Winter & temperature : सध्या हिवाळ्यात महाराष्ट्र तापतोय!
1 min read
Winter & temperature : कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यात, कमाल 32 ते 35 तर किमान तापमान (temperature) 13 ते 20 डिग्री सेंटिग्रेड दरम्यान जाणवत आहे. ही दोन्हीही तापमाने सरासरीच्या 3 ते 5 डिग्री सेंटिग्रेडने अधिक आहेत. त्यातही विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर (अहमदनगर), महाबळेश्वर, कोल्हापूर, सातारा, सोलापूर तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, विदर्भातील अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथील दुपारी 3 वाजताचे कमाल व पहाटे 5 वाजताचे किमान तापमान हे त्या ठिकाणच्या, त्यावेळच्या, सरासरी तापमानापेक्षा 3 ते 5 डिग्री सेंटिग्रेडने सध्या वाढलेले आहे. पुणे व अकोला (विदर्भ ) शहराचे कमाल तापमान तर जवळपास 36 तर सोलापूरचे 35 व नाशिकचे 34 डिग्री सेंटिग्रेडपर्यंत पोहोचले आहे. नाशिक, पुणे व अकोला शहरांच्या तापमानातील ही वाढ जवळपास सरासरीच्या 5 डिग्री सेंटिग्रेडने अधिक आहे. संपूर्ण विदर्भातही कमाल तापमात चांगलीच वाढ झालेली जाणवत आहे. जळगावसह खान्देशातील तीन जिल्ह्यात मात्र उष्णता विशेष अशी अत्याधिक जाणवत नाही.
🎯 मुंबईसह संपूर्ण कोकणातील तापमान
मुंबईसह संपूर्ण कोकणातील सात जिल्ह्यात कमाल 29 ते 32 तर किमान तापमान 17 ते 21 डिग्री सेंटिग्रेड दरम्यान जाणवत आहे. मुंबई (कुलाबा) वगळता उर्वरित मुंबईसह संपूर्ण कोकणात मात्र हे तापमान सरासरी इतकेच जाणवतात. मुंबई कुलाब्याचे पहाटेचे किमान तापमान मात्र 21 डिग्री सेंटिग्रेड असून सरासरीच्या दीड डिग्री सेंटिग्रेडने अधिक आहे. त्यामुळे तेथे उर्वरित महाराष्ट्राइतकी उष्णतेची दाहकता सध्या मुंबईसह कोकणात जाणवत नसली तरी देखील दरवर्षी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुद्धा मुंबईत बऱ्याच वेळा यापेक्षा अधिक आणि चांगलीच थंडी जाणवत असते.
🎯 कशामुळे वाढली ही उष्णता?
वाढलेल्या उष्णतेचा संबंध लगेच काही अभ्यासक ग्लोबल वार्मिंगशी (Global warming) जोडून मोकळे होतात. प्रत्यक्षात सध्याची तात्पुरती वातावरणीय स्थितीमुळे महाराष्ट्रात जाणवत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून ठराविक दिशा न घेणारे व वारंवार दिशा बदलणाऱ्या कमकुवत वाऱ्यांचे अस्थिर वहन सध्या महाराष्ट्रावर चालू आहे. हवेचा पूर्व-पश्चिम कमी दाबाचा आस जरी महाराष्ट्रावर काहीसा जाणवत असला तरी एकूणच महाराष्ट्रावर हवेच्या उच्च दाबातून प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांचा कल हा घड्याळ काटा दिशेने असल्यामुळे रात्रीची बाहेर पडणारी दीर्घ-लहरी उष्णता पूर्णपणे बाहेर फेकली जात नाही. त्यामुळे निरभ्र आकाश असूनही सध्या संचित अत्याधिक उष्णता कोकण वगळता महाराष्ट्रात जाणवत आहे.
🎯 अजून किती दिवस ही उष्णता जाणवेल?
पुढील पाच ते सहा दिवस म्हणजे 6 फेब्रुवारीपर्यंत किमान तापमानात होणाऱ्या या वाढीमुळे थंडी अजून कमी होण्याची शक्यता जाणवते. परंतु, एकापाठोपाठ मार्गस्थ होणाऱ्या पश्चिमी झंजावातामुळे तसेच उत्तर भारतात समुद्रसपाटीपासून 10 ते 12 किमी उंचीवर पश्चिम दिशेकडून ताशी 250 ते 260 किमी वेगाने प्रवाही झोताचे पश्चिमी वारे वाहत आहे. त्यामुळे या दोन प्रणल्यांच्या एकत्रित परिणामातून महाराष्ट्राकडे थंडी वाहण्याचा स्रोत अजून पूर्णपणे संपला, असे म्हणता येणार नाही. अजूनही फेब्रुवारीमध्ये थंडीची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून थंडी कायमची गायब झाली, असे समजू नये.
🎯 महाराष्ट्रातील पाऊस
महाराष्ट्रावरील सध्याचे प्रत्यावर्ती चक्रीय वारे जेव्हा बंगालच्या उपसागारात स्थलांतरीत होण्याच्या शक्यतेतून व त्यामुळे वेगाने पूर्वेकडून येणाऱ्या वेगवान वाऱ्यामुळे (ताशी 30 ते 35 किमी) बंगालच्या उपसागरातून आर्द्रता महाराष्ट्राकडे लोटली जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आता 1 ते 5 फेब्रुवारी 2025 दरम्यान ढगाळ वातावरणसह मात्र केवळ तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. अजूनही वातावरणात जर एकाकी काही बदल झाल्यास त्याबाबत नक्कीच अवगत केले जाईल.
🔆 शिर्डी – कोपरगाव परिसरात रात्री थंडीत चांगली वाढ जाणवली व तीन – चार दिवसांपासून जाणवत असलेली उष्णता देखील थोड्या प्रमाणात कमी जाणवली. – श्री नीलेश दहे यांचा प्रश्न
🔆 स्पष्टीकरण :- सध्या अजूनही हिवाळाच चालू आहे. वर सांगितल्याप्रमाणे किमान तापमान कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यात कमाल 32 ते 35 तर किमान तापमान 13 ते 20 डिग्री सेंटिग्रेड दरम्यान जाणवत आहे.ही दोन्हीही तापमाने सरासरीच्या 3 ते 5 डिग्री सेंटिग्रेडने अधिक आहेत. शिर्डी – कोपरगाव परिसर उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यात मोडतो व हिवाळ्यात तो वर्षानुवर्षे थंडीचा परिसर गणला जातो. त्यामुळे त्याच्या 100 – 125 वर्षाच्या किमान तापमानाची सरासरी ही सुद्धा खालावलेल्या अंकाची आहे. म्हणजे जसे वर म्हटले की, किमान तापमान 13 ते 20 डिग्री सेंटिग्रेड दरम्यान जाणवत आहे. म्हणजेच ते 20 नव्हे तर 13 डिग्री सेंटिग्रेड दरम्यानच्या शक्ययेमुळे आणि सरासरीच्या 5 डिग्री सेंटिग्रेडने नव्हे तर 3 डिग्री सेंटिग्रेडने अधिक आहेत. थोडक्यात थंडीच्या कमी सरासरी असलेल्या भूभागावर 13 डिग्री सेंटिग्रेडचे किमान तापमान आणि सध्याच्या कालावधीत ते जरी सरासरीच्या 3 डिग्रीने अधिक असले तरी हिवाळ्यात (Winter) सकाळच्या वेळी त्या भागात अधिक नसला तरी गारवा हा जाणवणारच ना! म्हणून जाणवणारी थंडी ही त्यातलाच भाग समजावा.