Rain possibility : या आठवड्यातील पावसाची शक्यता बारगळली
1 min read
Rain possibility : सध्या घड्याळ काटा दिशेचे प्रत्यावर्ती चक्रीय वारे (Cyclonic storms) केवळ ओडिशामध्येच स्थिर आहेत. त्यामुळे बंगालच्या उपसागारातून ताशी 30 ते 35 किमी वेगाने महाराष्ट्राकडे आर्द्रता (Humidity) घेऊन येणारे अपेक्षित वेगवान पूर्वीय वाऱ्यांना शिथिलता प्राप्त झाल्याने 1 ते 5 फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्रात अपेक्षित ढगाळ वातावरणासह (Cloudy weather) पावसाची शक्यता (Rain possibility) मावळली आहे.
🎯 थंडीत वाढ होण्याची शक्यता
मावळलेल्या पावसाळी वातावरणामुळे महाराष्ट्रात आकाश निरभ्र राहील. त्यामुळे पुढील 10 दिवस म्हणजे बुधवार (दि. 12 फेब्रुवारी) अर्थात माघ पौर्णिमेपर्यंत पहाटेचे किमान तापमानात 1 ते 2 डिग्री सेंटिग्रेडपर्यंत आता घसरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात येणाऱ्या या 10 दिवसात चढ-उताराच्या थंडीसह सकाळच्या वेळी हवेत गारवा जाणवण्याची शक्यता आहे. किमान तापमानात 2 डिग्रीची घसरण होणार असली तरी हे किमान तापमान सरासरीपेक्षा 2 डिग्रीने अधिकच असेल. कारण, पूर्वी ढगाळ वातावरणामुळे 3 ते 5 डिग्री सेंटिग्रेडने होणाऱ्या वाढी ऐवजी 2 डिग्रीच्या घसरणीमुळे एकूणच किमान तापमानात आता केवळ सरासरीपेक्षा अंदाजे 2 डिग्री सेंटिग्रेडनेच अधिक राहण्याची शक्यता जाणवते. किमान तापमानातील ही 2 किंवा अधिक डिग्रीची घसरण विशेषतः मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे सातारा व कोल्हापूर या 8 जिल्ह्यात अधिकच जाणवेल.
🎯 थंडीच्या लाटेची शक्यता
आता पर्यंतच्या थंडीच्या लाटेतून महाराष्ट्राला सहसा फेब्रुवारी महिन्यात सरासरी 5 ते 7 दिवसांच्या थंडीच्या लाटेचा कालावधी मिळत असतो. मग यावर्षीच्या ला-निनाच्या 2025 च्या फेब्रुवारी महिन्यात ही साधारण तेवढ्याच 5 ते 7 दिवसाच्या कालावधीच्या थंडीच्या लाटेची अपेक्षा करू या!
🎯 वातावरणातील बदल व रब्बी पिके
वातावरणातील सध्याचा हा बदल हवेत गारवा वाढून सध्याच्या रब्बी पिकांसाठी लाभदायी ठरणार आहे. शिवाय, ढगाळ व दमट वातावरणाची शक्यता दुरावल्यामुळे आता उशिरा पेरणी केलेल्या रब्बी पिकांवर बुरशी, मावा, किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाही. किरकोळ पावसासाेबतच 4 व 5 फेब्रुवारीला तुरळक ठिकाणी नुकसानदेही गारपिटीची शक्यताही मावळली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्याची वातावरणीय अवस्था ही रब्बी पिकांसाठी नक्कीच लाभदायीच समजावी.
🎯 तापमान व थंडीची स्थिती
यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. विशेषतः मुंबईसह संपूर्ण कोकण व पुणे, सातारा व इतर 9 जिल्ह्यात ही शक्यता अधिकच दाट आहे. त्यामुळे थंडी साधारण राहून एखाद, दुसऱ्या थंडीच्या लाटेतून महाराष्ट्रात थंडी मिळू शकते. खान्देश, छत्रपती संभाजीनगर, जालना व सोलापूर हे 6 जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात दिवसाचे कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक जाणवण्याची शक्यता अधिक आहे. वर नमूद केलेल्या 6 जिल्ह्यात मात्र हेच किमान तापमान सरासरी इतके जाणवेल. दरवर्षी फेब्रुवारीमध्ये जाणवणारे कळंघण किंवा सुटणारे थंड वाऱ्याचे वरळ यावर्षीच्या ला-निनाच्या 2025 च्या फेब्रुवारीमध्येही जाणवण्याची शक्यता आहे. ही स्थिती भले मानवी जीवनाला काहिसी बाधक ठरत असली तरी दाणा भरणीच्या रब्बी पिकांना फायदेशीर ठरते.
