krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Crop Losses : विठ्ठला… तूच सांग बाप्पा, कोणते पीक घेऊ आता!

1 min read
Crop Losses : कुणबी दिवाळीला शहाणा होतो, अशा आशयाची मराठीमध्ये म्हण आहे. मात्र, इथे हा कुणबी हा शेतकरी कधीच शहाणा होत नाही. तो वेडाचा वेडाच राहतो. कारण सतत तोट्यात जाणारा अशाश्वत असा कुठलाच आधार नसलेला अधांतरी तरंगणारा बे भरवशाचा व्यवसाय तो करतो. त्याला शेतीतलं अर्थशास्त्र, बाजार मूल्य व खर्चाचा ताळमेळ कधीच कळत नाही. फक्त त्याला कळत असेल तर या जगाचे पोट भरणे आणि स्वतः मात्र उपाशी पोटी राहणे.

इथल्या शेतकऱ्याला वाटते की, आपला जन्म फक्त मातीत राबण्यासाठी झालेला आहे. सुख, समृद्धी, सुखवस्तू जीवनमान, मान सन्मान या गोष्टी जणू आपल्यासाठी नाहीत, हे या शेतकऱ्याच्या मनात ठाम झालेलं आहे. ही शेती पिढ्यानपिढ्यापासून संभाळून ठेवलेला हा कष्टकरी आता कर्जबाजारी होऊन आत्महत्येचा मार्ग निवडतो आहे. इथल्या राजकीय सामाजिक व न्याय व्यवस्थेवर या शेतकरी वर्गाचा विश्वास राहिलेला नाही. कुठलाच राजकीय पक्ष व शेतकरी संघटना, सामाजिक चळवळ ही शेतकऱ्यांची बाजू घेऊन बोलताना दिसत नाही.

अनादी अनंत काळापासून सुरू असलेला हा शेती व्यवसाय दुर्लक्षित करून हे राज्यकर्ते लोक काय सिद्ध करू पाहत आहेत, हेच कळत नाही. खरे म्हणजे अनेक संकटांना तोंड देऊन उधळी लागलेल्या खुंटासारखा हा शेतकरी उभा आहे. दरवर्षी ओला-कोरडा दुष्काळ, अस्मानी-सुलतानी संकट झेलून जगाचे पोट भरण्यासाठी हा एका दाण्याचे हजार दाणे निर्माण करतो. मात्र, तरी हा शेतकरी राजा कर्जबाजारी होत चाललाय. त्याच्या मुलांचे लग्न होत नाही. घरामध्ये सुखा समाधानाने जगता येत नाही. कसं तरी मीठ भाकरी खाऊन कर्जबाजारी राहून हा शेतकरी आपलं जीवन जगत आहे.

यावर्षी हे पीक केलं ते बांधावरच सडलं, तर कधी शेतातच वाळलं, तर कधी बाजारपेठेत नाडलं. कधी कधी तर पेरून उगलच नाही आणि उगलच तर भरलच नाही आणि जे थोडं फार खळ्यावरून घरात आलं, ते विकलं गेलं नाही, अशी भयानक अवस्था शेतकऱ्याची निर्माण झाली. प्रचंड खर्च करून कापूस पेरला कमी पावसानं पीक चांगलं आलं नाही. काही ठिकाणी अधिकच्या पावसानं हे कापसाचे पीक सडवलं प्रचंड खर्च करून थोडंफार पीक घरात आलं. मात्र, या कपाळकरंट्या सरकारने काळ्या कायद्यांचा आधार घेत आयात निर्यात धोरणांचा झोल करत, या कापसाचे भाव पाडले. शेतकऱ्यांच्या घरातला कापूस घरातच राहिला. गळ्यापर्यंत आलेलं कर्ज अधिकच वाढलं. गेल्या वर्षाचा कापूस अजूनही घरात पडून आहे, तर या वर्षाच्या कापसाची काय कथा? मग काही शेतकऱ्यांना वाटलं आपण पीक पद्धती बदल करूया म्हणून पिक बदल केलं. मात्र, शेतकऱ्यांचे जे जे पीक बाजारात आलं त्या पिकाचे कधी आयात करून, कधी निर्यात बंद करून सरकारने भाव पाडले.

ज्यावेळेस शेतकऱ्याच्या शेतातील गहू बाजारात येत होता, तेव्हा रिझर्व्ह कोट्यातील गहू शासनाने खुल्या बाजारात विक्री के.ला डाळवर्गीय पिक आणि आता कांद्याची निर्यात बंद करून शेतकऱ्याचा संसाराचा वांधा केला. मग हा भयभीत झालेला शेतकरी अधिकच आर्थिक अडचणीत सापडला. त्याला या देशातील कुठलाच राजकीय पक्ष, कुठलाच नेता, संघटना आपल्या वाटत नाही. कुणावरही त्याचा विश्वास राहिलेला नाही. त्या कल्याणकारी योजना, हे अधिवेशन, ते भाषण, ते बजेट हे सगळं त्याला आपल्यासाठी नाहीच, असं वाटू लागलं. शेती पाऊस पाणी, वीज, बीज तंत्रज्ञान या सगळ्या गोष्टींची आता त्याला किळस यायला लागली. ज्या शेतीवर या देशाची वित्तीय स्थिती अवलंबून आहे, त्याच शेतीला त्याच शेतकऱ्याला असे वाईट दिवस आले म्हणून काकुळतीला आलेला शेतकरी आता विठ्ठलाच्या धावा करतोय, अंगात त्राण नसलेला हातावर प्राण असलेला शेतकरी आता शेवटची घटका मोजतोय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!