krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Weather forecasting & agriculture : हवामानाचा अंदाज आणि भारतीय शेती

1 min read
Weather forecasting & agriculture : भारतीय नागरिक नेहमी एका मानसिक दबावाखाली असल्याचे जाणवत आले आहे. आपण सुधारित नाही, आपल्याकडे साधनसंपत्तीची वानवा आहे, आपण प्रगत नाही... आपल्या कानावर नेहमी प्रगत देशांतील सोयी-सुविधा, सुखकर-समाधानी जीवनाच्या कथा ऐकविल्या जातात. म्हणून आपण भारावून जातो. खरे तर या सर्व गोष्टी न पाहिलेल्या, माहीत नसलेल्या आपल्या कल्पनेच्या बाहेरील असल्यामुळे विश्वास ठेवला जातो आणि आपण त्या खऱ्या मानू लागतो.

देशात मिळत असलेल्या हवामान अंदाजाबाबतही (Weather forecasting) आपण असेच उदासीन आहोत. आपले अंदाज अचूक नाहीत की काय? त्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या घटकांना त्यांचा खात्रीपूर्वक उपयोग त्यांच्या उद्योगाशी जोडता येत नाही काय? याचा अर्थ परदेशी संस्था फारच अचूक आहेत काय? असे अनेक प्रश्न देशवासीयांना व शेतकऱ्यांना पडतात.

परदेशी हवामान संस्थेचे अनुमान 100 अचूक असतात काय? तर नाही. मात्र, आपल्या मातीतील बुद्धिमत्तेची आपल्याला किंमत नाही, म्हणून तर असे प्रश्न उपस्थित होतात. प्रत्यक्षात भारतीय हवामान खाते (Meteorological Department of India) ही आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली संस्था असून, जागतिक हवामान संघटनेत त्यांच्या निष्कर्ष व अनुमानाला वजन प्राप्त आहे. त्यांच्या सूचनेवर गांभीर्याने विचार केला जातो. अलीकडेच त्या खात्याचे मंत्री किरेन रिजिजू भारतीय हवामान खात्याच्या स्थापनेला 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नवीन मानचिन्ह प्रक्षेपित करण्याच्या कार्यक्रमात म्हणाले की, ‘भारतीय हवामान शास्त्रज्ञांची अंदाज वर्तविण्याची पद्धत खूपच सुधारली असून, चक्रीवादळासारख्या अनुमानात जीवित व वित्तहानी खूपच टाळली जात आहे.’

अलीकडील सिक्कीममधील नुकतीच बर्फाची सरोवरे फुटणे, हिमाचल प्रदेशमधील ढगफुटी यासारख्या घडणाऱ्या घटनांमधून भरपूर पाऊस पडला. आपण हे बघितले आहे. ढगफुटीसारख्या अशा टोकाच्या वातावरणीय घटनांच्या पूर्वानुमानासाठी कोणतेही तंत्रज्ञान उपलब्ध नाही. कारण अशा मर्यादित परिक्षेत्रात, अल्पकाळात, एकाकी सांद्रिभवनातून घडणाऱ्या अशा या घटना आहेत. तसेच दुसरीकडे तामिळनाडूमधील ‘थुथुकुडी’ येथील 24 तासांत झालेला 95 सेंमी पाऊस ही घटना जगातील युरोप, यूएस, जपान व काेणत्याही वेदर मॉडेलमध्ये कॅच झाली नाही. त्याचे एकमेव कारण म्हणजे, सागरीय किनारपट्टीवरील वातावरणीय परिणामातून एकाकी झालेले ऊर्ध्व दिशेने झालेली उष्णसंवहनी प्रक्रिया होय. तरीदेखील भारतीय हवामान खातेच यात सुधारणा घडवून आणू शकते आणि सुधारणा घडवून आणण्यासाठी अजूनही प्रयत्नशील आहे.

