El-Nino, Cold Weather : एल-निनो वर्षात थंडीची साथ, रब्बी हंगामावर मात
1 min read🎯 एल-निनोमुळे घडून आलेल्या वातावरणीय घटना
एल-निनोमुळे (El-Nino) त्याच्या गुणधर्म व दाखवलेल्या अपेक्षित परिणामानुसार, एकूणच 2023-24 यावर्षी खालील वातावरणीय घटना दिसून आल्यात.
🎯 संपूर्ण देशात काय झाले?
🔆 उष्णता टिकून राहिली.
🔆 अपुरा व टंचाईयुक्त पाऊस झाला.
🎯 उत्तर भारतात नेमके काय झाले?
🔆 पश्चिमी झंजावाताची तीव्रताही सामान्यच राहिली.
🔆 थंडीच्या लाटाही कमीच राहिल्या.
🔆 बर्फवृष्टी कमी झाली.
🔆 पश्चिमी झंजावाताची वारंवारता जरी टिकून राहिली, पण तीव्रता कमीच राहिली.
🔆 पश्चिमी झंजावातांनी प्रमाणातच आर्द्रता वाहून आणली.
🔆 आर्टिक व सैबेरिअन थंड कोरडे वारे अधिक दक्षिणेकडील समशितोष्ण कटिबंधावरील अक्षवृत्तावर सरकले नाहीत.
🔆 धुक्याचे प्रमाण अधिक राहिले.
🎯 महाराष्ट्रात काय परिणाम जाणवले?
🔆 हवेत कधीच अतिरिक्त दमटपणा चढला नाही.
🔆 अतिटोकाची थंडी आपण अनुभवली नाही.
🔆 ढगाळ वातावरण नसल्यामुळे पडणाऱ्या थंडीला अटकाव झाला नाही.
🔆 सकाळच्या वेळी दवीकरण अल्पच घडून आले.
🔆 पहाटेच्या किमान तापमानात चढ-उतार जाणवले.
🔆 दुपारचे कमाल तापमानही हे सरासरी कमाल तापमानापेक्षा नेहमीच कमी राहिले.
🔆 पहाटेचे किमान तापमान माफक पण कमाल तापमानही कमीच राहिल्यामुळे दिवसाही थंडी जाणवतच राहिली.
एल निनोमुळे त्याच्या गुणधर्मनुसार संपूर्ण हंगामात यावर्षी उष्णता टिकून राहिली. या उष्णतेमुळेच यावर्षी जरी आर्द्रता वाढवली गेली असली तरी अपुऱ्या व टंचाईयुक्त पावसामुळे जमिनीची पाण्याची भूक भागली नाही. जमीन तहानलेलीच राहिली. त्यामुळे जमिनीतला अपुरा ओलावा व त्याचबरोबर एल-निनोमुळे मर्यादित राहिलेले पहाटेचे किमान तापमान यातून हवेत कधीच अतिरिक्त दमटपणा यावर्षी संपूर्ण हंगामात चढलाच नाही. म्हणून अपाय करणारे दवीकरणही अल्पच घडून आले. शेतपिके दवीकरणापासून होणाऱ्या अपायापासून अबाधितच राहिले. ही एकप्रकारे पिकांना व फळबागांना मदतच झाली.
🎯 उत्तर भारतात ऑक्टोबर 2023 पासूनचे पश्चिमी झंजावाताचे वर्तन व महाराष्ट्रावर थंडीचा परिणाम
एल-निनो वर्षात पश्चिमी झंजावाताची वारंवारता जरी टिकून राहिली, पण त्यांची तीव्रताही अपेक्षेप्रमाणे सामान्यच होती. उत्तर भारतात थंडीच्या लाटाही कमीच जाणवणार होत्या, तशा त्या जाणवल्या. अति टोकाची थंडी आपण अनुभवली नाही. बर्फवृष्टी कमी झाली. एल-निनोमुळे मध्यम तीव्रतेत मार्गक्रमण करणारे पश्चिमी झंजावातांनी प्रमाणातच आर्द्रता वाहून आणली. एल-निनोमुळेच आर्टिक व सैबेरिअन थंड कोरडे वारे दक्षिणेकडील समशितोष्ण कटिबंधावरील अक्षवृत्तवर येऊन पश्चिमी झंजावातांनी आणलेल्या आर्द्रतेत मिसळण्याची प्रक्रिया घडून आली नाही. परिणामी, गिलगिट बाल्टीस्थान जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसहित संपूर्ण उत्तर भारतात अपुऱ्या थंडीमुळे धुक्याचे प्रमाण अधिक राहिले तर खुपच कमी प्रमाणात पाऊस व बर्फवृष्टी झाली. जी झाली ती माफकच झाली. म्हणून तर हिवाळ्यात महाराष्ट्रात अतिटोकाची थंडी जाणवली नाही. परिणामी, महाराष्ट्राने बेताची पण सातत्यपूर्ण थंडी अनुभवली.
