Budget : संकल्पात ‘अर्थ’चा वांधा
1 min read
Budget : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात साेमवारी (दि. 10 मार्च) राज्याच्या 2025-26 चा अर्थसंकल्प (Budget) सादर केला. यात नवीन घोषणांचा दुष्काळ आणि निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनांना बगल दिल्याचे दिसून आला. आर्थिक मर्यादांचा सामना करीत असलेल्या महायुती सरकारने ‘अर्थ’ कमी आणि ‘संकल्प’ अधिक असलेला अर्थसंकल्प दिला आहे. यात सरकारने थाेर पुरुषांच्या अनेक स्मारकांची घोषणा केली. प्रत्यक्षात निधीची तरतूद करायची नाही, असा अनुभव देखील आला आहे.
♻️ वित्तीय तूट
सन 2025-26 च्या अर्थसकंल्पामध्ये एकूण खर्चासाठी 7 लाख 20 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यात महसुली जमा 5 लाख 60 हजार 964 कोटी रुपये व महसुली खर्च 6 लाख 6 हजार 855 कोटी रुपये अंदाजित केला आहे. परिणामी, 45 हजार 891 कोटी रुपये अंदाजित तूट (Fiscal deficit) येत आहे. राजकोषीय उत्तरदायित्व व वित्तीय व्यवस्थापन कायद्यानुसार राजकोषीय तूट (राजकोषीय तूट) स्थूल राज्य उत्पन्नाच्या 3 टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यात सरकारला यापूर्व यश आले आले तरी यापुढे कसरत रावी लागणार आहे. राज्याची महसुली तूट (Revenue deficit) ही सातत्याने स्थूल राज्य उत्पन्नाच्या 1 टक्क्यापेक्षा कमी राहिली आहे. सन 2025-26 ची राजकोषीय तूट 1 लाख 36 हजार 235 कोटी रुपये आहे. ही तूट भरून काढण्यासाठी नव्याने कर्ज घेतल्यास राज्यावरील कर्जात पुन्हा वाढ हाेणार आहे.
♻️ विभागनिहाय निधीच तरतूद
🔆 महिला व बालविकास :- 31,907.00 कोटी रुपये.
🔆 ऊर्जा :- 21,534.00 कोटी रुपये.
🔆 सार्वजनिक बांधकाम रस्ते (सार्वजनिक उपक्रम वगळून) :- 19,079.00 कोटी रुपये.
🔆 जलसंपदा :- 15,932.00 कोटी रुपये.
🔆 ग्रामीण विकास :- 11,480.00 कोटी रुपये.
🔆 नागरी विकास :- 10,621.00 कोटी रुपये.
🔆 कृषी :- 9,710.00 कोटी रुपये.
🔆 नियोजन :- 9,060.45 कोटी रुपये.
🔆 इतर मागास बहुजन कल्याण :- 4,368.00 कोटी रुपये.
🔆 मृद व जलसंधारण :- 4,247.00 कोटी रुपये.
🔆 पाणीपुरवठा व स्वच्छता :- 3,875.00 कोटी रुपये.
🔆 सार्वजनिक आरोग्य :- 3,827.00 कोटी रुपये.
🔆 गृह (वाहतूक) :- 3,610.00 कोटी रुपये.
🔆 शालेय शिक्षण :- 2,959.00 कोटी रुपये.
🔆 सामाजिक न्याय :- 2,923.00 कोटी रुपये.
🔆 वैद्यकीय शिक्षण व औषधोपचार :- 2,517.00 कोटी रुपये.
🔆 वन :- 2,507.00 कोटी रुपये.
🔆 गृह पोलीस :- 2,237.00 कोटी रुपये.
🔆 नियोजन – रोजगार हमी योजना :- 2,205.00 कोटी रुपये.
🔆 पर्यटन :- 1,973.00 कोटी रुपये.
🔆 उच्च व तंत्रशिक्षण :- 810.00 कोटी रुपये.
🔆 दिव्यांग कल्याण :- 1,526.00 कोटी रुपये.
