Rain, Snowfall : उत्तर भारतात पुन्हा पाऊस, बर्फवृष्टीचे आवर्तन
1 min read
सध्या महाराष्ट्रात पडत असलेली थंडी अजून अशीच 1 फेब्रुवारीपर्यंत जाणवणार आहे. विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान 14 डिग्री सेंटिग्रेड (म्हणजे सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने तर पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली व छत्रपती संभाजीनगर येथे सरासरीपेक्षा दोन डिग्रीने अधिक) तर दुपारचे कमाल तापमान 30 डिग्री सेंटिग्रेड (म्हणजे सरासरी इतके) असू शकते. विदर्भात मात्र पहाटेचे किमान तापमान 12 डिग्री सेंटिग्रेड (म्हणजे सरासरी इतके) तर दुपारचे कमाल तापमान 28 ते 30 डिग्री सेंटिग्रेड (म्हणजे सरासरी इतके) असू शकते.
उत्तर भारतातील थंडीचा परिणाम महाराष्ट्रावरही जाणवू शकतो. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिक जिल्हा वगळता उर्वरित महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान सरासरी इतके म्हणजे 14 डिग्री सेंटिग्रेडच्या आसपास राहू शकते. त्यामुळे नेहमीसारखी थंडी पहिल्या आठवड्यात जाणवेल. नाशिक जिल्ह्यात मात्र पहाटेचे किमान तापमान सरासरी तापमानापेक्षा एक ते दिड डिग्रीने अधिक राहून म्हणजे 14 डिग्री सेंटिग्रेडच्या आसपास राहू शकते. त्यामुळे नेहमीपेक्षा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काहीशी कमी थंडी नाशिक जिल्ह्यात अनुभवायला मिळेल.
🔆 थंडी नेमक्या कोणत्या मार्गाने अवतरते?
उत्तर भारतातून महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर जेथे समुद्र सपाटीपासून कमी उंचीत तयार झालेल्या नैसर्गिक घळ्यातून म्हणजे मुख्यत: खानदेशातील नंदुरबार, शिरपूर, रावेर या भागातून तर विदर्भातील गोंदिया, तुमसर, मोहाडी, मार्गे उत्तरे दिशेकडून तसेच गडचिरोलीतील भामरागड, सिरोंचा आणि चंद्रपूर मार्गे ईशान्यकडून महाराष्ट्रात थंडीचा नेहमी प्रवेश होत असतो. अर्थात त्यावेळी महाराष्ट्रातील उच्च दाब क्षीणता कशी आहे, यावरही थंडी तीव्रता वहनाचे प्रमाण ठरले जाते.
🔆 थंडीचा प्रभाव नेमका कशामुळे?
संपूर्ण गुजरात राज्य, महाराष्ट्रातील कोकण तसेच खानदेश व नाशिक जिल्ह्यातील कळवण, सुरगाणा, मालेगाव, देवळा तालुक्यातील क्षेत्रात साधारण ताशी 8 ते 10 किमी तर उर्वरित महाराष्ट्रात शांत पण ताशी 1 ते 2 किमी वेगाने खानदेशातील नंदुरबार, शिरपूर, रावेर या भागातून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मध्यम का होईना, पण थंडी जाणवत आहे. म्हणून तर सध्या संपूर्ण गुजरात राज्य व मुंबईसह संपूर्ण कोकणातील सात जिल्हे थंडावले आहेत.
🔆 खानदेशातील सध्याच्या धुके
मध्य प्रदेश लगत खानदेशातील शिरपूर, शहादा, चोपडा, यावल, रावेर या तालुक्याच्या तुरळक भागात सध्या अधून – मधून सकाळच्या वेळी जाणवणारे काहीसे धुके व असेच धुके पुढे काही दिवस टिकून राहण्याची शक्यता जाणवते. हे पडणारे धुके, जमिनीलगत दीड किमीपर्यंतचा शांत वारा तसेच तेथील समुद्र सपाटीपासूनची कमी उंचीची भौगोलिक रचना व सध्याच्या वातावरणीय घडामोडी आणि पहाटेच्या किमान तापमाना बरोबर दिवसाच्या कमाल तापमानाचाही सरासरीपेक्षा घसरलेला पारा यामुळेच खानदेशात धुके पडत आहे.