🎯 खरीपानंतर 2023 च्या ऑक्टोबर महिन्यात रब्बी हंगाम सुरू होण्यापूर्वीची अवस्था
पाऊस टंचाईच्या पार्श्वभूमीवर ओढग्रस्त सिंचन कमतरतेत गेलेल्या 2023 चा खरीप हंगामानंतर लगेचच येणाऱ्या रब्बी हंगामाबाबत शेतकरी अधिक चिंतित व भयभित झालेले होते. काय अवस्था असू शकते रब्बी हंगामाची, अशी विचारणा होवू लागली. कारण एल-निनो अधिकच तीव्र होणार होता, अशा बातम्या येऊ लागल्या होत्या. पण एल-निनोमुळेच शेतपिकांना थंडी मिळणार आणि रब्बी हंगाम जिंकता येईल, असा भाकीत वजा त्यावेळी दिलेला दिलासा देण्यात आला. तो कसा जिंकता येईल, त्याची कारणे व स्पष्टीकरणेही त्यावेळी दिली गेली.
🎯 प्रत्यक्षात घडून आले
नोव्हेंबर 2023 ला सुरू होणाऱ्या व मार्च 2024 ला सांगता होणाऱ्या यंदाच्या रब्बी हंगामापूर्वीच वातावरणावर आधारित केलेल्या वातावरणीय घडामोडीच्या तार्किक भाकीतानुसार ‘एल-निनो’ वर्षातील यंदाचा रब्बी हंगाम जिंकून देणारी मध्यम का होईना, पण पूरक थंडीमुळे शक्य होईल, ही वाणी एकदम खरी ठरली. म्हणजे खरं तर एल-निनोनेच थंडीद्वारे रब्बी हंगामाची घडी बसवली, असेच आपण आज म्हणू या! कारण एल- निनोमुळेच मिळालेल्या थंडीमुळे रब्बी हंगाम जिंकता आला, असे म्हणता येईल. एल निनो म्हणून थंडी मिळणार! हेच रब्बी हंगाम जिंकण्याचे त्या वेळच्या विश्लेषणाचे तार्किक उत्तर व सूत्र होते आणि तेच घडून आले, हेच आज आपण पाहत आहोत.
🎯 एल-निनोच्या 2023-24 वर्षात एकूणच थंडीचे वर्तन
एल-निनो वर्षातील हिवाळ्यात पहाटेचे किमान तापमानात चढ-उतार जाणवलेत. पण दिवसातील दुपारचे कमाल तापमानही हे सरासरी कमाल तापमानापेक्षा नेहमीच कमी राहिले. खरेतर ही एक वेगळीच वातावरणीय घटना यावर्षीच्या एल-निनो वर्षात पाहवयास मिळाली. त्यामुळे संपूर्ण हिवाळ्यात दिवसाही थंडी जाणवतच राहिली आणि अजूनही ती जाणवत आहे.
🎯 फक्त चालू फेब्रुवारी 2024 च्या महिन्यात जाणवणारी थंडी व दिवसाचा ऊबदारपणाबाबतचा अंदाज
वर्षीच्या 2024 फेब्रुवारी महिन्यासाठीच्या मासिक अंदाजानुसार संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यतेमुळे या चालू फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचे प्रमाणही दरवर्षीच्या सरासरी थंडीपेक्षा कमीच जाणवेल, असे वाटते.
दिवसाच्या ऊबदारपणाबाबत बोलावायचे झाल्यास कोकण व उत्तर महाराष्ट्रातील 12 जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यात दुपारचे कमाल तापमान या महिन्यातील सरासरी तापमानाइतके म्हणजे दिवसाचा ऊबदारपणा तेथे नेहमीसारखाच जाणवेल. परंतु वर स्पष्टीत कोकणातील सात व उत्तर महाराष्ट्रातील खानदेश, नाशिक, छत्रपती संभाजीनगर अशा एकूण 12 जिल्ह्यात मात्र या महिन्यात ऊबदारपणा सरासरीपेक्षा अधिकच जाणवेल.
सहसा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीच्या दोन ते तीन आठवड्यात थंडी जाणवते तर शेवटच्या आठवड्याच्या आसपास मात्र थंडी कमी होत जाते. परंतु यावर्षीच्या 2024 च्या फेब्रुवारी महिन्याच्या चालू पहिल्या आठवड्यात मात्र या आठवड्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रात काहीशी थंडी जाणवेल तर आठवड्याच्या शेवटी थंडी कमी जाणवेल, असे वाटते. थंडीच्या लाटेची शक्यता मात्र ही संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात जाणवणार नाही.
