Atmosphere : अवकाळीचे वातावरण निवळणार
1 min read
Atmosphere : महााष्ट्रात निर्माण झालेले अवकाळी (Unseasonal) पावसाचे (rain) वातावरण (Atmosphere) सोमवार (दि. 24 मार्च) पासून निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे रब्बी पीक काढणी दरम्यानचा अवकाळी पावसापासूनचा नुकसानीचा धोका टळू शकतो.
🔆 सध्याची तापमाने
मागील आठवड्यात तीन ते चार दिवस एकाकी झालेल्या दिवसाच्या कमाल तापमान वाढीतून उष्णतेमुळे कांदा, गहू सारख्या रब्बी पिकांवर विपरित परिणाम जाणवला. परंतु, अवकाळ पावसाच्या या वातावरणामुळे लगेचच 2 ते 3 डिग्री सेंटिग्रेटने घसरलेल्या कमाल व किमान तापमानामुळे पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या दिवसाचे कमाल तापमान, कोकणात 30 ते 32 डिग्री सेंटिग्रेट तर उर्वरित महाराष्ट्रात 36 डिग्री सेंटिग्रेट दरम्यान आणि किमान तापमान हे 18 ते 20 डिग्री सेंटिग्रेट दरम्यान जाणवत आहे. ही दोन्हीही तापमाने सरासरी इतक्याच श्रेणीत आहे. ही जमेची बाजू समजावी.
🔆 पुढील तापमानाची शक्यता
कमाल तापमानात वाढीची शक्यता जरी वर्तवली जात असली तरी पुढील 10 ते 12 दिवस म्हणजे गुढीपाडवा व त्यानंतरही 2 ते 3 दिवस म्हणजे साधारण बुधवार (दि. 2 एप्रिल)पर्यंत कमाल व किमान तापमाने ही महाराष्ट्रात सरासरीच्या खाली असण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे पिकांना मदतच होईल, असे वाटते. शिवाय, उभ्या असलेल्या रब्बी पिकांचा गत 60 ते 65 दिवसांचा अवकाळी व गारपिटीच्या धोक्याचा काळही निभावला आहे.
🔆 एप्रिलच्या पहिल्या आठवड्याचा अंदाज
कमकुवत ‘ला-निना’ (La Nina) व तटस्थ ‘आयओडी’ (Indian Ocean Dipole ) या स्थितीत जरी सध्या काहीही बदल जाणवत नसला तरी ‘एमजेओ’ची (Madden-Julian Oscillation ) सायकल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारत महासागरीय परीक्षेत्रात प्रवेश करण्याच्या शक्यतेमुळे त्याच्या परिणामातून काय वातावरणीय बदल घडून येतील. हे त्याचवेळी लघुपल्ल्याच्या अंदाजात कळून येईल. मार्चअखेरीस याचाही खुलासा होवू शकतो.
जागतिक हवामान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!