Cotton price hike : कापसाला दरवाढीची उभारी; टप्प्याटप्प्याने विक्री करा!
1 min read🌎 किमान 35 टक्के कापूस शिल्लक
पावसाचा खंड व अनियमतता आणि गुलाबी बाेंडअळीचा (Pink bollworm) प्रादुर्भाव यामुळे सन 2023-24 च्या हंगामात देशात कापसाचे उत्पादन घटले आहे. महाराष्ट्रासह काही राज्यात वेचणीच्या वेळी पाऊस (Rain) आल्याने पहिला वेचा (Picking) भिजला. त्यामुळे कापसाची प्रत खराब झाली. दरवढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी कापूस विकणे टाळले हाेते. मात्र, दरवाढ हाेत नसल्याचे दिसून येत असल्याने व पावसामुळे कापूस भिजल्याने शेतकऱ्यांनी कापूस बाजारात काढला. त्यामुळे मध्यंतरी बाजारातील कापसाची आवक वाढली हाेती. सध्या एकूण उत्पादनाच्या किमान 30 ते 32 टक्के कापूस शेतकऱ्यांनी घरी व जिनिंगमध्ये अनामत म्हणून साठवून ठेवला आहे.
🌎 सध्याचे दर व आवक
सध्या राेज 8 ते 9 लाख क्विंटल कापूस विक्रीसाठी बाजारात येत आहे. देशांतर्गत बाजारात 12 जानेवारी 2024 पर्यंत 196.158 लाख गाठी कापूस बाजारात आला हाेता. यात थाेडी वाढ झाली असून, सध्या ही आवक (Arrival) 200 लाख गाठींच्या वर पाेहाेचली आहे. आगामी अडीच महिन्यात 92 ते 95 लाख गाठी कापूस बाजारात येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मागील तीन महिन्यांपासून जागतिक बाजारात रुईचे दर 89 ते 90 सेंट प्रति पाउंड तर देशांतर्गत बाजारात 55,000 ते 57,000 रुपये प्रति खंडी (Candy) हाेते. मागील पंधरवड्यापासून जागतिक बाजारात रुईचे दर 92 ते 94 सेंट प्रति पाउंडवर तर देशांतर्गत बाजारात 63,000 रुपये प्रति खंडीवर पाेहाेचले आहेत. याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील कापसाच्या दरवाढीवर झाला आहे. सध्या पावसात भिजलेल्या कापसाला 6,800 ते 7,100 रुपये तर चांगल्या प्रतिच्या कापसाला 7,200 ते 7,600 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. या दरात वाढ हाेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
🌎 कापसाच्या मागणीत वाढ
सध्या कापूस विक्री हंगाम अंतिम टप्प्यात आहे. देशांतर्गत वस्त्रोद्याेगाला लागणाऱ्या कापसाच्या मागणीत (Demand) वाढ (Increase) हाेत आहे. मार्च 2024 पासून पुढे ही मागणी आणखी वाढणार आहे. भारतीय वस्त्रोद्याेगाने कापूस आयात (Import) करण्याचा जरी निर्णय घेतला तरी त्यांना आयातीत कापूस देशांतर्गत बाजाराच्या तुलनेत महागात खरेदी करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांना सध्यातरी देशांतर्गत बाजारातून रुई (Lint) व सुताची (Yarn) खरेदी करण्यावाचून गत्यंतर नाही. आगामी काळ निवडणुकीचा असल्याने ‘टेक्सटाइल लाॅबी’ने कापसाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी चालविल्या प्रयत्नांना फारसे यश येण्याची शक्यता नाही.
🌎 निर्यात स्वस्त, आयात महाग
जागतिक बाजार व इतर देशांच्या तुलनेत भारतात कापसाचे दर कमी आहे. त्यामुळे भारतीय वस्त्रोद्याेगाने रुई किंवा सूत आयात करण्याचा विचार केल्यास त्यांना आयातीत कापूस महागात म्हणजेच 11 टक्के आयात शुल्क (Import duty) व वाहतूक खर्च (Transportation costs) विचारात घेता किमान 75,000 रुपये प्रति खंडी दराने खरेदी करावा लागणार आहे. आयातीत कापूस भारतात येण्यासाठी त्यांना किमान महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. भारतातील कापसाचे दर कमी असल्याने कापूस निर्यात करण्याची संधी चालून आली आहे.
🌎 कापसाची आवक स्थिर ठेवा
व्यापाऱ्यांकडील पैशाचे ‘राेटेशन’ विचारात घेता ही दरवाढ टिकून ठेवणे आवश्यक आहे. बाजारातील कापसाची आवक वाढल्यास व्यापाऱ्यांकडील पैशाचे ‘राेटेशन’ बिघडेल आणि दर पुन्हा दबावात येतील. त्यामुळे ही दरवाढ टिकून ठेवण्यासाठी बाजारातील कापसाची आवक वाढू न देता कमी करणे अथवा स्थिर ठेवणे आवश्यक आहे.
🌎 कापूस टप्प्याटप्प्याने का विकावा?
जगात कापसाचे उत्पादन कमी असल्याने तसेच मागणी हळूहळू वाढत असल्याने भारताला कापूस निर्यातीची माेठी संधी उपलब्ध झाली आहे. भारताने ही संधी ‘कॅश’ केल्यास देशांतर्गत बाजारातील कापसाचे दर 8,000 हजार रुपये प्रति क्विंटलची पातळी ओलांडू शकते. त्याचा आर्थिक फायदा शेतकऱ्यांना हाेऊ शकताे. शेतकऱ्यांनी या वाढीव दराचा फायदा घेण्यासाठी आधी बाजारातील दराचा आढावा घ्यावा. कापूस एकमुस्त न विकता टप्प्याटप्प्याने विकावा. कापूस विकण्यासाठी शेतकऱ्यांनी फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा, मार्च व एप्रिल असे तीन टप्प्यात गरजेनुसार नियाेजन करावे, अशी माहिती महाराष्ट्र कापूस पणन महासंघाचे माजी सरव्यवस्थापक तथा बाजारतज्ज्ञ श्री गाेविंद वैराळे यांनी दिली.