🎯 फेब्रुवारी 2024 च्या महिन्याबाबतचा पावसाचा खुलासा
फेब्रुवारी महिन्यात पावसाची मासिक सरासरी ही अगदी नगण्यच असते. तरी देखील यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या मासिक अंदाजानुसार या महिन्यात पावसासंबंधी भाष्य करताना असे बोलता येईल की, महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सोलापूर, सोलापूर असे सात जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता दर्शवते. परभणी, नांदेड, हिंगोली वाशिम, यवतमाळ या पाच जिल्ह्यात तर ही शक्यता अधिक जाणवते. कोकणातील वर स्पष्टीत सात जिल्ह्यात मात्र ही शक्यता सरासरीपेक्षा खूपच कमी म्हणजे फेब्रुवारी महिन्यात पावसाची शक्यता नाहीच, असे समजावे.
🎯 महाराष्ट्रातील चालू 2023-24 रब्बी पिकांवर वातावरणाचा घडून आलेल्या परिणामांचे निरीक्षण
🔆 यावर्षी चालू रब्बी हंगामात एल-निनोमुळे थंडी विशेष जाणवली नाही, दवीकरण नाही, ढगाळ वातावरण नाही, दमटपणा नाही, या सर्वांच्या अभावामुळे व यांच्या एकत्रित परिणामामुळे चालू वर्षातील रब्बी पिकांवर निर्माण झालेल्या पाणीटंचाईतही रब्बी पिके जगवण्यासाठी एल-निनो वर्षात वातावरणाने शेतकऱ्यांना खालील पद्धतीने मदतच केली, असे वाटते.
🔆 चालू वर्षाच्या रब्बी पिकांवर मावा, बुरशी, किडीचा प्रादुर्भाव विशेष असा झाला नाही.
🔆 अतिपावसाच्या अभावामुळे पिकातील तणांना फोफावण्यास अटकाव झाला. तणे फोफावू शकली नाहीत.
🔆 तणनाशके, बुरशीनाशके यांच्या अति फवारण्या टळल्या गेल्या आणि फवारले गेलेले द्रवरूपातले पोषके पिकांना लागू पडलेत.
🔆 टाकलेल्या खतात तणांनी भागीदारी न केल्यामुळे खते पिकांना पूर्णपणे लागू पडलीत. त्यामुळे पिके तजेलदार राहिलीत.
🔆 पिकांना लागणारी सिंचनाच्या आवर्तनाची वारंवारता मर्यादितच राहून पाण्यासाठीची टोकाची ओढ निर्माण झाली नाही.
🔆 पिके दवीकरणाच्या अपायापासून अबाधितच राहिली.
परिणामी, भले कमी असू दे, पण ढगाळ वातावरण नसल्यामुळे पडणाऱ्या थंडीला अटकाव झाला नाही. दरवर्षी जशी घालवली जाते, तशी पूर्णपणे थंडी एल-निनोमुळे यावर्षी घालवली गेली नाही. त्यामुळे माफक असू दे पण सतत थंडी पिकांना मिळत गेली. निरभ्र आकाशामुळे प्रकाशसंश्लेषण कालावधीही वाढला गेला. त्यामुळे पिके पोसण्यात अडचण जाणवली नाही. सर्व वातावरणीय घडामोडी पिकांना हितकारक ठरू लागल्यात. अतिरिक्त पाऊस न झाल्यामुळे जे काही पाणी पिकांना उपलब्ध झाले, तेवढे मिळालेले पाणी पुरेसे ठरले. हवे तेवढेच गरजेइतकेच मिळालेल्या माफक पाण्याच्या सिंचनातून यावर्षीच्या पिकांचा रब्बी हंगाम सहज जिंकता येत आहे. अशा पद्धतीने रब्बी पिकांना केवळ एल-निनो व त्याने नियंत्रित केलेल्या थंडीमुळे न दिसणारा व लक्षात न येणारा फायदा झाला, असेच समजावे. म्हणून तर रब्बी हंगामापूर्वी एल-निनोच्या वर्षातही जर तर च्या अटीवर थंडीमुळे रब्बी हंगाम जिंकता येईल, असे केलेले तार्किक भाकीत सत्यात उतरले, असेच म्हणावे लागेल. हवामान शास्त्रीय विश्लेषनाच्या नजरेतून पाहिल्यास तार्किक भाकीत व प्रत्यक्षात घटना सत्यात उतरणे याचा ताळा नक्कीच जमला, असे आज म्हणता येईल.