तुका म्हणे मना समर्थासी गाठी…
1 min readकाय करु आता धरोनिया भीड
नि:शंक हे तोंड वाजविले|
जगी कोणी नव्हे मुकियाचा जाण
सार्थक लाजून नव्हे हित|
आले ते उत्तर बोलो स्वामीसवे
धीट नीट जीवे होवोनिया|
तुका म्हणे मना समर्थासी गाठी
घालावी हे मांडी थापटोनी||
वृत्तपत्रांच्या इतिहासातील मूकनायक या अद्वितीय वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर जगद्गुरू तुकोबारायांचा हा अभंग उद्धृत केलेला असायचा. परिवर्तन घडवून आणायचे असेल तर आधी स्वत:ला घडवायचे, हे जगद्गुरू तुकोबाराय या अभंगातून सांगतात. हा अभंग अस्पृश्य मूकनायकासाठी होता. हाच अभंग आज आर्थिक अस्पृश्यांसाठी म्हणजेच शेतकऱ्यांसाठीही आहे.
⭕ आत्मविश्वास आणि अभ्यास
आपली स्थिती स्पष्टपणे मांडायची तर कुणाची भीड धरून चालणार नाही. आपले विचार मांडू न शकणाऱ्या मूकदुर्बळ लोकांना कुणाचीही साथ मिळत नाही. संकोच बाळगून चूप राहिले तर आपल्या समस्यांना वाचा फोडणार तरी कोण? आपले विचार, अनुभव, अडचणी, कल्पना, इच्छा स्पष्टपणे मांडल्या पाहिजेत. त्यावर रोखठोक बोलले पाहिजे, लाजून उपयोग नाही. पण उथळपणे बोलणे योग्य नाही. धीटपणे तर बोलायचंच, पण त्यासाठी नीटपणेही बोलायला शिकले पाहिजे. समर्थासी म्हणजेच सत्तधिष्ठितांशी परखडपणे बोलायचे तर स्वत:ला सशक्त समर्थ केले पाहिजे. ‘मांडी थापटोनी’ म्हणजे आत्मविश्वासाने आणि आत्मविश्वास मिळवायचा तर अभ्यास आवश्यक आहे.
⭕ शेतकऱ्यांचे मरण आणि घामाचे दाम
युगात्मा शरद जोशी यांनी स्वत: शेती करून, अनेक प्रयोग करून अनुभव घेऊन भारतीय शेती हा तोट्याचा व्यवसाय आहे, हे सिद्ध केले. शेतकऱ्याला कर्ज घ्यावे लागेल आणि ते तो फेडू शकणार नाही, अशा दोन्ही परिस्थिती सरकार नावाची व्यवस्था हेतुपुरस्सर करते. हेही अभ्यासांती सिद्ध केल्यावर ‘शेतकऱ्यांचे मरण, हेच सरकारचे धोरण’ या निष्कर्षापर्यंत ते आले. शेतीच्या अभ्यासाबरोबरच त्यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि मानसिक स्थितीचा अभ्यास केला. शोषण व्यवस्थेच्या विरोधात करायच्या आंदोलन नीतीचाही अभ्यास केला. त्यामुळे आंदोलनांमध्ये नाविन्य आलं आणि ते परिणामकारक ठरलं. त्यांनी भ्रामक फसव्या सबसिडी प्रकरणांचा अभ्यास केला आणि भारतीय शेतकऱ्यांना उणे सबसिडी मिळते, हे सिद्ध केलं. म्हणून ‘सूट सबसिडीचे नाही काम, आम्हाला हवे घामाचे दाम’ हा निश्चय झाला.
⭕ बाजारपेठ व तंत्रज्ञान स्वातंत्र्य
बाजारपेठेचा अभ्यास करून कृषी उत्पन्न बाजार समित्या या शेतकऱ्यांचे कत्तलखाने असल्याचे सांगून खुल्या बाजारपेठेचा आग्रह धरला. अनेक देशांच्या शेतीक्षेत्रांच्या प्रगतीचा अभ्यास केला आणि भारतीय शेतीतल्या उणिवा दूर करायला ‘तंत्रज्ञान’ हा उपाय सांगितला. ‘चतुरंग शेती’ या विकासाच्या वाटा दाखवल्या. शेततेल – इथेनॉल उत्पादनाची कल्पना मांडली. त्यांनी राजकारणाचाही अभ्यास केला आणि सत्ताकारणात पुढे जाण्यासाठी शेतकऱ्यांचीच मुले शेतकरी हिताचा बळी देतात, हेही उदाहरणे देऊन सिद्ध केले. त्यांनी शेतकऱ्यांना सत्तेपुढे चालणारे शहाणपण शिकवले. पण शेतकऱ्यांना शहाणपणापेक्षा, सत्तेभोवती घुटमळायला आवडतं, हेही त्यांनी रोखठोक सांगितलं. शेतकऱ्यांनी शेतकरी म्हणून एकजूट केल्याशिवाय शेतीचे प्रश्न सुटणार नाहीत, हे कटुसत्यही त्यांनी सांगितले.
