krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Crop and temperature : काळ पिके काढणीचा, दुपारच्या कमाल तापमान वाढीचा

1 min read
Crop and temperature : साधारण 100 ते 120 दिवसांच्या कालावधीत पूर्ण होणारी रब्बी पिके (Crop) ही ऑक्टोबर ते मार्च दरम्यानच्या पाच महिन्यात त्यांचा हंगाम राबवला जातो व त्यांचा काढणीचा कालावधी हा एप्रिल व मे महिन्यात पिकानुसार येत असतो. असे असले तरी त्या वर्षातील थंडी, अवकाळी पाऊस, दुपारच्या कमाल तापमान (Maximum temperature) याच्या बदलानुसार रब्बी हंगामाचा 100 ते 120 दिवसांच्या कालावधी 10 दिवसांपासून 25 दिवसापर्यंत मागे-पुढे सरकतो. म्हणजेच या रब्बी हंगामाचे वय कमी-जास्त होणे किंवा पेरणी व काढणी लवकर किंवा उशिरा होणे, हे सर्व त्या वर्षातील एल-निनो (El Nino), ला-निना (La Nina) व एन्सो (ENSO - El Nino-Southern Oscillation) तटस्थेनुसार मागे-पुढे सरकतात. हवामान बदलानुसार प्रत्येक वर्षातील रब्बी हंगामाच्या कालावधीचे दोलनही मागे-पुढे हेलकावते.

फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत रब्बी पिके हुरडा अवस्थेत असतात. त्यानंतर धान्य दाण्यातील चिकाचे प्रमाण कमी होवून दाणा टणकतेकडे रूपांतरीत होत जातो व पीक पक्व अवस्थेत काढणीसाठी परतवू लागते. या काळात पिकात शाखीय बदल जाणवू लागतात. पिकांचे प्रकाश संश्लेषण कार्य व अन्नद्रव्ये पुरवठा कार्य मंदावते. अन्नद्रव्यसाठीची क्लोरोफीलची गरजही तशी संपत आलेली असते. म्हणून तर पानातील हिरवेपणा नाहीसा होत जाताे व पिकांची हिरवी पाने पिवळी होवून गळू लागतात. निसर्गही पिक उभे असलेल्या जमीन-मातीचे तापमान वाढवून जमिनीतील ओलावा कमी करत असतो. म्हणजेच नकळत पिकांच्या काढणीच्या तयारीस शेतकऱ्यांना तो मदत करत असतो. पेरणी अशाच कालावधीत करतात की, जेव्हा पीक काढणीचा काळ हा वेगवान कमाल तापमान वाढीच्या कालावधीशी साधारणपणे मॅच होईल. म्हणून तज्ज्ञ शेतकऱ्यांना तो पेरणीचा कालावधी माहीत असतो. परंतु हवामानाने हे गणित जर बिघडवले की, पुढे पीक घेण्यासंबंधीच्या, काढणी व विक्रीसंबंधीच्या सर्वच विसंगती तयार होतात व शेतकऱ्यांचे नुकसान होते.

सध्या कमाल व किमान तापमानात सरासरी साधारण दीड ते दोन डिग्री सेंटीग्रेडने वाढ ठेवून दक्षिण अर्ध महाराष्ट्रावरील 18 डिग्री सेंटीग्रेड दरम्यानच्या अक्षवृत्तवरील दोन्हीही कमाल व किमान तापमाने ही सध्या उर्वरित उत्तर महाराष्ट्राच्या म्हणजे 20 ते 22 डिग्री अक्षवृत्तकडे सरकत आहे. त्यामुळे उभ्या असलेल्या शेतपिकांवरील परिणाम जाणवू लागला आहे. सन 2024 च्या पूर्वार्धात, शेवटच्या टप्प्यात तीव्र होवून रेंगळणाऱ्या एल-निनोमुळे महाराष्ट्रातून थंडी लवकर गेली. त्याचा यावर्षीच्या रब्बी शेतपिकांवर परिणाम जाणवणार आहे. हुरड्यावर आलेली सध्याची धान्यपिके एकाकी ओढून येऊन, वेगाने परतवू लागतील आणि अपेक्षेपेक्षा लवकरच काढणीस येतील. मात्र, एल-निनोच्या वर्षात आगाप ज्वारी, हरभरा व गहू पिकांसाठी यावर्षीचे सध्याचे वातावरण साजेसे असून या आगाप पिकांवर थंडी लवकर नाहीशी होण्याचा विशेष असा कोणताही नकारात्मक परिणाम जाणवणार नाही. अशा पिकांची वाढ पूर्ण होवून वेळेत काढणी होवून योग्य झड मिळण्याची शक्यता आहे. शिवाय, अशा पिकांच्या उत्पादनाला मागील वर्षातील अल्प पुरवठा काळातील चालत आलेला, चांगला वाढीव बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे. परंतु, मागास कांदा लागवड व मागास गहू पेरणी पिकांना वातावरण मारक ठरू शकते. उशिरातील उन्हाळ कांदा लागवड व मागास पेरीतील गहू सारख्या पिकांची भर, झड (Yield) कमी होवून बंपर क्रॉपसारखा हंगामी उतार येणार नाही. मागास पेर-लागवडीतील पिकांची सर्वच अंगानी याबाबत काहीशी हेळसांड झालेली दिसेल.

🪀 मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात जाणवणारा विशेष परिणाम
उत्तर-मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक व मराठवाड्यातील उत्तर छत्रपती संभाजीनगर अशा पाच जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक जाणवण्याची शक्यता आहे. म्हणजेच या पाच जिल्ह्यात दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात जो काही सरासरी इतका पहाटेचा गारवा जाणवत असे, त्याऐवजी अधिक ऊबदारपणा जाणवेल. म्हणजे थंडी तर लवकर गेलीच पण त्याऐवजी त्या ठिकाणी व काळात अधिकची उष्णता जाणवण्यास लवकरच सुरुवात होईल. मात्र, उर्वरित दक्षिण-मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या सहा जिल्ह्यात फेब्रुवारीतील पहाटेचे किमान तापमान सरासरी इतकेच जाणवेल.

येणाऱ्या पीक काढणीच्या काळात शेतकऱ्यांना अशीही सूचना करावीशी वाटते की, फेब्रुवारी-मार्च महिने हे गारपीट व अवकळी पावसाचे असतात. शिवाय, या दोन महिन्यातील मासिक अंदाजही वर्तवले आहेत. महाराष्ट्रातील पावसासंबंधीच्या अवस्था त्या-त्या वेळी अवगत केल्या जातीलच. परंतु, या महिन्यातील पिकांची काढणीचा निर्णय करताना शेतकऱ्यांनी हवामानाच्या सूचनांकडेही अवश्य लक्ष द्यावे, असे वाटते.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!