La Nina, Monsoon : ‘ला-निना’ घेऊन येत आहे चांगला ‘मान्सून’
1 min read🎯 एल-निनो कमकुवत होण्याची शक्यता
यावर्षी 2024 च्या पूर्वमोसमी काळात म्हणजे मार्च, एप्रिल व मे 2024 पर्यंत ‘एल-निनो’ (El Nino) कमकुवत होण्याची शक्यता असून, 2024 च्या मान्सूनच्या पहिल्या दोन महिन्यात म्हणजे जून व जुलै महिन्यात एन्सो (ENSO – El Nino-Southern Oscillation)तटस्थेत होण्याच्या शक्यता जाणवते. मान्सूनच्या उर्वरित दोन महिन्यात म्हणजे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात ‘ला-निना’चा (La Nina) उदगम होण्याची शक्यता जाणवते.
🎯 मान्सूनला पूरक अवस्था
पावसाळ्याच्या जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीतील उत्तरार्धात म्हणजे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात ‘ला-निना’ बरोबरच भारतीय महासागरात धन ‘भारतीय महासागरीय द्वि-ध्रुविता’ (Positive Indian Ocean Dipole) विकसित होण्याची शक्यताही आहे. शिवाय, 2024 च्या गेलेल्या जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात पृथ्वीच्या उत्तर-अर्ध गोलात तसेच युरेशिया भागातील बर्फाळ देशात सरासरीपेक्षा कमी झालेली हिमवृष्टीमुळे म्हणजेच या तिन्हीही अवस्था देशातील मान्सूनला अधिक पूरक असून, देशाला सरासरीपेक्षा अधिक पाऊस देण्याची शक्यता जाणवत आहे. कारण पॉझिटिव्ह आयओडी हा सुद्धा भारताचा ला-निनाच समजला जातो. तसेच कमी हिमवृष्टी म्हणजे भारतात अधिक पाऊस पडण्यासाठी अनुकूलता मानली जाते. एकंदरीत देशात 2024 या वर्षी ला-निना व आयओडी (Indian Ocean Dipole) तसेच युरेशियातील कमी हिमवृष्टीने पावसासाठी अनुकूलता दर्शवून सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याच्या शक्यतेमुळे देशातील शेतकऱ्यांच्या आशा अधिकच पल्लवीत केल्या आहेत .
🎯 महाराष्ट्रासाठी काय?
महाराष्ट्र हा मध्य भारत विभागात मोडतो. टरसाइल श्रेणी प्रकारानुसार संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 106 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचीच शक्यता असून ही शक्यता सर्वाधिक म्हणजे 55 टक्के जाणवत आहे. मात्र, या सरासरीपेक्षा अधिक पावसाच्या शक्यतेमुळे या अधिक पावसाचे वितरण कसे होते, यावरच पडणारा पाऊस लाभदायी की नुकसानदेही याचे उत्तर येणारा काळच देईल.
🎯 मान्सून आगमनासंबंधी
सरासरी तारीख 1 जूनला केरळात दाखल होणारा मान्सून त्याच्या सरासरी तारीख म्हणजे साधारण 10 जूनला मुंबईत सलामी देतो. अर्थात केरळात आगमन झाल्यानंतरच मुंबईतील त्याच्या आगमनाची तारखेचा अंदाज बांधता येतो. मान्सून आगमन कालावधीत खालील 6 वातावरणीय घटकांच्या निरीक्षणानुसार मान्सूनच्या आगमनाची स्थिती त्या त्या वेळेस सांगितली जाते. खरं तर मुंबईतल्या आगमनानंतरच उर्वरित महाराष्ट्रात त्याचा प्रवेश ठरविता येतो. हे जरी खरं असले तरी मान्सूनचे आगमन व चार महिन्यात पडणारा मान्सून या दोन स्वतंत्र गोष्टी असून, त्यांच्या भाकितांचे निकषही स्वतंत्र आहेत.
🔆 वायव्य भारतातील पहाटेचे किमान तापमान.
🔆 दक्षिण भारतातील चार राज्यातील पूर्वमोसमी पावसाचे वर्तन.
🔆 दक्षिण चीन समुद्रातून रात्रीच्यावेळी बाहेर पडणारी दिर्घलहरी उष्णता ऊर्जा.
🔆 मलेशिया, थायलंड पश्चिम किनारपट्टीवर एक ते दिड किमी. दरम्यानचे वाहणारे वारे.
🔆 वायव्य प्रशांत महासागरावरील हवेचा दाब.
🔆 बंगालच्या उपसागरातील, बांगलादेश, इंडोनेशिया दरम्यानचा, पण साधारण 10 किमी उंचीवरील वाहणारा वारा.
अशा 6 घटकांच्या सततच्या निरीक्षणावरून या मान्सून आगमनाचा अंदाज बांधला जातो. 31 मेच्या दुसऱ्या टप्प्यातील सुधारित अंदाजात मान्सून आगमनासंबंधी सविस्तर खुलासा केला जातो. तेव्हाच अंदाजे मुंबईमध्ये मान्सून कोणत्या तारखेला दाखल होईल, हे कळते.
साेमवार (दि. 15 एप्रिल) व मंगळवार (दि. 16 एप्रिल) हे दोन दिवस विदर्भ या मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. मुंबईसह रायगड, ठाणे, रत्नागिरी, पालघर या जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचीही शक्यता जाणवते. संपूर्ण कोकण व गोव्यात मात्र दिवसा चांगलीच दमटयुक्त उष्णतेची काहिली व रात्री उकाडा जाणवू शकतो.