Onion production, export duty : कांद्याचे विक्रमी उत्पादन, 20 टक्के निर्यात शुल्क रद्द करा
1 min read
Onion production, export duty : यावर्षीच्या रब्बी हंगामात महाराष्ट्रातील कांदा (Onion) उत्पादक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदा लागवड करण्यात आली आहे. या कांद्याच्या काढणीला सुरुवात देखील झाली आहे. एप्रिल व मे महिन्यामध्ये कांदा काढणीला गती येणार आहे. यावर्षी कांद्याचे विक्रमी व अतिरिक्त उत्पादन (production) हाेणार असून, बाजारात आवक वाढल्याने कांद्याचे दर काेसळणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांचे आर्थिक नुकसान हाेणार आहे. ते टाळण्यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क (export duty) रद्द करावा तसेच यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारशी सकारात्मक चर्चा करून मार्ग काढावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक भारत दिघाेळे, नाशिकचे जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे यांच्यासह कांदा उत्पादकांनी केली आहे.
♻️ निच्चांकी दर
या आठवड्याच्या सुरुवातीला राज्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये उन्हाळी व लाल या दोन्ही प्रकाराच्या कांद्याला सरासरी 1,200 रुपये प्रतिक्विंटल (12 रुपये प्रतिकिलाे) दर मिळाला आहे. हा कांद्याचा अलीकडच्या काळातील निच्चांकी दर आहे. या दरात काेणत्याही शेतकऱ्याच्या कांद्याचा उत्पादन खर्च भरून निघत नाही.
♻️ निर्यात शुल्क
जागतिक बाजारात भारतीय अर्थात नाशिकच्या लाल व उन्हाळी कांद्याला भरीव मागणी आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर आधीच 20 टक्के निर्यात शुल्क लावला आहे. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत भारतीय कांद्याचे दर वाढले असून, निर्यात घटली आहे. निर्यात वाढविण्यासाठी जागतिक बाजारात इतर देशांमधील कांद्याच्या दराच्या तुलनेत भारतीय कांद्याचे दर समांतर करणे किंबहुना त्यांच्यपेक्षा कमी करणे गरजेचे आहे. त्यासाठी कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क रद्द करणे गरजेचे आहे. हा तिढा साेडविण्यासाठी तसेच राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारशी चर्चा करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
♻️ कांदा उत्पादक जिल्ह्यांचा दाैरा करा
सध्या कांद्याला मिळणाऱ्या निच्चांकी दरात कांद्याचा अर्धा उत्पादन खर्च भरून निघत नाही. त्यामुळे कांदा उत्पादकांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. यावर्षी राज्यात पाऊसमान चांगले झाले असल्याने रब्बी हंगामात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. आपण स्वत: राज्यातील कांदा उत्पादक जिल्ह्यांचा दाैरा करून प्रत्यक्ष पाहणी करून खातरजमा करावी, अशी सूचनाही भारत दिघाेळे व जयदीप भदाणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
♻️ दर काेसळण्याची शक्यता
सध्या बाजारात कांद्याची आवक कमी असताना दर काेसळले असून, ते निच्चांकी पातळीवर आले आहेत. येत्या काही दिवसांत उन्हाळी काद्याच्या काढणीला वेग येणार असून, अतिरिक्त उत्पादनामुळे एप्रिल व मे महिन्यात बाजारात कांद्याची आवक देखील वाढणार आहे. तेव्हा कांद्याचे दर सध्याच्या दरापेक्षा कमी हाेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी देशांतर्गत कांद्याच्या पुरवठ्याची पूर्तता होऊन अतिरिक्त कांदा जास्तीत जास्त निर्यात करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी आपण स्वत: लक्ष घालून केंद्र सरकारकडून कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क तत्काळ रद्द करून घ्यावा आणि कांद्याच्या निर्यातीला अनुदान मिळवून देण्यासाठी केंद्र सरकाकडे प्रयत्न करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.