हवामान खात्याचे मंत्रालयीन सचिव एम. रविचंद्रन म्हणाले की, ’12 कि.मी. ऐवजी जागतिक तोडीच्या सहा कि.मी. परिक्षेत्रातील घडामोडी अधिक स्पष्टतेने व सविस्तर माहितीने उपलब्ध होणारी अत्याधुनिक संगणकप्रणाली निरीक्षण यंत्रणा हवामान विभागाला उपलब्ध केल्या जातील. असे घडले तर पूर्वानुमान प्रक्रियेत खात्याला आमूलाग्र बदल करता येईल.’ कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हवामानाच्या पूर्वानुमानासाठी करणे म्हणजे उपलब्ध प्रचंड हवामान घटकांच्या आकड्यांचे विस्तृत पद्धतीने विश्लेषण करणे, मशीन लर्निंग अल्गोरिदमने (Machine learning algorithms) काढलेल्या महत्त्वपूर्ण माहितीच्या अर्काच्या आंतरदृष्टीचा वापर करणे, रहस्यमयीन निष्कर्ष नमुन्यांची माहिती ओळखून वेदर मॉडेल्समध्ये (Weather models) ऑप्टिमाइझ (Optimize) करणे आदी माहिती वापरणे म्हणजे हवामान अंदाजामध्ये सुधारणा करणे होय. यामुळे शास्त्रज्ञ, तज्ज्ञ यांच्या निर्णयाच्या बाहेरील काही उलगडा न झालेले रहस्य याद्वारे बाहेर येतात व पूर्वानुमानासाठी मदत मिळते.

अधिक उंच म्हणजे 35 हजार कि.मी. उंचीवरील ‘एनसेंट 3-डी’, इनसेंट-3 डीआर’ उपग्रहांचा डेटा हवामान अंदाजासाठी वापरला जात आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर भारतीय हवामानतज्ज्ञ कोणत्याच दृष्टीने मागे नाहीत; परंतु आपल्या देशाचे पसरलेले विस्तृत क्षेत्रफळ आणि वातावरणीयदृष्ट्या अनेक विविधतेची भौगोलिक रचना अंदाज व्यक्त करताना खात्याची संरचना अपुरी जाणवते. यात सुधारणा होणे गरजेचे वाटते. सध्याचा देशाचा भूभाग हा 35 हवामानशास्त्रीय उपविभागात समाविष्ट केलेला आहे. जसे महाराष्ट्रात कोकण व गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ असे चार विभाग. हे चार उपविभागही राज्यासाठी मोठेच आहेत. त्यांचे आकारमान कमी करून उपविभागांची संख्या वाढविता येईल काय, याचाही विचार होणे गरजेचे आहे. जसे महाराष्ट्र राज्यात तालुका पातळीवरून कृषी सहायक शेतबांधावर पोहोचतात, तसेच भारतीय हवामान खात्याला ‘हवामान उपदेशक’ उपलब्ध करणे शक्य आहे काय? रडारची संख्या वाढविणे व हवामान घटकांचे निरीक्षण प्लॅटफॉर्म वाढविल्यास शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो, असे वाटते. अर्थात, यात बदल नियोजित असून, काळानुसार ते विकसनाच्या मार्गावर आहेच. पंचवार्षिक नियोजनात याचा नक्कीच अंतर्भाव हळूहळू होईल.

भारतात आता कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial intelligence) व मशीन लर्निंग पद्धती महासागरीय, तसेच वातावरणीय कुशल अंदाजासाठी विविध संस्थांत वापरली जात आहे. त्यातून खर्च कपात व ज्ञान संशोधन साधले जाईल. जागतिक वेदर एजन्सी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान पद्धतीवर फोकस करू लागल्या आहेत. कृत्रिम तंत्रज्ञानामुळे आगाऊ वातावरणीय अंदाजाबरोबर शेतकऱ्यांना उभ्या असलेल्या पिकांचे सिंचन, बुरशीनाशक व कीडनाशक यांचा वापर, खतांचे नियोजन, तसेच कमीत कमी साधनसंपत्ती वापरून अन्नधान्य उत्पादनांची माहिती मिळू शकेल. भारतीय शेतकऱ्यांनीही आधुनिकतेची कास धरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शासन, कृषी व हवामान विभाग वेळावेळी देत असलेल्या काळजीपूर्वक सूचनांकडे लक्ष देणेही गरजेचे आहे. अशा दृष्टीने काम झाले तर नक्कीच शेतीधंद्याला त्याचा उपयाेग हाेईल आणि देशातील शेतकरी सुखी हाेईल, तेव्हाच हा देश महान हाेईल, असे म्हणता येईल.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!