🔆 सार्वजनिक बांधकाम रस्ते (सार्वजनिक उपक्रम) :- 857.00 कोटी रुपये.
🔆 उच्च शिक्षण :- 2,288.00 कोटी रुपये.
🔆 सार्वजनिक बांधकाम – इमारती :- 1,367.00 कोटी रुपये.
🔆 सामान्य प्रशासन :- 1,299.50 कोटी रुपये.
🔆 गृहनिर्माण :- 1,246.55 कोटी रुपये.
🔆 सांस्कृतिक :- 1,186.00 कोटी रुपये.
🔆 माहिती व तंत्रज्ञान :- 1,052.50 कोटी रुपये.
🔆 उद्योग :- 1,021.00 कोटी रुपये.
🔆 सहकार :- 855.00 कोटी रुपये.
🔆 अल्पसंख्याक विकास :- 812.00 कोटी रुपये.
🔆 कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता :- 807.00 कोटी रुपये.
🔆 वस्त्रोद्योग :- 774.00 कोटी रुपये.
🔆 कायदा व न्याय :- 756.00 कोटी रुपये.
🔆 फलोत्पादन :- 708.00 कोटी रुपये.
🔆 मदत व पुनर्वसन :- 638.00 कोटी रुपये.
🔆 माहिती व जनसंपर्क :- 547.00 कोटी रुपये.
🔆 विधानमंडळ सचिवालय :- 547.00 कोटी रुपये.
🔆 क्रीडा :- 537.00 कोटी रुपये.
🔆 अन्न व नागरी पुरवठा :- 526.00 कोटी रुपये.
🔆 गृह – बंदरे :- 484.00 कोटी रुपये.
🔆 महसूल :- 474.00 कोटी रुपये.
🔆 आज्ञापित क्षेत्र :- 411.00 कोटी रुपये.
🔆 विपणन :- 323.00 कोटी रुपये.
🔆 पशुसंवर्धन :- 390.00 कोटी रुपये.
🔆 पर्यावरण व हवामान बदल :- 245.00 कोटी रुपये.
🔆 मत्स्यव्यवसाय :- 240.00 कोटी रुपये.
🔆 वित्त :- 208.00 कोटी रुपये.
🔆 कामगार :- 171.00 कोटी रुपये.
🔆 गृह – राज्य उत्पादन शुल्क :- 171.00 कोटी रुपये.
🔆 खारभूमी विकास :- 113.00 कोटी रुपये.
🔆 मराठी भाषा :- 225.00 कोटी रुपये.
🔆 अन्न व औषध प्रशासन :- 57.00 कोटी रुपये.
🔆 दुग्ध व्यवसाय :- 5.00 कोटी रुपये.
🔆 एकूण :- 1,90,242.00 कोटी रुपये.
(1 लाख 90 हजार 272 काेटी रुपये.)
♻️ खर्चासाठी निधी
🔆 उर्वरित महाराष्ट्र :- 67,538 काेटी रुपये.
🔆 विदर्भ :- 30,604 काेटी रुपये.
🔆 मराठवाडा :- 23,949 काेटी रुपये.
🔘 सन 2024-25 च् अर्थसंकल्पात 4 लाख 99 हजार 463 कोटी रुपये महसूल जमा हाेणे अपेक्षित होते. महसुली जमेचा सुधारित अंदाज 5 लाख 36 हजार 463 कोटी रुपये निश्चित केला आहे. सन 2024-25 च्या एकूण खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज 6 लाख 12 हजार 293 कोटी रुपये व सुधारित अंदाज 6 लाख 72 हजार 30 कोटी रुपये असून, भांडवली व कल्याणकारी योजनांवरील खर्चात झालेल्या वाढीमुळे सन 2024-25 या वर्षाच्या एकूण खर्चाच्या सुधारित अंदाजात वाढ झाली आहे.
🔘 सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी राज्याच्या स्वत:च्या कर महसुलाचे अर्थसंकल्पीय उद्दिष्ट 3 लाख 43 हजार 40 कोटी रुपये एवढे निश्चित केले होते.