⭕ लक्ष्मी मुक्ती
शेतकरी कुटुंबातील समस्या त्यांच्यावर लादलेल्या गरिबीमुळे आहेत. समस्या पूर्ण शेतकरी कुटुंबाची आहे. त्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांच्या घरलक्ष्म्यांनाही लढाईत उतरण्याचे आवाहन केले. हजारो हजार मायबहिणी ‘धीट नीट’ होऊन आपल्या कुटुंबासाठी आंदोलनात उतरू लागल्या. ‘लक्ष्मी मुक्ती’ला ‘मंगल सावकाराचं देणं’ म्हणून युगात्मा शरद जोशींनी शेतकऱ्याला घरलक्ष्मीचा सन्मान करायला शिकवलं. हजारो हजार शेतकरणींना आनंदाचं देणं दिलं. घरलक्ष्मीचा आदर करण्यातला आनंद शेतकऱ्यांना समजला.
⭕ नोकरशाहीला सामोरे जा
जॉर्ज ऑरवेलच्या ‘ॲनिमल फार्म’मध्ये जे दोन पायावर चालू लागतात, ते ॲनिमल फार्मवर ताबा मिळवतात. मग ती डुकरे का असेनात. ॲनिमल फार्मवर ताबा मिळवणे म्हणजे सरकार बनवणे. विरोधकांना सरकार पाडायचे असते, सत्तारुढांना ते टिकवायचे असते. बस्स! सगळ्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि राजकीय उलथापालथी फक्त याच कारणांसाठी होत असतात. त्यासाठी अनेक जणांचे तळ्यात – मळ्यात सुरू असते. सरकार आणि सरकारी व्यवस्थेवर सतत टीका करण्यापेक्षा किंवा सरकारी व्यवस्थेचे मिंधे होऊन राहण्यापेक्षा नोकरशाहीशी सतत भांडण्यापेक्षा किंवा नोकरशाहीत शिरकाव करण्यासाठी आशाळभूत होण्यापेक्षा आपल्या शेतीव्यवसायाचा अभ्यास करून सरकार आणि नोकरशाहीला सामोरे जाणे योग्य ठरेल.
⭕ शेतकऱ्यांची सगळी कर्ज अनैतिक
शेतकऱ्यांना कुठलीही सरकारी मदत देताना राजकारणी आणि नोकरशहा उपकार केल्याचा आव आणतात. मदत घेणारा शेतकरी ओशाळवाणा होऊन ती मदत घेतो. सरकार करत असलेली ती मदत उपकार नाही तर कर्जबुडव्या ऋणकोने घेतलेले कर्ज आपल्या धनकोला कण्हत कुंथत देण्याचा तो प्रकार आहे. म्हणून मदत स्वीकारताना शेतकऱ्यांचा ‘धनको’ भाव असला पाहिजे. गेल्या अनेक वर्षांचा शेतमाल उत्पादन खर्च आणि भाव यांचा अभ्यास करून ‘शेतकऱ्यांची सगळी कर्ज अनैतिक आहेत’ हा युगात्मा शरद जोशींचा अभ्यासपूर्ण निष्कर्ष आहे.
