Teacher & Non-academic work : शिक्षकांच्या अशैक्षणिक कामांचे काय?
1 min read
Teacher & Non-academic work : शिक्षणमंत्री शिक्षकांची (Teacher) अशैक्षणिक कामे (Non-academic work) कमी करण्यासंदर्भात प्रारूप करत आहेत, हे स्वागतार्ह आहे. दादा भुसे शिक्षणमंत्री (Education Minister) झाल्यावर पहिल्या भेटीत मी त्यांना निवेदन दिले. त्यात शिक्षकांचे अशैक्षणिक कामे कमी करण्यासाठी शिक्षक व अधिकारी यांची एक समिती करावी, अशी मागणी केली. त्याला त्यांनी दिलेला हा प्रतिसाद समाधानकारक आहे. नवीन शिक्षण धोरणाने निवडणूक जनगणना सोडून इतर कामे दिली जाणार नाही, असे सांगूनही कामे वाढत गेली.
निवडणूक (Election) आणि जनगणना (Census) या कामांची चर्चा होते, पण जनगणना ही 10 वर्षांनी असते (या दशकात तर ती ही नाही) आणि निवडणूक 5 वर्षांनी असते. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, विधानसभा व लोकसभा या फार तर 5 निवडणुका. त्याची प्रशिक्षणे धरून 5 वर्षात 20 दिवस. त्यामुळे जनगणना व निवडणुका यात फार वेळ जात नाही. मात्र, ज्या शिक्षकांना BLO चे काम दिलेले असते, त्या शिक्षकांचा मात्र खूप वेळ जातो. त्यांना मतदारयादी दुरुस्तीपासून स्लीप वाटण्यापर्यंत सर्व कामे करावी लागतात. ते काम काढून घ्यावे.
निवडणूक, जनगणना यापेक्षा शिक्षकांचा खरा वेळ कागदपत्रे आणि विविध योजना स्पर्धा मिटिंग यामध्ये जातो. Syscom या संस्थेने एकदा शिक्षण सचिवांची डायरी मागवली होती. तेव्हा 3 महिन्यात ते 125 पेक्षा जास्त बैठकांना उपस्थित होते. ते संचालकांच्या मीटिंग घेतात, संचालक उपसंचालकांच्या आणि खाली त्या बैठका थेट शिक्षकापर्यंत येतात आणि प्रत्येक विषयाचे नवे नवे कागद फिरत राहतात.
VC ही सुविधा नव्हे तर सर्वात मोठी असुविधा बनली आहे. एका दिवसात 3 ते 4 VC असतात. त्यातून अधिकारी कार्यालयातच अडकलेत. त्यामुळे शाळा भेटी थांबल्या आहेत. त्यामुळे महिन्याचे सुरुवातीचे 3 दिवस आणि शेवटचे 3 दिवस फक्त शिक्षण विभागात मिटिंग होतील आणि मधल्या काळात सचिव ते केंद्रप्रमुख फक्त शाळांना भेटी देतील असे स्पष्ट निर्देश द्यावेत.
सध्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत आणि महाराष्ट्रात सर्वत्र शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू आहेत. यात विद्यार्थ्यांची नुकसान होते आहे. केवळ मार्च एंड खर्च पूर्ण करण्यासाठी हे सुरू आहे का? वास्तविक मे महिन्याच्या सुटीत हे घेण्यास काहीच अडचण नाही. त्यात विद्यार्थी नुकसान होणार नाही, पण अशैक्षणिक कामात वेळ जातो ही ओरड करणाऱ्या शिक्षक संघटना सुटीत बोलावले तरीही ओरड करतात.
तेव्हा मिटिंग प्रशिक्षण नियंत्रित व्हावेत. विविध उपक्रम व स्पर्धा यात वेळ जातो. महावाचन उपक्रम यात विद्यार्थ्यांनी वाचन करून त्याचा परिचय टाकायचा होता. निवडक विद्यार्थ्यांचे अभिप्राय समजू शकतो, पण शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने टाकणे बंधनकारक केले. हायस्कूलमध्ये हजार विद्यार्थी असतील प्रत्येक अभिप्राय अपलोड करायला लावला.
केंद्र सरकारच्या ‘परीक्षा पे चर्चा’ ते गावच्या ग्रामपंचायतीपर्यंत सर्व उपक्रमात भाग घ्यावा लागतो. क्रीडा स्पर्धा, चित्रकला ते सांस्कृतिक स्पर्धा शिक्षण विभाग आयोजन करतो. वास्तविक या स्पर्धा शासनाने घेण्याची गरज नाही. शालेय पोषण आहार शिजवणे व त्याचा हिशोब ठेवणे, यातही खूप वेळ जातो.
त्या खालोखाल वेळ जातो ते माहिती मागवण्यात. Whatsapp आल्यावर माहिती मागवणे अधिक सोपे झाले त्यामुळे दिवसभर अनेक पत्र पडत असतात व प्रत्येकावर तात्काळ हा शेरा असतो. विविध शिष्यवृत्ती, आर्थिक नियोजन हिशोब यासाठी माहिती मागवणे गरजेचे आहे, पण अधिकाऱ्यांनी जून ते एप्रिल महिन्यात 5 तालुके निवडून वर्षभरात किती माहिती मागवली ते मॅसेज व पत्र एकत्र करावेत व गरज नसताना कोणती माहिती मागवली? जी माहिती शासनाकडे असताना मागवली असे वर्गीकरण करायला हवे. तरच या माहिती कमी होतील. एखादे software विकसित केले तर त्यात सुलभता येईल. केंद्रात किंवा तालुका जिल्हा कार्यालयात माहिती असताना कोणती माहिती विनाकारण शाळेकडून मागवली, हे ही बघायला हवे.
मात्र, अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांना लिहिता वाचता येत नाही, हा शिक्षकांचा बचाव फसवा आहे. काम न करणारे ही चुकीची ढाल वापरतात. जर या कामांमुळे वाचत नसतील तर राज्यातील सर्व विद्यार्थी अप्रगत असायला हवे होते. पण गुणवत्तेत अव्वल असणाऱ्या राज्यातील अनेक शाळा ही कामे करून गुणवत्ता कशी आणतात? वर्षात 800 तास शाळा चालते. 4 थी पर्यंत विद्यार्थी 3,200 तास शाळेत असतो. त्यातील अगदी 500 तास अशैक्षणिक कामात गेले तरी वाचन लेखन गणित शिकवायला 2,700 तास कमी आहेत का?
तेव्हा वाचन लेखन सरावासाठी असे शिक्षक वेळ देत नाहीत किंवा ते शिकवण्याचे कौशल्य त्यांच्यात कमी आहे हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे. आज शाळेच्या वेळेत शिक्षक मोबाइल वापरण्यामुळे जाणारा वेळ हा ही चिंतेचा विषय आहे. जर गुणवत्तेसाठी वेळ कमी पडत असेल तर शिक्षण कायद्याने आठवड्याला 30 तास अध्यापन व 15 तास अध्यापन पूर्वतयारी असा वेळ देणे अपेक्षित आहे. जर शिक्षक रोज 2 तास या पूर्वतयारीसाठी शाळेत लवकर गेले तर, अशैक्षणिक कामांची तक्रार करण्याची वेळच येणार नाही. अशैक्षणिक कामे बंद करून गुणवत्तेसाठी हा पूर्वतयारीचा वेळ शाळेत सक्रीय करण्याची आवश्यकता आहे.