krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Monsoon Rain : चार दिवसासांठी मान्सूनचा जोर कमी होणार!

1 min read

Monsoon Rain : रविवार (दि. 28 जुलै) ते बुधवार (दि. 31 जुलै) या चार दिवसांत संपूर्ण मराठवाडा तसेच नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा 15 जिल्ह्यात जोरदार तीव्रतेच्या पावसाची शक्यता कमी होवून केवळ मध्यमच पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. गुरुवार (दि.1 ऑगस्ट)पासून पुन्हा जोरदार पावसाची (Rai) शक्यता या जिल्ह्यांत जाणवते.

मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांत केवळ मध्यम पावसाची शक्यता आठवडाभर म्हणजे शनिवार (दि. 3 ऑगस्ट)पर्यंत टिकून राहू शकते. छत्रपती संभाजीनगर, जालना व हिंगोली या तीन जिल्ह्यात तर सध्या पेरपिके जरी ठिक वाटत असली तरी जोरदार पावसाची प्रतीक्षा या जिल्ह्यात अजूनही कायम आहे. ऑगस्टमधील मान्सूनचे वर्तन या जिल्ह्यातील पावसाचे भवितव्य ठरवेल.

नंदुरबार, धुळे, जळगावसह संपूर्ण विदर्भातील एकूण 14 जिल्ह्यात साेमवार (दि. 29 जुलै)पासून आठवडाभर म्हणजे शनिवार (दि. 3 ऑगस्ट)पर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता अजूनही कायम आहे.

मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यात अतिजोरदार पावसाच्या शक्यतेला अजून वातावरणीय उतरतीचा धक्का लागलेला नाही. त्यामुळे या भागात अतिजाेरदार पावसाची शक्यता आणखी किती दिवस कायम आहे, हे येणारा काळच ठरवणार आहे.

मराठवाड्यातील जायकवाडी व इतर लघु-प्रकल्पातील धरणे वगळता या आठवड्यात जल आवकेच्या सातत्यातून महाराष्ट्रातील सर्व धरणात जलसंवर्धनातून जलसाठा वाढीची टक्केवारी शतकाकडे झेपावत आहे. काही ठिकाणी धरणे तुडुंब भरल्याने ओसंडून वाहत आहे. जुलैमध्ये आतापर्यंत तीन आठवडे ओढ दिलेल्या मान्सूनने जुलै अखेर महाराष्ट्रासाठी यावर्षी आपल्या वर्तनातून वेगळेच असे हे वैशिष्ट्य दाखवून दिले आहे.

धरणे जरी तुडुंब भरली असली तरी मराठवाड्यातील लघु प्रकल्प व जायकवाडीत समाधानकारक साठा करणाऱ्या तसेच महाराष्ट्रातील शेतजमिनीची पूर्णपणे भूक शमवणाऱ्या व विहिरींना पाणी-पाझर फोडणाऱ्या जोरदार पावसाची संपूर्ण महाराष्ट्राला अजूनही प्रतीक्षा कायम आहे. कदाचित शेतकऱ्यांना यासाठी ऑगस्ट अखेरपर्यंत वाट पहावी लागू शकते. यासाठी ऑगस्टमधील मान्सूनचे वर्तन महत्त्वाचे समजावे.

गेल्या आठवड्यात (17 ते 24 जुलै दरम्यान) घाटमाथ्यावर हजेरी लावून मान्सून घाट उतरत मराठवाड्यासह खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा 18 जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. मराठवाडा वगळता महाराष्ट्रात शनिवार (दि. 3 ऑगस्ट) पर्यंत 10 दिवसात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यात अतिजोरदार पावसाचीही शक्यता कायम टिकून आहे. शनिवार (दि. 27 जुलै)पासून मराठवाड्यातील सर्व 8 जिल्ह्यात पुढील 6 दिवस म्हणजे 1 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता जाणवते.

घाटमाथ्यावरील दमदार पावसाने सह्याद्रीच्या कुशीतील तसेच विदर्भातील धरणात जलसंवर्धन होत असून, जलसाठा वाढीचे सातत्य टिकून आहे. जुलै अखेर ही धरणे 70 टक्के तर काही 100 टक्क्यांच्या आसपास भरण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जायकवाडी व इतर लघु-प्रकल्पातील धरणांसाठी अजून काही काळ चांगल्या पावसाची प्रतीक्षा करावी लागेल.

🔆 यंदा मोसमी वाऱ्यांच्या हंगामात सोलापूर, बारामती, धारशिवसह लेट खरीप किंवा रब्बी पट्ट्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे. तुलनेने सह्याद्री पर्वताचा पूर्व उतार, पर्जन्यछायेच्या प्रदेशात पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. हे कशामुळे झाले असावे? याची शास्त्रीय कारणे काय असावीत?
धाराशिव, सोलापूरच्या जोडीला लातूर, परभणी, सांगली, कोल्हापूर, जळगाव अशीही जिल्हे आहेत की, काहीसा कमी तरी पण बऱ्यापैकी पाऊस आहे. नाशिक, धुळे, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यात पाऊस कमी आहे. हवामान शास्त्राच्या ज्ञान-आधारित कसोटीवर विचार केला तर सर्व अचंबितच करणाऱ्या गोष्टी वाटतात. विशेषतः सर्व प्रणल्यायुक्त वातावरण हे 100 टक्के पावसाचे आहे. पण पाऊस होत आहे फक्त 10 टक्के. सर्व प्रणाल्या असूनही पाऊस नाही आणि जो आहे तो अनपेक्षित (एप्रिल, मे, सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यासारखा) असा उष्णता संवहनी प्रक्रियेतील पाऊस पडत आहे. ही अवस्था मान्सूनच्या कमकुवतपणामुळे व विशेषतः हा प्रकार वर्षाच्छायेच्या जिल्ह्यातच अधिक घडत आहे. मान्सून घाट सोडून खाली येण्यास तयार नाही. हेच एकमेव कारण आहे.

🔆 सोलापूरसह वरील जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक का आहे?
त्या जिल्ह्यांच्या स्थानिक भौगोलिक रचनेतून व त्यांना पूरक असे 2024 च्या वर्षातील मान्सूनचे वर्तन तसेच ज्या कालावधीत पाऊस झाला त्यावेळेस इतर राज्यात पण ह्या जिल्ह्यांच्या लगतच्या तीन उपविभाग मंडळात म्हणजे उत्तर अंतर्गत कर्नाटक, तेलंगणा व पश्चिम मध्य प्रदेशमध्ये तेथे त्यावेळी अतिजोरदार पावसाच्या प्रणाल्या होत्या. त्या प्रणल्यांच्या प्रेरित परिणामातून त्या विशिष्ट जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत समाधानकारक नव्हे पण ठिक असा पाऊस झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!