🎯 कमाल व किमान तापमानांची स्थिती
मुंबईसह संपूर्ण कोकणातील 7 जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान 18 ते 21 तर कमाल तापमान 28 ते 32 डिग्री सेंटिग्रेड दरम्यान आहे. दोन्हीही तापमाने काहिसे सरासरीच्या खाली घसरले असल्यामुळे मुंबईसह कोकणातील वातावरण आल्हाददायक जाणवत आहे. हे वातावरण पुढील 10 दिवस अपेक्षित आहे. उर्वरित महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यात (सोलापूर व कोल्हापूर 19 डिग्री वगळता) पहाटेचे किमान तापमान 15 ते 18 तर कमाल तापमान (महाबळेश्वर 29.5 डिग्री वगळता) 32 ते 35 डिग्री सेंटिग्रेड दरम्यान आहे. भागपरत्वे किमान तापमान (जळगाव 5.6, पुणे, छत्रपती संभाजीनगर व वर्धा हे 4 जिल्हे वगळता) सरासरीपेक्षा 2 ते 3 तर कमाल तापमान (अमरावती, ब्रह्मपुरी, बुलढाणा ) सरासरीपेक्षा 2 ते 4 डिग्रीने अधिक आहे. त्यामुळे या 29 जिल्ह्यात दुपारी उन्हाचा चांगलाच चटका जाणवतो आहे. अर्थात ही दैनिक तापमाने असल्यामुळे भागपरत्वे थोडी फार खाली वर होत असतात. पुढील 10 दिवस ही तापमाने अजून घसरण्याची शक्यता जाणवते.
🎯 पावसाची शक्यता
आतापर्यंतच्या डेट्यानुसार संपूर्ण महाराष्ट्राची फेब्रुवारी महिन्याची पावसाची मासिक सरासरी ही साधारण दोन ते सव्वादोन सेमी इतकी असते. अर्थात सरासरी क्षेत्र आधारित दोन ते सव्वादोन सेमी पाऊस या हंगामात किरकोळच समजावा आणि सरासरी पावसाचा दिवसही एखादाच असतो. यावर्षीच्या फेब्रुवारीमध्ये मुंबईसह संपूर्ण कोकण व विदर्भातील 18 जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी तर उर्वरित मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील 18 जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता जाणवते.
🎯 ला-निना, इंडियन ओशन डायपोल व एम.जे.ओ ची सध्य:स्थिती
🔆 ला-निना
सध्या विषववृत्तीय प्रशांत महासागरात सध्या ला-निना स्थित असून, अजून तीन महिने म्हणजे एप्रिल 2025 पर्यंत त्याचे अस्तित्व जाणवणार आहे. मे 2025 नंतर पुन्हा एन्सो तटस्थ अवस्थेत जाण्याची शक्यता आहे. पुढील 2025 च्या मान्सून संबंधी खुलासा हा येणाऱ्या 15 एप्रिलला होईलच.
🔆 इंडियन ओशन डायपोल
भारत महासागरीय द्विध्रुवीता (म्हणजे इंडियन ओशन डायपोल) सुद्धा सध्याच्या कालावधीत तटस्थ अवस्थेत असून, पुढील दोन महिन्यांपर्यंत म्हणजे मार्च 2025 अखेर पर्यंत ही तटस्थ अवस्था टिकून राहण्याची शक्यता आहे.
🔆 एम.जे.ओ.
भारत महासागर विषुववृत्तीय परिक्षेत्रात मागील आठवड्यापर्यंत जानेवारी 2025 अखेर एक एम्प्लिटुड (वर्तुळ त्रिज्येसमान वर खाली होणारी कक्षा) सह एम.जे.ओची उपस्थिती जाणवली. सध्या एम.जे.ओ भारत महासागर विषुववृत्तीय परिक्षेत्राच्या बाहेर आहे. त्यामुळे अवकाळी पावसासाठीची त्याची पूरकता सध्या नाही. जागतिक पातळीवरील वातावरणावर परिणाम करणाऱ्या सहसा ह्या तीन प्रणाल्यांच्या घडामोडी आणि सध्याची स्थिती अशाच पद्धतीची जाणवत आहे.
🎯 अवकाळी पाऊस, गारपीट व उष्णतेची स्थिती
पूर्व-मोसमी काळातील मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यात घडणाऱ्या अवकाळी पाऊस, गारपीट व उष्णतेची काहिली ह्या मुख्य वातावरणीय घडामोडींची तीव्रता वर स्पष्ट केलेल्या एन्सो, आयओडी व एम.जे.ओच्या स्थित्यंतरावरही अवलंबून असतात. शिवाय देशाच्या पूर्व-मोसमी हंगामाच्या दीर्घ-पल्ल्याच्या अंदाजासाठी जागतिक पातळीवर आतापर्यंत इतर हवामान घटकांच्या केलेल्या निरीक्षणांच्या नोंदीही विचारात घेतल्या जातात. मे महिन्यात ला-निना जाऊन एन्सो तटस्थेत जाणार आहे. बऱ्याच कालावधीपासून तटस्थ असलेल्या आयओडीमध्येही एप्रिलमध्ये बदलाची शक्यता आहे. त्याचबरोबर 92 दिवसांच्या पूर्व-मोसमी काळात मार्गस्थ होणारा एम.जे.ओ, कधी, किती दिवस व किती एम्प्लिटुडने भारत महासागर विषुववृत्तीय परिक्षेत्रात मार्गक्रमण करणार आहे, या सर्व गोष्टीवर अवलंबून आहे. थोडक्यात 1 मार्च दरम्यान घोषित होणाऱ्या पूर्व-मोसमी हंगामाच्या दीर्घ-पल्ल्याच्या अंदाजानंतरच यावर्षीच्या पाऊस, गारपीट व उष्णतेची स्थिती या गोष्टी अधिक स्पष्ट होतील.