⭕ ऐकीव माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना सल्ले
सरकार आणि नोकरशहा यांच्या शिवाय समाजाचा आणखी एक घटक, ज्याला शेतीशी काहीही संबंध नाही, जो तथाकथित सुशिक्षित आहे, शहरी आहे, पगारी कर्मचारी आहे. अशा लोकांचं म्हणणं असतं की, ‘शेतकरी कर्ज बुडवतात. ओल्या, कोरड्या दुष्काळाचं रडगाणं गातात. सतत अनुदानं लाटतात. शेती उत्पन्नावर कर नाही म्हणजे शेतकरी कुठलाही कर भरत नाही. शिवाय अनेक गोष्टींवर सबसिडी मिळते. तरीही हे शेतकरी कर्ज बुडवतात. आम्ही कर देऊन सरकारी तिजोरी भरतो, पण शेतकऱ्यांमुळे सरकारी तिजोरीवर खूप भार पडतो.’ असा त्यांचा ओरडा असतो. हेच लोक नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, झिरो बजेट शेती या विषयांवर ऐकीव माहितीने भाषणे ठोकतात. शेतीचे हे प्रकार भरल्या पोटी हौस म्हणून करतात. हे त्यांना ठणकावून सांगता आले पाहिजे. त्यासाठी अभ्यास आवश्यक आहे.
⭕ माती परीक्षणाचे महत्त्व
शेतीचा अभ्यास मातीपासून सुरू होतो. संपूर्ण शेतात एकाच प्रकारची जमीन असलेली शेते कमी आढळतात. बहुतेक शेतकऱ्यांच्या शेतात, काही जमीन गाळाची, काही काळी, काही चुनखडीची, काही चिबडणारी तर काही बरडमाळ! अशा शेतात वेगवेगळ्या जमिनीत वेगवेगळ्या पिकांना, वेगवेगळी वरखतं योग्य प्रमाणात योग्य वेळीच द्यावी लागतात. त्यासाठी मातीचं परीक्षण करून त्यानुसार वरखतं निवडतात. जी मिळतील, जेव्हा मिळतील विशेष म्हणजे स्वस्त मिळतील ती देऊन टाकली तर पैसा, कष्ट आणि वेळ वाया जातील. झाडाच्या मागणीनुसार खत द्यावे लागेल. आपल्या मातीत कुठली पीके घेता येतील, हे समजून घेतले पाहिजे. कुठली तरी सरकारी स्कीम आहे म्हणून डाळिंब, संत्री, मोसंबीची बाग लावली आणि आपली माती त्या योग्य नसली तर उत्पादन होणार नाही. कर्जाचं ओझं मात्र वाढत जाईल.
⭕ पाणी परीक्षणाचे महत्त्व
मातीप्रमाणे पाण्याचेही परीक्षण करणे गरजेचे आहे. पाण्याचा पीएच ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. पाण्याचा पीएच 6.5 पेक्षा कमी असेल तर पाणी आम्ल गुणधर्मी – ॲसिडिक असते. असे पाणी औषध फवारणीला वापरले तर औषधाचा प्रभाव जास्त आणि जास्त दिवस टिकतो. याउलट पाण्याचा पीएच 6.5 असेल तर ते पाणी विम्लधर्मी – अल्कलाईन असते. असे पाणी औषध फवारणीला वापरले तर औषधांचा प्रभाव किडींवर फारसा होत नाही. औषधाचे प्रमाण वाढवून उपयोग नसतो. उलट त्यामुळे फवारणी करणाऱ्या व्यक्तीला श्वासातून विषबाधा होऊ शकते. पाण्याचा पीएच कमी करण्यासाठी फवारणीच्या पाण्यात योग्य प्रमाणात लिंबाचा रस किंवा सायट्रिक ॲसिड टाकावे. पिकाला गरजेपेक्षा जास्त पाणी दिले तर पिकाची वाढ नीट होत नाही. पाण्यातील क्षारांनी जमीन मात्र खारपड होते.
⭕ पावसाचे गणित व अंदाज
शेती करताना पावसाचे गणित समजून घेतले पाहिजे. पूर्वी अनेक शेतकरी दरवर्षीचा पावसाचा अंदाज, पावसाचे दिवस आणि प्रत्यक्ष पाऊसमान – प्रमाण याच्या नोंदी ठेवत असत. सरकारी हवामान खाते अंदाज सांगते. अंदाज शेवटी अंदाजच असतात. अवकाळी पावसाचेही काही ठोकताळे असतात. पावसाच्या अंदाजावर विश्वास ठेवला तरी पावसाच्या अचानक येण्याजाण्याची शक्यताही लक्षात घेऊन कामे ठरवली आटोपली पाहिजेत. कृषी विद्यापीठांमधले संशोधन शेतकऱ्यांना येणाऱ्या प्रत्यक्ष अडचणी दूर करण्यासाठी झाले पाहिजे. तरच त्या विद्यापीठांवर होणाऱ्या अफाट खर्चाचा थोडाफार परतावा मिळाला असे होईल.
