Hail with rain : अवकाळी पावसासाेबत गारपिटीची शक्यता
1 min read
Hail with rain : मंगळवारी (दि. 18 मार्च) दिलेला अंदाज कायम असून, त्याच बरोबर विदर्भातील 11 जिल्ह्यात गुरुवार (दि. 20 मार्च) ते ते रविवार (दि. 23 मार्च) या चार दिवसात अवकाळी (Unseasonal) पावसाची (rain) शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व यवतमाळ तसेच मराठवाड्यातील नांदेड या आठ जिल्ह्यात गुरुवार (दि. 20 मार्च) ते शनिवार (दि. 22 मार्च) दरम्यान अवकाळी पावसासाेबत गारपिटीची (Hail) शक्यता नाकारता येत नाही.
🔆 मध्य महाराष्ट्रात अवकाळीचा धोका?
मध्य महाराष्ट्रातील खान्देश तसेच नाशिक, अहिल्यानगर (अहमदनगर), पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यात सध्या जरी अवकाळीचा परिणाम नसला तरी रविवार (दि. 23 मार्च) ते मंगळवार (दि. 25 मार्च) हे तीन दिवस ढगाळ वातावरण राहून झालाच तर अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. पावसापेक्षा विजा, वारा व गडगडाटीसारख्या अवकाळी वातावरणाची शक्यता अधिक जाणवते. गारपिटीची शक्यता मात्र या 10 जिल्ह्यात जाणवत नाही.
🔆 उष्णतेची लाट?
गुरुवार (दि. 20 मार्च) ते साेमवार (दि. 24 मार्च) या पाच दिवसात कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात दिवसाच्या दुपारच्या कमाल तापमानात काहीशी घट होवून तापमान सध्यापेक्षा 2-3 डिग्रीने कमाल तापमान घटण्याची शक्यता असून महाराष्ट्रात कोठेही सध्या उष्णतेच्या लाटेची शक्यता नाही. मुंबईसह कोकणातील सात जिल्ह्यात मात्र सध्या असलेल्या तापमानात विशेष बदल न होता ते कायम राहील.
🔆 वातावरणातील बदल कशामुळे?
बंगालच्या उपसागारातील 900 मीटर उंचीपर्यंतच्या प्रत्यावर्ती चक्रीय वारे व मध्य प्रदेशाच्या नैऋत्य भागात 1,500 मीटर उंचीपर्यंतच्या आवर्ती चक्रीय वारे अशा दोन्हीही वाऱ्यांचा विदर्भादरम्यान होणाऱ्या संगमातून ऊबदार बाष्पाचा अवकाशात उर्ध्वगमन होवून उंचावरील थंडाव्यातून सांद्रीभवनातून उष्णतेच्या संवहनी क्रियेद्वारे अवकाळी पाऊस व गारपिटीची शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रात मंगळवार (दि. 18 मार्च) ते शनिवार (दि. 22 मार्च) या पाच दिवसात खालीलप्रमाणे भागपरत्वे दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरणासह अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. पावसापेक्षा विजा, वारा व गडगडाटीच्या वातावरणाची शक्यता अधिक जाणवते.
मध्य महाराष्ट्रातील खान्देश ते कोल्हापूर, सोलापूरपर्यंतच्या 10 जिल्ह्यात मंगळवार (दि. 18 मार्च) ते गुरुवार (दि. 20 मार्च) या तीन दिवस तर मराठवड्यातील आठ जिल्ह्यात आज मंगळवार ते शुक्रवार (दि. 21 मार्च) हे चार दिवस व विदर्भातील 11 जिल्ह्यात शुक्रवार व शनिवार दरम्यानचे दोन दिवस अवकाळी वातावरणाचा परिणाम जाणवेल.
विशेषतः मराठवाडा, विदर्भ व जळगाव, दक्षिण नगर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात शुक्रवारी ( दि. 21 मार्च) ला या वातावरणाचा प्रभाव अधिक जाणवेल. दरम्यानच्या पाच दिवसात कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात दिवसाच्या दुपारच्या कमाल तापमानात काहीशी घट होवून तापमान सध्यापेक्षा 2-3 डिग्रीने खालावेल, असे वाटते.