Monsoon : मान्सून आला म्हणजे काय?
1 min readमान्सून पोहोचला म्हणजे मान्सूनच्या मूळ उगमापासून विषुववृत्तावर (दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरील पेरू, कोलंबिया, ईक्वेडोर या देशांपासून) समुद्रावरून अंदाजे 19,000 किलोमीटर अंतर कापून वाहत येणारे व ते तुमच्या गावापर्यंत बाष्प घेऊन येणाऱ्या वाऱ्यांचा प्रचंड प्रवाह वातावरणीय प्रणालीद्वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे विषुववृत्त समांतर वाहता झाला आणि त्या वाऱ्यांचा रस्ता मोकळा झाला असेच समजावे. म्हणून तर आपल्याकडे चार महिने बाष्पयुक्त वारे नैऋत्येकडून ईशान्यकडे वाहतात.
आता या बाष्पयुक्त वाऱ्यात पावसासाठी जबरदस्त ऊर्जा, ताकद असेल किंवा दमदारपणा असेल तरच पाऊस होतो, अन्यथा नाही. अर्थात ही बाष्प-ऊर्जा पावसाळी हंगामात कमी होते, भरली जाते. ऊर्जा कमी झाली तर फक्त मान्सुनी बाष्पयुक्त वारेच ही ऊर्जा पुन्हा भरू शकतात. म्हणून त्यासाठी मान्सून वारे तुमच्या गावांपर्यंत पोहोचणे गरजेचे असते. कधी कधी असे होते की, मान्सून आला किंवा येऊन पुढे गेला तरी पाऊस होत नाही. मग शेतकरी गोंधळतात. त्यांना वाटतं, हा काय प्रकार आहे? मान्सून आला म्हणतात अन् येथे तर चक्क उन्ह पडलत? त्याचे उत्तर या ऊर्जेत आहे.
यंदा तशी परिस्थिती आली तर काळजी करू नका. कारण यंदा ला-निना आहे. त्यामुळे बाष्प-ऊर्जास्रोताची उपलब्धता भरपूर असेल. त्यामुळे मान्सून प्रवाहादरम्यान ऊर्जा कमी झाली तर निसर्ग आपोआप भरण्याची व्यवस्था करतो. प्रश्नाला उत्तर देण्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या संकल्पना स्पष्टता व प्रबोधनासाठीच हे विवेचन समजावे, ही विनंती.
🔆 वाऱ्याचा शिअर झोन म्हणजे काय?
वाऱ्याच्या शिअर झोन (Shear zone) ला मराठीत काय म्हणतात? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. याचे उत्तर असे… जमिनीपासून मध्य तपांबर (ट्रोपोस्फेअर – Troposphere)पर्यंत 3 ते 6.5 किमी दरम्यानच्या उंच अशा 3.5 किमी क्षेत्र हवेच्या जाडीत कमी दाब क्षेत्राचा जर पूर्व पश्चिम आस तयार झाला व त्याच्या वरच्या पातळीत पूर्वकडून -पश्चिमेकडे व त्याच्या खालच्या पातळीत पश्चिमेकडून -पूर्वेकडे उंचावरील एकमेकांच्या विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यांच्या स्थितीला हॉरीझोन्टल शिअर झोन (Horizontal shear zone) म्हणतात. हा अक्षवृत्त समांतर असतो. अशाच प्रकारचा व्हर्टीकल शिअर झोन (Vertical shear zone) असतो.
🔆 कुठे पाऊस तर कुठे काेरडे का असते?
एखाद्या गाव अथवा शहरात काही विशिष्ट भागात पाऊस पडतो. कुठे ओले तर कुठे काेरडे असते. असे का होते? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. त्याचे उत्तर असे… एखाद्या गाव किंवा शहरात काही विशिष्ट भागात पडणारा पाऊस म्हणजे वातावरणातील संवहनी क्रियेद्वारे पडणारा पाऊस होय. येथे तेथील भौगोलिक रचना महत्त्वाची असते. येथे त्या भागावर पडणारी सूर्याची उष्णता हाच महत्त्वाचा फॅक्टर असतो.
सूर्याच्या उष्णता ऊर्जेने जमिनीचा पृष्ठभाग तापून जेव्हा जमिनीने शोषलेले पाण्याचे बाष्पभवनातून, उबदार अशा या दमट पाण्याच्या वाफेचे अवकाशात उर्ध्वगमन होवून उंचावरील थंडाव्यातून पाण्याच्या वाफेचे सांद्रीभवन होऊन फक्त त्या मर्यादित क्षेत्रातच पडणारा पाऊस म्हणजे वातावरणातील संवहनी क्रियेद्वारे पडणारा पाऊस होय. म्हणून तर हा पाऊस एखाद्या गाव किंवा शहरात काही विशिष्ट भागात पाऊस पडतो. कुठे ओले तर कुठे काेरडे असते. समुद्रावरून अतिउंचावर संक्रमणित झालेले बाष्प त्यात मिसळले जाते व त्याचाही आलेल्या बाष्पाशी संयोग होतो. म्हणून तर या पावसाला स्थानिक वातावरणीय ऊर्जेबरोबर समुद्रीय ऊर्जेचा अप्रत्यक्ष संबंध असतो.
साधारण पूर्वमोसमी हंगामातील मार्च ते मे तसेच परतीच्या पाऊस फिरू लागल्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर (उत्तरा, हस्त, चित्रा नक्षत्र ) महिन्यात मान्सून आगमन व खंडानंतरच्या काही दिवसातील पाऊस हा अशा पद्धतीचा पाऊस असतो. या प्रक्रियेतून झालेल्या पावसाचे उदाहरण द्यावयाचे झाले तर मागील वर्षी म्हणजे 6 महिन्यांपूर्वी 17 डिसेंबर 2023 रोजी सागरीय किनारपट्टीवरील वातावरणीय परिणामातून एकाकी उर्ध्वदिशेने झालेल्या उष्णसंवहनी प्रक्रियेतून तामिळनाडूतील ‘थुथूकुडी’ येथे 24 तासात झालेला 95 सेमी पाऊस हे त्याचे उदाहरण होय.