⭕ बियाण्यांची निवड व कारावास
योग्य बियाण्यांची निवड हा सुद्धा शेतकऱ्यांच्या अभ्यासाचा आणि स्वातंत्र्याचा सुद्धा विषय आहे. कपाशीच्या बाबतीत जनुकीय सुधारणा केलेले, तणनाशकाला सहन करणारे एचटीबीटी बियाणे वापरले तर कष्ट, वेळ आणि पैशाची बचत होते. पण विचित्र आणि अव्यवहारिक कारणे देऊन त्यावर बंदी घातली आहे. त्या बियाण्यांशी संबंधित शेतकऱ्याला पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा आहे. तरीही त्या बियाण्यांची मागणी शेतकरी करतात. या बियाण्याची लावणी ते शौर्य, पराक्रम म्हणून करत नाहीत तर अगतिक असहाय म्हणून करतात. जगण्याचा एक प्रयत्न म्हणून करतात. शेतकऱ्याने आत्महत्येचा म्हणजे मरायचा प्रयत्न केला तर तीन वर्षांची शिक्षा आहे आणि नाईलाज म्हणून एचटीबीटी लावून जगण्याचा प्रयत्न केला तर पाच वर्षांची शिक्षा आहे. अशी आपली कायदा आणि अव्यवस्था अशी स्थिती आहे.
⭕ शेतमाल नाविन्य, गुणवत्ता व पुरवठ्यातले सातत्य
बाजारपेठेचा अभ्यास सगळ्यात महत्त्वाचा. बाजारपेठ मागणी पुरवठा तत्वावर चालते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय शेतमालाला भरपूर मागणी असते व भावही चांगला मिळतो. संधी मिळेल तेव्हा म्हणजे सरकारने लुडबुड केली नाहीतर त्या संधीचे सोने केले पाहिजे. आज अनेक परिश्रमी शेतकऱ्यांच्या कंपन्या, चांगल्या दर्जाचा शेतमाल आणि प्रक्रिया केलेला शेतमाल निर्यात करून भाव आणि नाव कमवत आहेत. महिला बचत गटांनी देशांतर्गत बाजारात भाव आणि नाव मिळविले आहे. चतुरंग शेतीच्या माजघरशेती आणि निर्यातशेतीचे तंत्र शिकणे आवश्यक आहे. एक व्यवसाय म्हणून शेतीचा अभ्यास केला पाहिजे. पुढच्या पिढीला अभ्यासाचे गांभीर्य समजले पाहिजे. नोकऱ्या वंशपरंपरेने मिळणार नाहीत. तरुणांना शेतीकडे वळावे लागेल. तरुण पिढीला पुस्तकी शिक्षण आणि तंत्रज्ञान अवगत आहे, ही जमेची बाजू आहे. जागतिक बाजारपेठेत नाविन्य, गुणवत्ता आणि पुरवठ्यातले सातत्य या महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
⭕ शेतकरी आत्महत्या
शेतकरी आत्महत्या हा एक खूप गंभीर विषय. त्यावर चर्चेची अनेक गुऱ्हाळे चालतात. आत्महत्येचे समर्थन कुणीच करू नये. पण ही व्यवस्थाच शेतकऱ्याला त्या दिशेने ढकलते. नंतर व्यवस्थाच त्याच्या कुटुंबाचे सांत्वन करायला जाते. बायका-मुलांना काही पैसे देऊन स्वत:ची पाठ थोपटून घेते आणि चर्चेला विषय मिळतो. टी.व्ही. आणि पेपरात चर्चा करून विचारवंतांच्या वर्तुळात अनेकजण प्रस्थापित झाले आणि शेतकरी विस्थापित!
⭕ एकजूट-एकमूठ
शेती म्हणजे पेरले, पिकले आणि बाजारात विकले, असा व्यवसाय नाही. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून शेती करावी लागेल. युगात्मा शरद जोशींच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेकजण शेतीसंबंधित वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करून शेतकरी संघटनेत आपआपले अभ्यासक्षेत्र, कार्यक्षेत्र सांभाळत आहेत. तरुणांनी त्यांचे मार्गदर्शन घेऊन शेतीचे आव्हान स्वीकारायला हवे. शेतीला पर्याय नाही. उत्तम शेतीला अभ्यास आणि कष्टांशिवाय पर्याय नाही. अर्थात शेतीचे प्रश्न सोडवायला शेतकऱ्यांची एकजूट एकमूठ आवश्यक आहे.