Monsoon rain : जूनचा शेवटचा आठवडा पावसाचा
1 min read✳️ विभागवार पावसाची तीव्रता अशी असेल?
🔆 मुंबईसह संपूर्ण कोकण
गेल्या काही दिवसांपासून म्हणजे मंगळवार (दि. 18 जून)पासून मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. जूनच्या या शेवटच्या आठवड्यात सुद्धा मुंबईसह संपूर्ण कोकणात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता अजूनही कायम आहे. मुंबई शहर, उपनगर व कोकणात या आठवड्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
🔆 विदर्भ
गेल्या काही दिवसांपासून म्हणजे गुरुवार (दि. 20 जून) पासून संपूर्ण विदर्भातील 11 जिल्ह्यात पावसाने मध्यम ते जोरदारपणे हजेरी लावली आहे. मान्सून बंगाल उपसागरीय शाखेच्या सक्रियतेमुळे आता जूनच्या या शेवटच्या संपूर्ण आठवड्यात सुद्धा संपूर्ण विदर्भात जोरदार पावसाची शक्यता कायम टिकून आहे.
🔆 मध्य महाराष्ट्र
मान्सून बंगाल उपसागरीय शाखा सक्रिय झाल्यामुळे मान्सून अरबी समुद्रीय शाखाही काहीशी उर्जितावस्थेत आली आहे. त्यामुळे मान्सून साधारण एक किमी उंचीचा सह्याद्री घाट चढून घाटमाथ्यावर वावरताना जाणवत आहे. त्यामुळे खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा 10 जिल्ह्यात जूनअखेर पर्यंतच्या संपूर्ण आठवड्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. हे सर्व जरी असले तरी नाशिक, अहमदनगर, पुणे व छत्रपती संभाजीनगर या चार जिल्ह्यांच्या काही भागात जून अखेरपर्यंतच्या आठवड्यात सरासरीपेक्षा महाराष्ट्रातील उर्वरित भागाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण काहीसे कमी असण्याची शक्यता निर्माण झाली आहे, याचीही शेतकऱ्यांच्या नोंद घ्यावी.
🔆 मराठवाडा
मराठवाड्यातील सर्व 8 जिल्ह्यात चार दिवस म्हणजे बुधवार (दि. 26 जून) पर्यंत केवळ मध्यम पावसाचीच शक्यता निर्माण झाली हाेती. गुरुवार ( दि. 27 जून) ते रविवार (दि. 30 जून) या चार दिवसात छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळता उर्वरित 7 जिल्ह्यात पावसाचा जोर वाढू शकतो. धाराशिव व लातूर या दोन जिल्ह्यात व लगतच्या परिसरात जोरदार पावसाची शक्यता नाकारता येत नाही.
🌀 पेरणी झालेल्या पिकांना जीवदान तर नापेर ठिकाणी पेरणी होण्याची शक्यता या आठवड्यातील पावसाने निर्माण झाली आहे.
🌀 भारत विषुववृत्तीय उपसागरीय क्षेत्रात एमजेओच्या सक्रियतेमुळे शनिवार (दि. 29 जून) ते शनिवार (दि. 6 जुलै) दरम्यानच्या आठवड्यात कदाचित महाराष्ट्रात अधिक चांगल्या पावसाची शक्यता जाणवते.
✳️ मान्सून सक्रियतेची शक्यता कशामुळे वाढली?
🌀 तीन आठवडे म्हणजे 31 मेपासून एकाच जागेवर खिळलेल्या बंगाल उपसागरीय मान्सुनी शाखेने आपली जागा सोडून काहीशी पुढे झेपावली आहे.
🌀 अरबी समुद्रात महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टी समोर समुद्र सपाटीच्या पातळीत तयार झालेला हवेच्या कमी दाबाचा दक्षिणोत्तर आस आणि त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर पश्चिमेकडून पूर्वेकडे मान्सुनी वारे अधिक बळकट होत आहे.
🌀 राजस्थान व छत्तीसगड वर असलेल्या चक्रीय वाऱ्यांच्या स्थिती व त्यांना जोडणारा हवेच्या कमी दाबाचा एक तर दुसरा राजस्थान ते ईशान्य अरबी समुद्र जोडणाऱ्या दोन आसामुळे मान्सूनी पावसाला स्थिती पूरक झाली आहे.
