Hiwar Tree & Legend : हिवराभाेवती गुंफल्या ‘गंध’कथा तितक्याच ‘दंत’कथा
1 min read
Hiwar Tree & Legend : हिवराचे झाड (Hiwar Tree) ताेडताना उग्र दुर्गंधी यायची; यातून सन 2017 मध्ये अडेगाव, ता. देवळी, जिल्हा वर्धा येथील दीपक खंडाळे व सुनील कांबळे या दाेघांनी त्यांचे गंधज्ञान कायमचे गमवावे लागले. ग्रामीण भागातील वयाेवृद्ध मंडळी या झाडाला अनिष्ट मानतात. हे झाड ताेडताना उग्र दुर्गंधी येत असल्याने स्थानिक व पंचक्राेशीतील नागरिक या झाडाला हागऱ्या हिवर या नावाने ओळखतात. याच दुर्गंधीतून काही दंतकथांचा (Legend) जन्म झाला. या झाडाबाबत काही जण धार्मिक तर काही भावनात्मक संदर्भ देत वेगवेगळ्या गाेष्टी सांगतात.
🔆 दंतकथांचा जन्म
भारतीय लोकपरंपरेत झाडांशी निगडित अनेक दंतकथा आहेत. यातील काही दंतकथा धार्मिक समजुतीतून निर्माण झाल्या तर काहींना भावनात्मक संदर्भ दिला जाताे. हिवराच्या अशा कुप्रसिद्ध परिणामांमुळे या झाडाभोवती सुद्धा अनिष्ठतेची अनेक पुटं तयार होऊन त्यातून अनेक दंतकथांचा जन्म झालेला आढळतो. अजूनही खेडेगावात काही जुने जाणते लोक हिवराच्या झाडाबद्दल जाणून आहेत. हिवराच्या झाडाखाली सावलीत उभे राहत नाहीत, आराम करीत नाहीत अथवा जेवण करीत नाहीत. काही झाडे विषारी असतात. त्या झाडांसह हिवराचा निसर्ग व पर्यावरणाला उपयाेग आहे. त्यांना अनिष्ट मानून ताेडणे याेग्य नाही, असेही डाॅ. याेगेश पावशे यांनी सांगितले.
🔆 संरक्षण यंत्रणा सक्रीय
निसर्ग व पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्यासाठी प्रत्येक झाडाचे महत्त्वपूर्ण याेगदान आहे. याला हिवराचे झाड अपवाद नाही. हे झाड ताेडताना उग्र दुर्गंधी येत असल्याने ग्रामीण भागात या झाडाला अनिष्ट मानले जाते. या झाडातून येणारी दुर्गंधी ही त्याची संरक्षण यंत्रणा (Defense Mechanism) आहे. काेणत्याही कारणामुळे या झाडाला इजा अथवा त्याच्यावर राेग किंवा किडींचा प्रादुर्भाव झाल्यास त्याच्या शरीरात संरक्षण प्रणाली कार्यरत हाेऊन विशिष्ट प्रकारचा स्राव तयार हाेताे, ज्याची सडक्या मांसासारखी दुर्गंधी येते. या दुर्गंधीच्या अधिक काळ संपर्कात राहिल्यास माणसांचे गंधज्ञान नाहीसे हाेऊ शकते. काही असे वृक्ष आहेत की, ज्यांना इजा झाल्यास किंवा रोगजंतूंचे संक्रमण झाल्यास त्यांच्यात देखील संरक्षण प्रणाली कार्यरत होऊन एक विशिष्ट स्त्राव तयार होतो जो अतिविशिष्ठ सुगंधी असतो. अशा झाडांपैकी एक म्हणजे अगर किंवा अगरू हाेय, अशी माहिती हाॅर्टिकल्चरिस्ट प्रा. डाॅ. याेगेश पावशे यांनी दिली. याच कारणामुळे हिवराचे झाड ग्रामीण भागात कुप्रसिद्ध असून, त्यातून दंतकथा निर्माण झाल्या असाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
🔆 नळ-दमयंती यांची प्रेमकथा
नळ-दमयंती यांच्या प्रेमकथेत नळ राजाची अधोगती ही महत्त्वाची घटना आहे आणि त्यामध्ये हिवराच्या झाडाशी संबंधित एक दंतकथाही आहे, जी लोकपरंपरेत आढळते. जेव्हा नळ राजावर काली या अशुभ शक्तीचा प्रभाव पडतो आणि त्याचा राज्य, वैभव आणि सर्व काही नष्ट होते, तेव्हा तो वनात एकटा फिरू लागतो. त्यावेळी त्याचा चेहरा, देह आणि मनोवृत्ती पूर्णतः बदललेली असते. याच अवस्थेत तो हिवराच्या झाडाजवळ पोहोचतो. हिवराचे झाड (इंग्रजीत Ebony किंवा Indian Persimmon) हे काही परंपरांमध्ये अशुभ किंवा वाईट ऊर्जा शोषणारे झाड मानले जाते. दंतकथेनुसार नळ राजा हिवराच्या झाडाच्या संपर्कात आल्यावर त्याचे रूप अधिक विकृत झाले. काही कथांमध्ये असेही सांगितले जाते की, झाडाच्या फांदीत लपून बसताना त्याचे कपडे फाटले, त्याच्या अंगावर केस वाढले आणि तो ओळखू न येणारा बनला. या कथेमागची सांस्कृतिक धारणा ही आहे की, हिवराचे झाड म्हणजे दु:ख, विपत्ती आणि मानसिक अधोगतीचे प्रतीक आहे. त्यामुळे नळाची अवस्था अधिकच दयनीय झाली आणि त्याची परतफेडीची कहाणी अजून नाट्यमय झाली. ही दंतकथा प्राचीन महाभारतातील मूळ कथेत नाही, पण ग्रामीण लोकपरंपरेत, खासकरून महाराष्ट्रात ती लोककथांमधून पुढे आली आहे. जिथे झाडांचे आध्यात्मिक आणि प्रतीकात्मक महत्त्व फार खोलवर रुजलेले आहे.
🔆 अनिष्ट किंवा अधाेगतीचे प्रतीक
हिवराचे झाड काही भागात अशुभ, दु:ख, विपत्ती व मानसिक अधोगतीचे प्रतीक मानले जाते. या झाडाच्या संपर्कात आल्यास घरी कली म्हणजेच अरिष्ट शिरते, असा समज काही लोकांमध्ये आहे. रामायणातील कैकयी हिला हिवराच्या झाडाखालीच प्रभू रामाला वनवासात पाठवण्याची कल्पना सुचली, अशी एक लोककथा आहे. काही भागात मात्र याला वाईट ऊर्जा शोषणारे झाड मानले जाते. त्याविषयीच्या दंतकथा अथवा आख्यायिका कुणी सांगताना आढळून येत नाही. परंतु, निसर्ग आणि पर्यावरणाच्या संतुलनाच्या दृष्टीने विचार केल्यास केवळ अनिष्ठतेच्या भावनेतून हिवर अथवा तत्सम झाडे ताेडून नष्ट करणे याेग्य नाही.