🔘 मोटार वाहन कराची कमाल मर्यादा 20 लाख रुपयांवरून 30 लाख रुपये करण्याचे प्रस्तावित केले आहे. कमाल मर्यादेत प्रस्तावित वाढीमुळे सन 2025-26 मध्ये राज्याला सुमारे 170 कोटी रुपये अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे.
♻️ नवीन औद्योगिक धोरण
नवीन औद्योगिक धोरण 2025 लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. त्या धोरणानुसार पाच वर्षात 40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व 50 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट असेल. अवकाश व संरक्षण क्षेत्र उत्पादन धोरण, इलेक्ट्रॉनिक्स धोरण, जेम्स अॅन्ड ज्वेलरी धोरण, सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम धोरण, चक्रीय अर्थव्यवस्थेसाठी स्वतंत्र क्षेत्रीय धोरण जाहीर करण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या नवीन कामगार संहितेनुसार नवीन कामगार नियम तयार करण्यात येणार आहेत.
♻️ महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण-2023
निर्यातीमध्ये भरीव वाढ होण्यासाठी राज्याने महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण-2023 जाहीर केले आहे. या धाेरणांतर्गत राज्यात 37 विशेष आर्थिक क्षेत्रे, 8 कृषी निर्यात क्षेत्रे, निर्यातकेंद्रीत 27 औद्योगिक पार्क उभारण्यात आले आहेत. त्यामुळे देशाच्या एकूण निर्यातीत राज्याचे योगदान 15.4 टक्के असल्याचा दावा सरकारने केला आहे. सन 2023-24 मध्ये एकूण 5 लाख 56 हजार 379 कोटी रुपयांची तर सन 2024-25 मध्ये नोव्हेंबर 2024 पर्यंत 3 लाख 58 हजार 439 कोटी रुपयांची उत्पादने निर्यात केल्याचा दावा केला आहे.
♻️ 16 लाख रोजगार
दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये राज्य शासनाद्वारे एकूण 63 कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. त्या माध्यमातून येत्या काळात 15 लाख 72 हजार 654 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, त्यातून सुमारे 16 लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा सरकारने केला आहे. समतोल प्रादेशिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत 2025-26 मध्ये 6,400 कोटी रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले.
♻️ लाडकी बहीण याेजना
लाडकी बहीण याेजनेसाठी जुलै 2024 पासून 9 महिन्यात 33 हजार 231 कोटी रुपये खर्च करण्यात आले. दरमहा 1,500 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले. अर्थसंकल्पात याेजनेवर 2025-26 साठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या योजनेंतर्गत आता दरमहा 2,100 रुपये देण्यास अजित पवार यांनी नकार दिला. महिलांनी या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केल्यास त्यांना प्रोत्साहन देण्याची योजना विचाराधीन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
♻️ अॅग्रो-लॉजिस्टिक हब
समृद्धी महामार्गाचे 99 टक्के काम पूर्ण झाले आहे. सरकारने या महामार्गावर अॅग्रो लॉजिस्टिक हब विकसित करण्याची घोषणा पुन्हा एकदा केली आहे. अॅग्रो लॉजिस्टिक्स हबमध्ये कोल्ड स्टोरेज, ग्रेडिंग, पॅकिंग आणि निर्यात हाताळणीच्या सुविधा असतील.
♻️ स्टील हब
गडचिरोली जिल्ह्यात स्टील हब विकास करण्याची घाेषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात वाहतूक सेवा बळकट करण्यासाठी 500 कोटी रुपये खर्च करून खनिकर्म महामार्गाचे जाळे तयार करण्यात येणार आहे. गडचिरोलीत 21,830 कोटी रुपयांच्या गुंतवणुकी करार झाल्याचा तसेच यातून 7,500 राेजगार निर्मितीचा दावा सरकारने केला आहे.
♻️ लॉजिस्टिक धोरण-2024
राज्याचे लॉजिस्टिक धोरण-2024 जाहीर केले असून, त्याद्वारे 10 हजार एकराहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. प्रकल्पांना देऊ केलेल्या विशेष प्रोत्साहन व सुविधांमुळे सुमारे 5 लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले.
