने वाहत राहतील. 7 व 8 मे ला जास्त प्रभाव हा विदर्भातील अकराही जिल्ह्यात बघावयास मिळेल. त्यामुळे तापमानात घट हाेईल. 11 मे पासून पुन्हा तापमानात वाढ होईल. उर्वरित महाराष्ट्र जसे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात देखील पूर्वमोसमी पाऊस हा साधारण 12 मे पर्यंत पडत राहील. त्यानंतर अधूनमधून ढगाळ हवामानाची परिस्थिती राहील. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यात 9 मे पर्यंत तर मराठवाड्यातील मधील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या जिल्ह्यात 11 मे पर्यंत पश्चिमी विक्शोभ मुळे गारपीट आणि वादळी वाऱ्याची शक्यता निर्माण झाली आहे.
🌀 मान्सून अंदमानात कधी येणार?
नैऋत्य मान्सून, म्हणजेच भारतीय मान्सून (यंदाचा पावसाळा), विषुवृत्त समांतर पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रशांत महासागरीय प्रवास करत मलेशिया, सिंगापूर, सुमात्रा बेटाचा उत्तरेकडील भाग ओलांडून भारताच्या अंदमान व निकोबार बेटांच्या दक्षिणेकडील बंगालच्या उपसागरात येत्या आठ दिवसात म्हणजे 13 मे दरम्यान पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याच्या सरासरी तारखेच्या सहा दिवस अगोदर अंदमानात हजेरी लावण्याची शक्यता आहे. साधारण 19 मे ला मान्सून अंदमान व निकोबार बेटावर व आग्नेय बंगालच्या खाडीत येतो.
🌀 अपेक्षित परिणाम
झाडांच्या फांद्या तुटणे, मोठ्या मार्गावरील झाडे उन्मळून पडणे, संत्रा, केळी आणि पपईच्या झाडांचे किरकोळ ते मोठे नुकसान, वीज आणि दळणवळण लाईनचे किरकोळ ते मोठे नुकसान होऊ शकते.
🌀 करावयाच्या उपाययोजना
गारांमुळे मोकळ्या ठिकाणी लोक आणि गुरेढोरे जखमी होऊ शकतात. जोरदार वाऱ्यामुळे असुरक्षित वास्तूंचे आंशिक नुकसान, कच्च्या घराच्या भिंती आणि झोपड्यांचे किरकोळ नुकसान, मोकळ्या वस्तू उडू शकतात.
🌀 पशुधन पोल्ट्री
अतिवृष्टी गारपिटीच्या वेळी जनावरांना शेडमध्ये ठेवा आणि त्यांना संतुलित आहार द्या. चारा खराब होऊ नये म्हणून चारा सुरक्षित ठिकाणी साठवा.