Late sowing of wheat : बागायती गव्हाची उशिरा पेरणी!
1 min read⭕ बागायती उशिरा पेरणीची शिफारसही 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीसाठी आहे. मात्र, काही शेतकरी 15 डिसेंबर नंतरही गव्हाची पेरणी करतात. वास्तविक 15 नोव्हेंबरनंतर पेरणी केलेल्या प्रत्येक उशिराच्या पंधरवड्यात गव्हाची पेरणी केल्याने हेक्टरी 2.5 क्विंटल किंवा एकरी एक क्विंटल उत्पादन कमी मिळते.
⭕ गव्हाचे उत्पादन हे पिकास मिळणाऱ्या थंडीच्या कालावधीवर बहुतांशी अवलंबून असते. गहू पिकाच्या वाढीसाठी 7 ते 21 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. तसेच दाणे भरण्याच्या वेळी 25 अंश सेल्सिअस इतके तापमान असल्यास दाण्यांची वाढ चांगली होऊन दाण्यांचे वजन वाढते.
⭕ गव्हाच्या बागायती उशिरा पेरणीसाठी, फुले समाधान (एनआयएडब्लू-1994), निफाड-34 एनआयएडब्लू-34 किंवा एकेएडब्लू-4627 या सरबती जातींची निवड करावी. बागायती उशिरा पेरणीसाठी प्रति हेक्टरी 125 ते 150 किलो बियाणे रासायनिक खतांच्या पहिल्या हप्त्यासह दोन चाड्याच्या पाभरीने एकेरी पद्धतीने 18 सें.मी. अंतरावर पेरावे.
⭕ पेरणी करते वेळी निम्मे नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश (90:60:40 नत्र, स्फुरद, पालाश किलो प्रती हेक्टरी) म्हणजेच 98 किलो युरिया (सर्वसाधारणपणे दोन गोण्या), 375 किलो सिंगल सिंगल सुपर फॉस्फेट (सर्वसाधारणपणे 7.5 गोण्या एसएसपी) व 67 किलो किलो म्युरेट ऑफ पोटॅश (सर्वसाधारणपणे 1.5 गोणी एमओपी) द्यावे. उर्वरित नत्राचा हप्ता 98 किलो युरिया (सर्वसाधारणपणे दोन गोण्या) खुरपणी झाल्यानंतर तीन आठवड्यांनी प्रति हेक्टरी पहिल्या पाण्याच्या वेळी द्यावा.
⭕ गव्हाच्या बियाण्यास पेरणीपूर्वी कॅप्टन किंवा थायरम या बुरशीनाशकाची 3 ग्राम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी तसेच प्रति 10 किलो बियाण्यास 250 ग्राम अॅझोटोबॅक्टर व 250 ग्राम पीएसबी या जीवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करावी.
⭕ पेरणी उथळ म्हणजे 5 ते 6 सें.मी खोल करावी. त्यामुळे उगवण चांगली होते. पेरणी उभी-आडवी अशी दोन्ही बाजूने न करता ती एकेरी करावी. म्हणजे आंतरमशागत करणे सोईचे होते.
⭕ बियाणे झाकण्यासाठी कुळव उलटा करून चालवावा म्हणजे बी व्यवस्थित दबून झाकले जाते. जमिनीचा उतार लक्षात घेऊन गव्हासाठी 2.5 ते 4 मीटर रुंदीचे व 7 ते 25 मीटर लांब या आकाराचे सारे पाडावेत.
⭕ बागायती उशिरा पेरलेल्या गव्हास तीन आठवड्यांनी खुरपणी करावी. पीक कांडी अवस्थेत आले की, मजुरांच्या सहाय्याने तणांचा बंदोबस्त करता येत नाही. पिकांची नासाडीच जास्त होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर करणे फायद्याचे ठरते. तसेच वाढते मजुरीचे दर व वेळेवर मजुरांची अनुपलब्धता यामुळे तणनाशकांचा वापर फायदेशीर व प्रभावी ठरतो.
⭕ जमिनीत कायमस्वरुपी ओलावा राहून पीक क्षेत्रात थंड हवा राहण्यासाठी पिकास नेहमीपेक्षा कमी अंतराने (15 दिवसांनी) योग्य मात्रेत पाणी द्यावे. तापमान कमी राहण्यासाठी गव्हासाठी तुषार सिंचनाचा वापर करावा. तुषार सिंचनाने शेवटचे पाणी 80 ते 85 दिवसा दरम्यान द्यावे. बागायत उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याच्या पाळ्या कमी जास्त होऊ शकतात.
⭕ जर एकच पाणी देण्याइतके उपलब्ध असेल तर पेरणीनंतर 40 ते 42 दिवसांनी गव्हास पाणी द्यावे. दोन पाणी देण्याइतका पाणीसाठा उपलब्ध असेल तर पहिले पाणी पेरणीनंतर 20 ते 22 दिवसांनी आणि दुसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावे. तीन पाण्याच्या पाळ्या देणे शक्य असेल तर पहिले पाणी 20 ते 22, दुसरे 42 ते 45 व तिसरे 60 ते 65 दिवसांनी द्यावे. अशा रीतीने सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून गव्हाचे उत्पादन घ्यावे.
🎯 फुले समाधान (एनआयएडब्लू-1994)
🔆 प्रसारणाचे वर्ष – 23014
🔆 बागायतीत वेळेवर किंवा उशिरा पेरणीसाठी सरबती वाण.
🔆 तांबेरा रोगास प्रतिकारक.
🔆 प्रथिने 12 टक्क्यांपेक्षा जास्त.
🔆 चपातीसाठी उत्तम.
🔆 परिपक्व होण्याचा कालावधी बागायतीत वेळेवर 115 दिवस व 🔆 बागायतीत उशिरा पेरणीखाली 110 दिवस.
🔆 हेक्टरी उत्पादन :- बागायती वेळेवर 45 ते 50 क्विंटल, बागायती उशिरा 42 ते 45 क्विंटल.
🎯 एनआयएडब्लू-34 (निफाड-34)
🔆 प्रसारणाचे वर्ष :- 1995
🔆 बागायतीत उशिरा पेरणीसाठी शिफारसीत सरबती वाण.
🔆 मध्यम व टपोरे दाणे.
🔆 प्रथिने 13 टक्क्यांपेक्षा अधिक.
🔆 तांबेरा रोगास प्रतिकारक.
🔆 चपातीसाठी उत्तम.
🔆 परिपक्व होण्याचा कालावधी 100 दिवस.
🔆 हेक्टरी उत्पादन :- 35 ते 40 क्विंटल (उशिरा पेरणीखाली)
🎯 एएडब्लू-4627
🔆 उशिरा पेरणीत अधिक उत्पादन देणारा सरबती वाण.
🔆 हेक्टरी पेरणीस लागणारे बियाणे 125 ते 150 किलो.
🔆 परिपक्व होण्याचा कालावधी 92 ते 96 दिवस.
🔆 चपातीची प्रत चांगली.
🔆 हेक्टरी उत्पादन :- 42 ते 45 क्विंटल.