🔆 उत्तर महाराष्ट्रात डांगी पावसाचा जोर
मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात रविवार (दि. 30 जून)पर्यंत वर्तवलेली मध्यम पावसाची शक्यता कायम जरी असली तरी आता खान्देशातील नंदुरबार, धुळे व जळगाव या तीन जिल्ह्यात तसेच उत्तर नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा, कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा या तालुक्यात आठवडाभर म्हणजे गुरुवार (दि. 4 जुलै)पर्यंत गुजरात राज्याच्या पश्चिमेकडून येणारा अरबी समुद्र शाखीय म्हणजे डांग जिल्ह्याच्या घळीतून येणाऱ्या डांगी पावसाची जोरदार शक्यता मात्र वाढली आहे. नाशिक जिल्ह्याच्या उर्वरित नाशिक, सिन्नर, नांदगाव, निफाड व येवला या 5 तालुक्यात तसेच अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या 6 जिल्ह्यात रविवार (दि. 30 जून)पर्यंत वर्तवलेली मध्यम पावसाचीच शक्यता कायम आहे. मुंबईसह कोकण व विदर्भात रविवार (दि. 30 जून)पर्यंत वर्तवलेली जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. फक्त दरम्यानच्या पाच दिवसात मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांपैकी काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे.
🔆 पत्रकाराने विचारलेला प्रश्न
गाेपाल राेकडे, जळगाव या पत्रकाराने तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत आहे. पाऊस फारसा नाही. पण सकाळी 10 वाजेपासून सुरू होणारा उकाडा सायंकाळपर्यंत कायम असतो. एवढा उकाडा संपूर्ण उन्हाळ्यात सुद्धा जाणवला नाही. याची काही कारणे असू शकतात का? कारण त्रास प्रचंड होतो, असा प्रश्न उपस्थित केला.
जळगाव जिल्ह्याची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची ही 225 मीटरच्या आसपास आहे. म्हणजे पुणे व नाशिक शहरांच्या उंचीपेक्षा निम्म्यापेक्षाही खाली आहे. त्यामुळे या जिल्ह्यात इतर भागापेक्षा हवेचा दाब हा नेहमी जास्त असतो. जेथे हवेचा दाब जास्त असतो, तेथे इतर भागापेक्षा दुपारी 3 वाजेचे कमाल व पहाटे 5 वाजेचे किमान असे दोन्हीही तापमाने खूपच अधिक असतात.
जून महिन्याचा जळगाव शहर व जिल्ह्याचा विचार केला तर, दुपारचे सरासरी कमाल तापमान हे 42 डिग्री सेंटिग्रेड असते. आतापर्यंत जून महिन्यात सगळ्यात जास्त 47 डिग्री सेंटिग्रेड तापमान नोंदविले आहे. जून महिन्यात जळगाव शहरात सरासरी फक्त केवळ 13 सेमी पाऊस तर 13 दिवस पावसाळी असतात. आर्द्रता 49 टक्के तर दिवसाचे सूर्यप्रकाशाचे तास सर्वाधिक म्हणजे 13 तास आहेत. वातावरणात आल्हाददायकपणासाठी हे आकडे अपुरे तर सूर्य तळपण्याचे तास अधिक आहेत. शिवाय वाऱ्याचा वेग हा ताशी 8 किमीच्या आसपास असतो. तो वारा वेग संचित उष्णतेचे उच्च हवा दाब पार्सल फोडण्यास अपुरा ठरतो. म्हणजे उष्णतेच्या भांड्यात माणूस बसवल्यासारखी तेथील जनजीवनाची अवस्था होते.
शिवाय, सगळ्यात जास्त लांबीचा दिवस हा 21 ते 23 जून दरम्यान असतो. त्या दरम्यान सूर्य हा कर्कवृत्तावर असतो. म्हणजे जळगाव भागापासून केवळ तो 150 ते 175 किमी उत्तरेला असतो. म्हणून तर जून महिन्यात 13 तास तेथे सूर्य आग औकत असतो. मान्सून पोहोचण्याची सरासरी तारीख 15 जून असली तरी मान्सून उशिराच पोहचतो. त्यामुळे जून महिन्यात थंडावा मिळण्याचे दिवस फारच कमी मिळतात. या सर्व एकत्रित परिणामातून जळगाव जिल्ह्यात जूनमध्ये मानवी जनजीवनास असह्य उकाडा जाणवतो.