♻️ महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग
राज्यात दुसरा सर्वांत मोठा महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्रादेवीपर्यंत बांधण्यात येणार आहे. या 760 किमी लांबीच्या व 86,300 कोटी रुपये किमतीच्या महामार्गाकरिता भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे.
♻️ गोसीखुर्द प्रकल्प
गोसीखुर्द प्रकल्प जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय प्रकल्पातून डिसेंबर 2024 अखेर 12 हजार 332 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. हा प्रकल्प जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन राज्य सरकारने केले आहे. या प्रकल्पासाठी सन 2025-26 करिता 1,460 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित केला आहे.
♻️ वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्प
वैनगंगा – नळगंगा या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पास राज्य शासनाने तत्वतः मान्यता दिली आहे. 19,300 कोटी रुपये किमतीच्या तापी महापुनर्भरण प्रकल्पाद्वारे पश्चिम विदर्भातील खारपाण पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचा दावा सरकारने केला आहे.
♻️ जिल्हा नियोजनात वाढ
सन 2025-26 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 20 हजार 165 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही तरतूद 2 हजार कोटी रुपयांनी अधिक आहे.
♻️ सात हजार किमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण
सात हजार किमी लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. एक हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेली 3,582 गावे ही 14 हजार किमी लांबीच्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांनी प्रमुख जिल्हा मार्ग, राज्य महामार्ग किंवा राष्ट्रीय महामार्गाला जोडली जातील. यावर 30,000 कोटी रुपये खर्च करण्यात येतील.
♻️ प्रमुख घोषणा
🔘 या वर्षात मेट्रोचे मुंबईत 41 किमी, पुण्यात 23 किमी आणि नागपुरात 43 किमी मार्ग पूर्ण होतील.
🔘 हरित ऊर्जा अंतर्गत एसटी महामंडळाच्या 6 हजार डिझेल बसेस सीएनजीमध्ये परिवर्तीत करणार.
🔘 बांबू आधारित उद्योगासाठी 4 हजार 300 कोटींची बांबू वृक्षारोपण योजना.
🔘 कृषी व्यवसाय केंद्रासाठी 2,100 कोटी रुपये.
🔘 प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत 1,500 किमीचे ग्रामीण रस्ते.
🔘 महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाइल मिशनची स्थापना करणार.
🔘 हातमाग विणकरांसाठी नागपूर येथे अर्बन हाट केंद्रांची स्थापना करणार.
🔘 नवी मुंबई येथे 250 एकर क्षेत्रावर इनोव्हेशन सिटी उभारणार.
♻️ नवीन व प्रगतिपथावरील स्मारके
🔘 छत्रपती संभाजी महाराज यांचे कोकणातील संगमेश्वर येथे भव्य स्मारक.
🔘 आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज भव्य स्मारक.
🔘 मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून हरियाणातील पानिपत येथे स्मारक.
🔘 दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई येथे भव्य स्मारक.
🔘 सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव (ता. खंडाळा, जिल्हा सातारा) येथे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र.
🔘 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मस्थळ वाटेगाव (ता. वाळवा, जिल्हा सांगली) येथे स्मारक.
🔘 शंभुराजेंचे बलिदान स्थळ असलेल्या तुळापूर अन् समाधीस्थळ वढु बुद्रुकमध्ये भव्य स्मारकाचे काम प्रगतिपथावर.
🔘 पुणे शहरातील आंबेगांव येथे चार टप्प्यात भव्य शिवसृष्टी प्रकल्पाचे दोन टप्पे पूर्ण. उर्वरित कामासाठी 50 कोटींची तरतूद.
🔘 स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण. दुसऱ्या टप्प्यासाठी 220 कोटींचा निधी.
🔘 मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी पुरेसा निधी.
🔘 संगमवाडी, पुणे येथील वस्ताद लहुजी साळवे यांच्या स्मारकाचे काम प्रगतिपथावर.