Cold weather : या आठवड्यात थंडीचे स्वरुप कसे असेल?
1 min read
जळगाव जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान 10 डिग्री सेंटिग्रेडच्या आसपास किंवा त्याखाली एकांकापर्यंतही घसरू शकते. मुंबईसह कोकण व उर्वरित महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यात मात्र पहाटेचे किमान तापमान 14 डिग्री सेंटिग्रेड तर दुपारचे कमाल तापमान 28 ते 30 डिग्री सेंटिग्रेड म्हणजे दोन्हीही तापमाने त्यांच्या सरासरी इतके किंवा त्यापेक्षा एखाद्या डिग्री सेंटिग्रेडने कमी दरम्यानचे असू शकते. या आठवड्यादरम्यान महाराष्ट्रात थंडीच्या लाटीची शक्यता मात्र जाणवणार नाही.
🎯 थंडी टिकून राहण्याची कारणे
🔆 सध्या उत्तर भारतात विविध कारणांनी जरी थंडी कमी जाणवत असली तरी (उत्तर भारतात समुद्र सपाटीपासून 10 ते 12 किमी उंचीवर पश्चिम दिशेकडून ताशी 250 ते 280 किमी असे वेगवान प्रवाही झोताचे पश्चिमी वारे पूर्वेकडे अजूनही वाहत आहे. या पश्चिमी झोताच्या परिणामातून त्या जाडीच्या पातळीखाली एकवटलेली संचित थंडी या तयार झालेल्या (धरणरूपी) स्रोतातून पाट-पाण्यासारखी प्रमाणात थंडी विनाअडथळा महाराष्ट्राकडे वाहत येत आहे.
🔆 दि.25 व 28 जानेवारी दरम्यान लागोपाठ दोन पश्चिमी झंजावात पश्चिम हिमालयीन क्षेत्रात प्रवेशित होत आहे. पश्चिमी वारा झोत व पश्चिमी झंजावात अशा दोघांचा एकत्रित परिणाम म्हणून तर कमी तीव्रतेची का होईना, पण ती अधिक कालावधी दिवसाच्या वहनामुळे महाराष्ट्राला थंडीचा फायदा होत आहे.
🎯 थंडीचा महाराष्ट्रातील पिकांवरील परिणाम
सध्या जानेवारीतील थंडी जरी कमी भासत असली तरी चालू एल-निनो (El Nino) व कमी पर्जन्यमान वर्षाच्या रब्बी हंगामातील पिकांना मात्र या जिवंत अशा सातत्यपूर्ण थंडीतून मावा, बुरशी, किडीपासूनचा होणारा आघात व तणे यापासून काहीशी सुटका तर मिळाली आहे व ती सुरक्षितही राहिली. भाजीपाला, भरडधान्ये पिके, फळबागा ऊस व आल्यासारखी दिर्घकालावधीच्या पिकांना वातावरणीय अवस्था ही एक जमेची बाजूच समजावी. एकूणच टंचाई वर्षातील माफक थंडीचा हा हिवाळा सध्या पिकांना संजीवनी प्राप्त करून देत फार मोठी मदत करत आहे. हा उमगही शेतकऱ्यांनी मनी ठेवावा. येथे जिवंत थंडीचा अर्थही ग्रामीण बोली भाषेसारखाच जसे विहिरींना जिवंत पाणी म्हणजे माफक पण कायम असाच घ्यावा.
🎯 पावसाचा अंदाज
सध्या एल -निनो तीव्रतेत आहे. आय.ओ.डी. (Indian Ocean Dipole – भारत महासागरीय पाण्याच्या पृष्ठभाग उष्णतेची द्वि-ध्रुवीता) तटस्थेत तर एमजेओ (Madden-Julian Oscillation – मॅडन व ज्यूलियनची हवेच्या कमी दाबाची दोलणे) देशाच्या महासागरीय क्षेत्राच्या बाहेर पडली आहे. पावसासाठीची पूरकता त्यामुळे या आठवड्यात वजाबाकीत म्हणजे कमी झाली आहे. विदर्भ वगळता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात पुढील आठवड्यात म्हणजे गुरुवार (दि. 1 फेब्रुवारी) पर्यंत पावसाची शक्यताही जाणवत नाही. मात्र विदर्भातील 11 व नांदेड एक अशा 12 जिल्ह्यात येते दाेन दिवस म्हणजे बुधवार (दि. 24 जानेवारी) पर्यंत ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. त्यामुळे दरम्यानच्या दाेन दिवसाच्या कालावधीतील तेथील थंडी कदाचित घालवली जाईल. परंतु, गुरुवार (दि. 25 जानेवारी) पासून पुन्हा सध्या पडत असलेल्या थंडीसारखी थंडी पूर्ववत होण्याची अपेक्षा करू या!
🎯 फेब्रुवारी व मार्चमधील वातावरणाबद्दल थाेडे
1 फेब्रुवारीनंतर दोन्हीही (फेब्रुवारी व मार्च) महिने गारपीट हंगामाची असतात. तसेच वातावरणात त्या दरम्यान घडणाऱ्या वारा खंडितता प्रणालीतून पडणाऱ्या पावसाचे असतात. खरं तर येणाऱ्या दोन महिन्यातील या घटना त्यावेळी वातावरणीय काय प्रणाल्या असतील, त्यानुसार त्या वेळीच 10 दिवस, पंधरवडा अशा लघुपल्ल्याच्या तसेच प्रत्येक महिन्याच्या मिळणाऱ्या अंदाजातूनच याबाबत बोलणे योग्य होईल. सध्या अजूनही अधिक तीव्रतेतील एल-निनो या घटनांना मारकही ठरू शकतो. म्हणूनच त्या घटना घडतीलच, असा लगेचच अर्थ आजच काढू नये. फक्त हंगामी घडणाऱ्या वातावरणीय घटनांच्या कालावधीची आठवण असावी म्हणून उल्लेख केला, एव्हढेच!
🎯 पावसाळ्याबाबत भाष्य
नोआ सारख्या संस्थेने मागे सुपर एल-निनोची वार्ता पसरवल्यानंतर, भारत देशातील खासगी संस्थाही त्यांच्या सुरात-सूर मिसळून येणाऱ्या पावसाळ्यात देशात कमी पावसाची शक्यता असू शकते, असे सांगितले. त्यामुळे त्यावेळी जनतेच्या मनात काहीसे भीतीचे वातावरण तयार झाले होते. आता याच संस्थेकडून येत्या पावसाळ्यात चांगल्या पावसाची शक्यता जाणवत आहे, असा खुलासा त्यांच्याकडून येत आहे. याबाबत एव्हढीच टिप्पणी करावीशी वाटते की, जेव्हा 15 एप्रिल 2024 ला भारतीय हवामान खात्याकडून जून ते सप्टेंबर अशा चार महिन्याच्या पावसाळी हंगामाचा पहिला मान्सूनचा अंदाज बाहेर येईल, तेव्हाच या गोष्टीबाबत चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत संयम असावा.